प्रा.विजय रमेश घ्याळ : एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व

 प्रा.विजय रमेश घ्याळ : एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व 

--------------------------------------------------------

      विजय रमेश घ्याळ यांचा जन्म ६ मे १९७८ रोजी एका शेतकरी कुटुंबात बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेलसूर गावी झाला.सध्या विजय घ्याळ एम. ए. बी. एड्.असून ते

 श्री शिवाजी कनिष्ठ कला महाविद्यालय, शेलसूर येथे उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून २००४ पासून अध्यापनाचे प्रामाणिकपणे काम करत आहे.एक नवोदित साहित्यिक सामाजिक कार्याची जाण असणारा, एक चांगला पत्रकार म्हणून देखील त्यांचा पंचक्रोशीत नावलौकिक आहे.

धार्मिक वातावरण असलेल्या घरात आई, वडील, एक बहीण , एक भाऊ व आजी अशा कुटूंबात वाढलेल्या विजय वर आपल्या आजीकडून बालवयातच चांगले धार्मिक व सामाजिक संस्कार झाले. त्यांना बालवयात रामायण,महाभारत,भागवत व श्रीमद् भगवद्गीता यासारख्या पवित्र ग्रंथांचे आजीसोबत श्रवण करता आले. त्याचा परिणामस्वरूप त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, जबाबदारी,सद्सदविवेक बुध्दी आणि चिकीत्सक वृत्ती निर्माण झाली. याचा त्यांना पुढील आयुष्यात फायदा झाला.

 आईवडील धार्मिक,सात्विक आणि वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीचे होते.शेती व्यवसाय सांभाळून ते दरवर्षी पंढरपूर व पैठणची वारी करायचे.येणाऱ्या जाणाऱ्या पैपाहुण्यांचे आदरतिथ्य करण्यात त्यांना विशेष आनंद वाटायचा.

  शालेय जीवनात त्यांना खेळात विशेष रूची होती.शालेय क्रिकेट संघाचे व कबड्डी संघाचे ते सदस्य होते. त्यांच्या पुढाकारानेच शेलसूर येथे क्रिकेटच्या स्पर्धा अनेकवेळा आयोजित केल्या होत्या.. एक चांगला क्रिकेट संघ त्यांनी निर्माण केला होता. क्रिकेट खेळण्यासाठी चिखली, बुलडाणा, उन्द्री, जानेफळ, साखरखेर्डा,धाड अशा अनेक ठिकाणी ते स्वखर्चाने आपल्या संघाला घेऊन जात असत. त्यांचा बक्षिसे मिळविणे हा महत्त्वाचा भाग नव्हता तर खिलाडूवृत्ती जोपासणे महत्वाचे होते. . 

     १९९४ साली विजय दहावीमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

 दहावीचे गुण चांगले असल्यामुळे त्यांना शेतकी शाळेत प्रवेश घ्यावा लागला. या काळात त्यांना वाचण्याची आवड निर्माण झाली.

ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशा नोकरीच्या संधी चालून आल्या असताना देखील प्राध्यापक व्हायचे; हे धेय्य उरी बाळगण्यामुळे   

१९९८ ला त्यांनी इंग्रजी विषयात अमरावती येथील शासकीय विदर्भ महाविद्यालयात एम. ए. केले.

  महाविद्यालयीन काळात पार पडलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेत त्यांना ३००० स्पर्धकांपैकी प्रथम पारितोषिक मिळाले होते. स्नेहसंमेलन, वार्षिक विशेषांक, शैक्षणिक सहल अशा उपक्रमांत त्यांनी आवडीने भाग घेतला. यातून त्यांची जडणघडण होत गेली. 

 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक होण्यासाठी बीएड आवश्यक होते.म्हणून त्यांनी अकोला येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात २००२ साली बी.एड. यशस्वीरित्या पूर्ण केले. एमए बीएड असल्यामुळे अकोला येथे एकलव्य क्लासेस मध्ये काम करण्याची अजय कुटे यांचेकडून अध्यापनाची संधी मिळाली. सहाजिकच त्यांचा आत्मविश्वास वाढला.

 शेलसूर येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात संस्था अध्यक्ष प्रा. सुनिलभाऊ देशमुख यांच्या कृपाशीर्वादाने त्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळाली.

     शैक्षणिक कार्य सुरू असतानाच ते फावल्या वेळेत गावात सामाजिक कार्यात भाग घेऊ लागले. वंजारी जातीच्या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्याकाळी खूप अडचणी येऊ लागल्या होत्या. त्यांनी स्वत: उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांची भेट घेऊन तोडगा काढत गावपातळीवर कॅम्प घेऊन एकाच वेळी दोनशे पन्नास लोकांना जातीचे दाखले मिळवून दिले.अण्णा हजारे यांच्या यूवा चेतना अभियानात सहभागी होऊन त्यांनी गावकऱ्यांमध्ये स्वच्छता व व्यसनमुक्ती विषयी जाणीवजागृती व्हावी म्हणून २००५ मध्ये अण्णा हजारे यांची शेलसूरला सभा आयोजित केली होती.

गावात एक गाव - एक गणपती आणि नवरात्रोत्सवात एक गाव- एक देवी ही संकल्पना त्यांनी राबविली आणि त्याला नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला.रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण व आदर्श ग्राम संकल्पना राबवून आदर्श गाव कसे निर्माण होईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले. 

     शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना खेळात प्रोत्साहन दिले. त्यांनी त्यांच्या शाळेतील अनेक विद्यार्थी तलवार बाजी , रस्सीखेच आणि वेटलिफ्टींग सारख्या खेळात राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचविले. सतत दहा वर्षे कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहिले. या माध्यमातून प्रा विजय घ्याळ यांनी दरवर्षी रोपवाटिका निर्मीती, १०० वृक्षांची लागवड, २०० वृक्षांचे वृक्षदिंडीतून वाटप , पळसखेड सपकाळ येथे वनराई बंधारे निर्मिती, शेलोडी येथे पन्नास शौचालयांची निर्मिती, आंधई येथे गावतलावाचे पुनरुज्जीवन आणि धोत्रा भनगोजी येथे स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण, असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम विद्यार्थ्यांमार्फत यशस्वीपणे राबविले.

       प्रा विजय घ्याळ यांना त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण संरक्षण व संवर्धन,जलसंधारण आणि पक्षी संवर्धन अशा अनेक चांगल्या कामाची पावती म्हणून बुलडाणा फिल्म सोसायटीचा राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार आणि ग्लोबल सोसायटी नवी दिल्लीचा शिक्षणरत्न पुरस्कार मिळाला . शैक्षणिक व सामाजिक कार्यासोबत प्रा.विजय घ्याळ हे सकाळ ह्या वर्तमानपत्रातून विविध विषयांवर लेखन करतात. आपल्या लेखनातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडतात. त्यांच्या प्रयत्नातून शेलसूर येथील नदी खोलीकरणाचे फार मोठे काम झाले आहे. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सकाळ रिलीफ फंडांच्या माध्यमातून देखील गावासाठी मदत मिळाली आहे. सकाळ वृत्तपत्राचे प्रा विजय घ्याळ हे वार्ताहर असून त्यांनी ग्रामीण भागातील प्रतिभावान यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा सकाळ वृत्तपत्रातून मांडल्या आहेत.

     त्यांनी शेलसूर येथील समाजसेवी डॉक्टर स्व. नारायणराव देशमुख यांच्या जीवन कार्यावर "पाऊलखुणा'' या ग्रंथातून प्रकाश टाकला आहे. प्रा.विजय घ्याळ हे 'भूमीपुत्र संघर्ष वाहिनी' ह्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेचे राज्य समन्वयक आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भूमीपुत्र संघर्ष वाहिनी व संत गाडगे महाराज मिशन,मुंबई यांच्या वतीने सन २०१८ मध्ये सिंदखेडराजा ते सेवाग्राम या संवादयात्रेच्या आयोजनात त्यांचा सिंहाचा वाटा होता. विदर्भातील शेतकरी आत्महत्या या विषयावर सेवाग्राम येथे चर्चासत्राचे आयोजनात त्यांचा सक्रीय सहभाग होता; ज्यामध्ये विजय जावंधिया, चंद्रकांत वानखेडे,प्रकाश पोहरे या मान्यवरांचे मौलिक मार्गदर्शन होते. तसेच सर्व शेतकरी संघटनांची एकत्रित मोट बांधण्यासाठी २०१४ मध्ये अमरावती येथील रंगोली मंगल कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सभेच्या आयोजनात देखील सरांचा सक्रिय सहभाग होता. यावेळी रघुनाथ दादा पाटील,रविकांत तुपकर,चंद्रकांत वानखेडे,विजय जावंधिया,पंजाबराव पाटील ही शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारी ध्येयवेडी माणसं या वेळी आवर्जून उपस्थित होती. 

 खामगाव तालुक्यातील गेरूमाटरगाव येथील आदिवासी बांधवांना दिवाळीच्या दिवशी गाडगे महाराज मिशन मुंबई कडून फराळ व कपडे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी सरांनी शर्तिचे प्रयत्न केले होते.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात.

    शेलसूर सारख्या एका छोट्या खेडेगावात शेतकरी कुटूंबात जन्म घेऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि उदंड आत्मविश्वासाच्या शिदोरीवर शैक्षणिक, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या प्रभावी कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे प्रा. विजय घ्याळ एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. निश्चितच ते आदर्श शिक्षक राज्यपुरस्कार पुरस्कारासाठी दखलपात्र आहे असे मला वाटते.

# प्रा दिगंबर कानडजे, मधुकोष 

सागवन, बुलडाणा (८२७५२३१८७४)

Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व