समाजसेवक: बंडूकाका बच्छाव
सामाजिक कार्याची जाण असणारे समाजसेवक: बंडूकाका बच्छाव
---------------------------------------------------------------------------
काही काही माणसं अगदी साधी असतात. साधी कामं करतात. साधी राहतात. त्यांचं कधी कौतुक केलं जात नाही. पण ती आपल्या मनात घर करून राहतात."सालिंग" हा एक नार्वेजीयन शब्द आहे. कोणी जर इतरांपेक्षा वेगळे असेल तर त्याला सालिंग असे म्हणतात. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशी अनेक माणसे असतात, जी वेगवेगळ्या बाबींमुळे त्यांच्या कार्याचा ठसा जनमाणसात उमटवतात. नात्यागोत्यात अथवा मित्रांमध्ये कधी कोणाचा स्वभाव भटकळ असतो; पण तो मदतीला धावून येतो याला देखील सालिंगच म्हणतात. अशा माणसांना अवलिया असे देखील म्हणतात.नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील बंडू काका बच्छाव हे बाराबलुतेदार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांना देखील अवलिया म्हटले तर वावगे ठरू नये असे मला वाटते. त्यांचे सामाजिक कार्य आणि धार्मिक कार्य फार तोलामोलाचे आहे. त्यांना समाजकार्याचे वेड आहे. ते कोणतीही योजना भान ठेवून आखतात आणि ती योजना ते बेभान होऊन राबवितात. हाती घेतलेले कोणतेही काम ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही. दुसऱ्याच्या सुखात त्यांचे स्वतःचे सुख सामावलेले असते.
सेवाभाव हा बंडू काका बच्छाव यांच्या कार्याचा विशेष होता आणि तो आजही टिकून आहे. मानवसेवा हिच ईश्वरसेवा हा त्यांच्या आयुष्यभरातील कार्याचा ध्यास होता. या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्य केले.आजही त्यांचे समाजकार्य चालूच आहे. गेल्या अनेक वर्षातील त्यांच्या कार्याचा लेखाजोगा विचारात घेतला तर ते खरोखर एक परोपकारी व्यक्तिमत्व आहे असे मला वाटते.
त्यांचे सामाजिक कार्य बघता 2018 मध्ये काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत बंडू काकांनी ऐन उन्हाळ्यात चौकटपाडे, टेहरे, दाभाडी, श्रीरामनगर, गिसाका, बजरंगवाडी, भूतपाडे, कंक्राळे,वनपट या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर मोफत पुरवले आणि जनसामान्याची तहान भागवण्याचा खारीचा वाटा उचलला. त्यांनी यथाशक्ती जे जे करण्यासारखे आहे ते केले. विशेष म्हणजे या पिण्याच्या पाण्याचे पाच टँकरचे लोकार्पण सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते केले. याप्रसंगी सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की 'अरे समाजाला लुटून खाणारे बदक कितीही जन्माला येतात; पण समाजासाठी धावणारे,पदरमोड करून सेवा देणारे बंडू काकासारखे राजहंस फार कमी असतात. त्यांना सांभाळा आणि स्वतःचा चांगला फायदा करून घ्या.' संकटांवर मात करून जगायला शिका हा संदेश बंडू काका बच्छाव यांनी त्या प्रसंगी जनतेला दिला.
तसेच बंडू काकांनी स्वतःच्या आजी स्वर्गीय केदाबाई आणि मित्राची पत्नी स्वर्गीय वर्षाताई यांच्या स्मरणार्थ दोन वैकुंठरथ आणि दोन शवपेटिका मालेगावला अर्पण केल्या. सर्वसामान्य जनतेचे हाल होऊ नये ही त्यांची त्यामागची प्रमुख भूमिका होती. त्यांनी बारा बलुतेदार मित्रमंडळ नावाची एक संस्था स्थापन केली होती. ते त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहे.हा त्यांनी समाजोपयोगी उपक्रम बारा बलुतेदार मित्रमंडळामार्फत पुढाकार घेऊन राबविला.
दिनांक 7 नोव्हेंबर 2019 रोजी ''वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" या उक्तीप्रमाणे त्यांनी चांगले काम केले. त्यांनी बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने कवट, लिंब, जांभूळ ,आंबा, सिताफळ, रामफळ, अंजन, पळसपापडी, बेल, करंजी अशी जवळपास 600 देशी झाडे मित्रांच्या सहकार्याने लावून घेतली. केवळ वृक्षारोपणच केले नाही तर वृक्षारोपण करण्यापूर्वी पाण्याची टाकी, पाईपलाईन आणि ड्रीप ची व्यवस्था देशी झाडे जगवण्यासाठी करून दिली. केवळ झाडे लावून भागत नाही तर ती जगण्यासाठी सर्वप्रथम व्यवस्था केली पाहिजेत ही जाणीव जागृती त्यांनी या उपक्रमातून जनतेला करून दिली. वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन आणि जतन करणे ही काळाची गरज असून हा पर्यावरणपूरक उत्तम असा उपक्रम आहे हा संदेश त्यांनी नागरिकांना दिला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक झाले.
पिण्याचे पाण्याची तीव्रता जशी जनतेला जाणवत होती तसेच मुक्या जनावरांना देखील जाणवत होती. तेव्हा अशाप्रसंगी शासनाच्या मदतीला यांनी जोड दिली आणि कंक्राळे व दाभाडी येथील गोशाळेला पाणी आणि चारा देऊन त्यांना यथाशक्ती आर्थिक मदत दिली. यातून मुक्या प्राण्यांविषयी असलेला त्यांचा जिव्हाळा सिद्ध होतो. गोशाळा संचालक श्री राजूभाऊ सराफ, पवनजी टिबडेवाल व रविश मारू यांनी बंडू काका आणि कमलाकर पवार यांचेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
28 नोव्हेंबर 2020 रोजी मालेगावातील रमजान पुरा भागात अचानक आग लागली आणि काही मुस्लिमांची घरे अग्नी मध्ये भस्मातात झाली. त्यांच्यावर फार मोठी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली होती.या दरम्यान बंडू काका यांच्या प्राजक्ता नामक मुलीचा विवाह झाला होता. या विवाहप्रसंगी लग्नात आहेराच्या निमित्ताने जमा झालेली बारा लाख रोख रक्कम त्यांनी आगपिडित मुस्लिम बांधवांच्या घर पुनर्बांधणीसाठी मदत म्हणून दिली. बंडू काकांचा हा समाजसेवेचा आगळा वेगळा अनोखा उपक्रम खरोखर उल्लेखनीय आणि अभिमानास्पद आहे. हा एक त्यांनी समाजामध्ये एक चांगला आदर्श घालून दिला असे म्हटले तर वावगे ठरू नये असे मला वाटते.
असे म्हणतात शंभरात एखादा शूर असतो तर हजारात एखादा विद्वान पंडित असतो आणि हजारात एखादा उत्तम वक्ता असतो; परंतु दातृत्वाचा गुण असणारा लाखात एक असतो, परंतु बंडू काका हे त्यापैकी एक दानशूर व्यक्तिमत्त्व होते असे मला वाटते. दिवाळीनंतर तुळशीचे विवाह झाल्यानंतर लग्न समारंभाला सुरुवात होते. लग्न जुळल्यानंतर वर-वधूच्या दारी एक रूढी परंपरा म्हणून हिरवा मांडव घातला जातो ; तेव्हा आंबा, जांभूळ, उंबर यांच्या फांद्याचा वापर केला जातो. वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळून ग्लोबल वार्मिंग मध्ये सतत वाढ होत जाते ऑक्सिजनचा देखील पुरवठा कमी होऊ शकतो. पाऊस देखील कमी पडतो. तेव्हा हिरव्या मांडवासाठी झालेली वृक्षतोड निश्चितच घातक आहे असे बंडू काकांना वाटले.यांनी या बाबींचा गांभीर्याने विचार केला आणि केवळ पाच फांद्या आणून एक रुढी परंपरा म्हणून मुलीच्या लग्नाचा हिरवा मांडव घातला होता. तसेच वऱ्हाड मंडळीला वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून देशी झाडांच्या कलमा वाटप केल्या होत्या. खरोखर "झाडे लावा, झाडे जगवा, जीवन वाचवा" हा संदेश त्यांनी याप्रसंगी कृतीतून दिला. याला म्हणावं लागेल बंडू काकाची दूरदृष्टी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन!
अयोध्येतील राम मंदिर निर्माण कार्यासाठी बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक तथा माजी बाजार समितीचे संचालक बंडूकाका यांनी स्वतःची आणि काही देणगी द्वारे असे एकूण जवळपास 6 लाख रुपये जमा करून दिले. धार्मिक कार्यासाठी मदत करण्यात त्यांना विशेष आनंद वाटतो. मालेगाव येथील बंडू काका बच्छाव हे एक अफलातून व्यक्तिमत्व आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये असे मला वाटते. ते एक समाजशील विकासाभिमुख,संवेदनशील आणि मानवी जीवनाच्या हिताची कामे करणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे असे मला वाटते.
# प्रा दिगंबर कानडजे, मधुकोष,
सागवन-बुलडाणा (८२७५२३१८७४)