एक देवमाणूस: बंडूकाका

         

      

समाजामनातील वेदनांवर फुंकर घालणारा एक देवमाणूस: बंडूकाका

---------------------------------------------------------------------------

     बंडूकाकांचे सामाजिक कार्य जगावेगळे आहे.नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील आंबेडकर नगर येथील गोष्ट. येथील कासुबाई सखाराम देवरे यांचा लहान मुलगा आणि सून अकाली मरण पावली. यांचा मोठा मुलगा देखील दुर्दैवाने कोराना काळात दगावला. संकटामागे संकटे आली, तरीही आजीबाई हतबल झाल्या नाही. त्यांनी धीर सोडला नाही. जेथे आभाळच फाटले तेथे ती थीगळ कितीक लावणार? अशी आजीची गत झाली होती.आजीची दोन लहान नातू परी आणि सोहम‌. आजी कासुबाई नातवंडांसाठी रोज मोल मजुरी करायची. प्रसंगी हमाली सुद्धा करायची. अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवून नातवंडांचे शिक्षण करणे तिच्यासाठी अवघड झाले होते. आजीबाईची ही करूण कहाणी बंडूकाकांना मात्र वृत्तपत्रातून वाचायला मिळाली. बंडूकाका हे फार संवेदनशील. कासूबाईची व्यथा आणि कथा वाचून ते भावनाप्रधान झाले. त्यांना राहवले नाही. त्यांनी लगेच आजीबाईचे घर गाठून महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका कडूताई यांच्या शुभहस्ते आजीबाईचे पालकत्व मोठ्या मनाने स्विकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला त्यांनी आजीबाईला घर बांधून देण्याचे वचन दिलेआणि ते ठराविक कालावधीत बांधून दिले. इतर काही सामान देऊन आजीबाईच्या जीवनात दिवाळी आणली. याला म्हणतात मानवतेचा पुजारी! दीन दलितांचा कैवारी , सर्व सामान्यांचा आधारवड ! कोणताही जातीभेद न मानता त्यांनी आजीची आणि नातवंडांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली. या अनोख्या स्तुत्य उपक्रमामुळे बंडूकाकांचे पंचक्रोशीतून स्वागत झाले ‌.

     " शुध्द बिजापोटी ,फळे रसाळ गोमटी " या उक्तीप्रमाणे त्यांची मुलंबाळं देखील समाजशील आणि संस्कारक्षम निघालीत. बंडू काका बच्छाव यांची कन्या प्राजक्ता.हिच्या विवाहप्रसंगी बंडू काकांनी तृतीयपंथीयांचा घरी बोलावून यथोचित मान सन्मान केला. या मानसन्मानाला भारावून जाऊन लग्नानंतर केवळ पाच दिवसांनी तृतीयपंथीयांचे प्रमुख आणि इतर बंडूकाकांच्या घरी आले. त्यांनी मुलीला आणि जावयाला 51 हजार रुपये हातात भेट म्हणून दिले आणि त्यांना भावी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात. ‌शिवाय बंडू काकांचा भेटवस्तू आणि कपडे देऊन भावपूर्ण सत्कार केला. जगाला एकपट प्रेम दिले तर आपल्याला दहापट प्रेम मिळते हा संदेश त्यांनी या प्रसंगातून समाजाला दिला. तृतीयपंथीयांचा आपण सर्वांनी मानसन्मान राखला पाहिजे.त्यांच्या संवेदना, भावना आणि चालीरिती आपल्या सारख्याच असतात. आपण सर्वांनी तृतीयपंथींयांना माणूसकीची वागणूक दिली पाहिजे,असे विचार या प्रसंगी बंडू काका बच्छाव यांनी सांगितले.

    कोरोना ही जागतिक महामारी आली. सर्वचजण घाबरून गेले. या महामारीत कोरोनाबाधित रुग्णांना कोणीही सहानुभूतीपूर्वक वागणूक देत नव्हते. त्यांचेशी भावनिक संवाद साधला जायचा नाही. बहुतांश कोरोना रुग्ण त्यांना भावनिक आणि मानसिक आधार न मिळाल्यामुळे दगावले. अशा रुग्णांच्या अंत्यसंस्काराला देखील दहा-वीस लोकांशिवाय कोणीही उपस्थित राहत नव्हते. रक्ताचे नाते पारखे झाले होते. स्वतःची मुले अथवा नातलग सुद्धा अंत्यसंस्कार करायला घाबरत होते. अशा परिस्थितीत बंडू काकांनी स्वतः हजर राहून इतर मित्रांच्या सहकार्याने अशा कोरोनाग्रस्त रुग्णांवर अंत्यसंस्कार करुन घेतले.मालेगाव येथे कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी बारा बलुतेदार मित्र मंडळ सदैव तयार असायचे. यांच्या सहकार्याने बंडूकाका यांनी ''राम रहीम कोविड सेंटर'' सुरू केले होते. साठ बेडांचे हे सेंटर डॉ. पुष्करजी इंगळे, डॉ. उज्वलजी कापडणीस, कमलाकर पवार, योगेश पवार आणि शफिकभाई यांच्या सहकार्याने कार्यान्वित केले होते.

      जीवाची तमा न बाळगता जवळपास 300 कोरोना योद्ध्यांचा या कार्यामध्ये सहभाग होता‌. या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल तत्कालीन आरोग्यमंत्री भारतीताई पवार आणि आमदार निलेश लंके यांचेकडून साडीचोळी, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करुन घेतला. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून या मित्रांनी सेवा दिल्याबद्दल बंडूकाका हे भावूक झाले‌ होते.

     मालेगाव कॅम्प येथील श्री अशोक दामू मोरे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत काही रक्कम अल्पबचत म्हणून ठेवली होती. काही दिवसा नंतर श्री मोरे यांच्या पत्नी दुर्धर आजाराने मृत्युमुखी पडल्या,तेव्हा त्यांना त्यांची रक्कम औषध उपचारासाठी बँकेकडून मिळाली नाही.ते खूप दुःखी कष्टी झाले. मात्र बँकेला दया आली नाही. पुढे श्री अशोकराव मोरे यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यात ते विकलांग झाले. संकटांची जणू त्यांच्यासाठी मालिकाच तयार झाली होती.मोठ्या मुलाला कॅन्सर झाला. अशा कठीण परिस्थितीत बँकेतील ठेव रक्कम मोरे कुटुंबाला मिळवून देण्यात बंडूकाका बच्छाव यांचे महत्वाचे सहकार्य लाभले.कोणत्या शब्दांत बंडूकाकांचे आभार मानू असे त्यांना झाले होते. संकटकाळी धावून आलेले बंडूकाका त्यांच्यासाठी देवमाणूस ठरले. त्यांचा कंठ दाटून आला.

               बंडू काकांना शिक्षणाची विशेष आवड होती. शिक्षणाने माणूस मोठा होतो,हे ते जाणून होते. गोरगरीब,आदिवासी, दलित पददलित आणि सर्वसामान्य बहुजन विद्यार्थ्यांसाठी 16 डिसेंबर 2022 ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर ठेवले होते. त्यांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि तज्ञ मार्गदर्शक सचिन ढवळे सर, राजेश भराटे सर आणि प्रा. आशालता गुट्टे यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले होते.

 2023 मध्ये गोरगरीब दलित व सर्वसामान्य मजुरांच्या मोफत उपचारांसाठी त्यांनी क्षेत्र खंडोबा येथे एक भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात जवळपास 1100 गरजू रुग्णांनी सहभाग नोंदविला. अनेक गंभीर आजाराचे या शिबिरामार्फत मोफत निदान होऊन ऑपरेशन करून घेतले. या उपक्रमाचे पंचक्रोशीतील नागरिकांनी बंडूकाकांचे शतशः आभार मानले.‌

मालेगाव तालुक्यातील एरंडगाव येथील विजय देवरे इयत्ता दुसरी मध्ये शिकत होता. त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी होते. या चिमुकल्या विजयच्या मांडीमधील अतिरिक्त वाढलेले हाड ऑपरेशन करून काढावे लागले.''राष्ट्रीय बाल स्वास्थ्य व समग्र शिक्षा'' या योजनेअंतर्गत हे ऑपरेशन मोफत करून घेतले. अनेक नागरिकांना वेगवेगळ्या योजनांची माहिती नसते. त्यामुळे ते या योजनेपासून वंचित राहतात. तेव्हा प्रत्येक गावातील नागरिकांना मोफत सुविधांची माहिती सांगणे; प्रसंगी स्वतः भाग घेऊन त्या योजनेचा लाभ मिळवून देणे हे काम बंडू काका स्वतः जातीने लक्ष घालून करून घेत असे.

तसेच मथुरपाडे येथील रिक्षा चालक सुरेश काकडे यांच्या मुलीच्या हृदयाला छिद्र होते. हे ऑपरेशन खर्चिक होते. तरीही बंडूकाका बच्छाव यांनी या केसमध्ये लक्ष घातले. स्वतः मुलीला गाडीत नेऊन सर्वनिदान शिबिरामध्ये भरती केले आणि डॉक्टरला खरी परिस्थिती सांगून या मुलीचे मोफत ऑपरेशन करून दिले.रिक्षाचालकांनी बंडू काकांना देवमाणूस मानून त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

 मज्जिद मध्ये साफसफाईचे काम करणारे बांगी व इमाम यांची उमराह व हज यात्रा स्वतःच्या पैशाने घडवून आणली. तसेच मंदिरात सेवाधारी म्हणून काम करणाऱ्या वारकरी संप्रदायातील 50 सेवेकरांना दोन धाम यात्रेस पाठविले. त्यांची यात्रा स्वखर्चाने घडवून आणली. खरोखर केवढे हे औदार्य, आत्मियता आणि सहानुभूती! अनाथांचा नाथ बंडूकाका बच्छाव खरोखर यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्य वाखाणण्याजोगे आहे.यांच्या कार्याला सलाम‌. तसेच यांच्या कार्यापासून अनेकांनी समाजकार्य करण्याच्या बोध घ्यावा असे मी आवाहन करतो.

प्रा. दिगंबर कानडजे, (8275231874)

मधुकोष , सागवन-बुलडाणा

Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व