स्वरसाधक संगीताचार्य: श्री अरविंद टाकळकर
स्वर साधक,संगीत उपासक शिक्षक : श्री अरविंद टाकळकर
बुलढाणा शहरातील अरविंद रामकृष्ण टाकळकर हे एक नामांकित सेवानिवृत्त संगीत शिक्षक असून त्यांचा सर्वदूर असा नावलौकिक आहे. १० डिसेंबर १९५९ रोजी त्यांचा बुलडाणा शहरात जन्म झाला. त्यांनी आजरोजी ६६ व्या वर्षांमध्ये पदार्पण केले असून ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अत्यंत सक्षम, आनंदी आणि समाधानी आहे. तसे सरांचे मुळगाव नांदुरा तालुक्यातील अलमपूर आहे. मात्र नोकरीनिमित्त ते बुलढाणा येथे स्थायिक झाले असून अनेक वर्षांपासून त्यांचे बुलडाणा येथे वास्तव्य आहे.
त्यांचे वडील रामकृष्ण गोविंदराव टाकळकर हे शिक्षणाने सिनियर पीटीसी आणि संगीत विशारद होते. तर त्यांची आई सरस्वती यांचे ज्युनिअर पीटीसी असे शिक्षण झाले होते. त्यांचे वडील बुलडाणा येथील नगरपालिका मराठी प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर त्यांची आई शिक्षिकेसाठी पात्र होत्या; परंतु कौटुंबिक जबाबदारीमुळे त्या नोकरी करू शकल्या नाही. त्यांच्या वडिलांनी लहान भावाला श्रीरामला बीएससी ॲग्री केले होते आणि शांताबाई व कुसुम या बहिणींना देखील उच्च शिक्षित करून त्यांची चांगल्या घरी लग्नं करून दिली होती.
अरविंद टाकळकर सरांना अविनाश,रवीकिरण आणि नरेंद्र ही तीन भावंडे. सध्या अविनाश हे बांधकाम विभागातून कनिष्ठ अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहे आणि रवीकिरण एक उत्कृष्ट छायाचित्रकार व प्रेस फोटोग्राफर म्हणून बुलडाणा नगरीत त्यांचा नावलौकिक आहे. सध्या ते प्रगती वाचनालयाचे सचिव म्हणून काम पाहत आहे.
अरविंद टाकळकर यांचे प्राथमिक शिक्षण बुलढाणा येथील नगरपालिकेत झाले.वडील शिक्षक असल्यामुळे त्यांना शिक्षणाची चांगली संधी चालून आली होती.मात्र आर्थिक परिस्थिती जेमतेम आणि वडिलांचा पगार देखील नाममात्र. तेव्हा रेग्झिनच्या थैलीत पितळी डब्यात भाकरी आणि काही पुस्तके कोंबून अरविंद पायी चालत जाऊन वेळेच्या आत शाळेत जात असे. त्यांचे पाचवी ते आठवी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत झाले. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मात्र त्यांनी एडेड हायस्कूल बुलढाणा येथे १९७५ ला पूर्ण केले. सुवाच्च हस्ताक्षर, नीटनेटकी मांडणी आणि मुद्देसूद अभ्यास यामुळे दहावीत सरांना चांगले गुण मिळाले.त्यामुळे सरांचे घरादारातून आणि शाळेतून तोंडभरून कौतुक झाले. तो त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण होता.
शिकण्याची ओढ आणि जिद्द असल्याने त्यांनी लगेच श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला.सुवाच्च हस्ताक्षर, निटनेटकी व मुद्देसूद मांडणी यामुळे परीक्षक मंत्रमुग्ध होऊन जायचे. १९७७ साली सर बारावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांचे वडील शिक्षक असल्यामुळे अरविंद टाकळकरांच्या डोक्यात शिक्षक होण्याचा विचार आला. बारावीचे चांगले गुण असल्यामुळे त्यांना गुणवत्तेच्या आधारावर यशवंत अध्यापक विद्यालय बुलढाणा येथे डीएडसाठी प्रवेश मिळाला. सरांनी खूप मेहनत घेतली. विविध कार्यक्रमांत भाग घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील सर्व डीएड कॉलेजमधून १९८० मध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. हा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना झालेला आनंद अवर्णनीय, विलक्षण आणि अविस्मरणीय होता.
सरांना बालपासून वादन, गायन, संगीत यात विशेष रस होता. त्यामुळे सर तबला आणि संगीत विशारद परीक्षा सहज उत्तीर्ण झाले. संगीत आणि तबला विशारद असल्यामुळे अनेक शाळेत सरांची मागणी वाढली. परंतु सारासार विचार करून शेवटी सर १ सप्टेंबर १९८० रोजी श्री शिवाजी हायस्कूल बुलढाणा येथे संगीत शिक्षक म्हणून रूजू झाले.
आजी पार्वतीबाई यांना मात्र नातसून पाहण्याची फार घाई. शेवटी आजीच्या इच्छेखातर सरांनी २३ मे १९८३ रोजी जळगाव जामोद येथील सोनाजी काळपांडे यांच्या कुसुम नामक मुलीशी विवाह केला. त्यांच्या पत्नीचा स्वभाव सोज्वळ ,सरळ, प्रेमळ, सेवाभावी आणि निगर्वी होता. माहेरावरून आलेल्या भाग्यश्रीने आपल्या सासरच माहेर कसं केलं हे कळलेच नाही, एवढी ती त्यांच्या कुटुंबात एकजीव झाली. लग्न झाले तेव्हा भाग्यश्री केवळ दहावा वर्ग पास होती. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ती पदवीधर होऊन पुढे संगीत विशारद देखील झाली.आज रोजी ती घरप्रपंच सांभाळून फावल्या वेळात आनंदाने संगीताचे क्लासेस घेते. सरांच्या कौटुंबिक विकासात भाग्यश्री ताईचे फार मोठे योगदान आहे, असे मला वाटते.
पंडित विनयचंद्र मोदगल आणि पंडित कानू घोष यांच्याकडून विविध १५ भाषेतील गाणी शिकण्याचा टाकळकर सरांना योग आला. याचा फायदा सरांनी विद्यार्थ्यांना करून दिला.सरांनी शाळेत विद्यार्थ्यांचा गीत मंच स्थापन केला. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून शाळेसाठी अनेक बक्षिसे मिळवून दिलीत. शिवाय आकाशवाणी जळगाव केंद्रावर विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम देखील सादर केले. ही या शाळेसाठी एक फार मोठी उपलब्धी होती.
टाकळकर सरांनी वडील भाऊ यांना त्याने कुटुंबाचे दायित्व स्वीकारले त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी शक्य होईल ती मदत केली. प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने विद्यार्थी हे दैवत म्हणून त्यांच्या गुणात्मक विकासासाठी सदैव झटत राहिले. परिसरातील गुणवान विद्यार्थ्यांना हेरून त्यांना तबला आणि गायन याविषयी मार्गदर्शन केले. अनेक नागरिकांमध्ये संगिताची गोडी निर्माण करून दिली. या सर्व चांगल्या कामाची पावती त्याची चांगली फळे त्यांच्या कुटुंबियांना मिळाली. त्यांचा मोठा मुलगा अनुप हा एम आर्च (M.Arch.) असून तो गुरगाव दिल्ली येथे आहे. त्याची पत्नी रिगा ही देखील एम.आर्च. (M.Arch.) आहे . त्यांचे विविध प्रोजेक्ट्स सध्या भारतभर सुरू आहेत.
सरांचा लहान मुलगा निषाद हा एमए, डीएड आणि संगीत विशारद असून तो जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा तरोडा येथे शिक्षक आहे; तर त्याची पत्नी संजीवनी ही एमए डीएड आणि संगीत विशारद असून ती जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, गोंधनखेड येथे शिक्षिका आहे.
एकूणच टाकळकरांचे कुटुंब संगीतमय असून त्यांनी संगीताचा वडिलोपार्जित असा वारसा जपला असून तो पुढे चालत राहावा यासाठी ते प्रयत्नशील आहे. सरांचे बाबा रामकृष्ण टाकळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ते दरवर्षी एका संगीत मैफलीचे आयोजन करतात आणि त्याप्रसंगी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून वाटतात.
अरविंद टाकळकर सरांनी जवळपास 37 वर्षे संगीत शिक्षक म्हणून श्री शिवाजी शाळेमध्ये संगीताची साधना केली. संगीताची गोडी लागावी म्हणून ते दरवर्षी संगीत क्लासेस घेतात. अनेक गरीब विद्यार्थ्यांना संगीत विशारद होईपर्यंत ते मोफत संगीत शिक्षण देतात. त्यांना सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याची आवड असून त्यांनी अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन केले आहे.
संगीत साधना ही एक तपश्चर्या आहे. संगीत विविध भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे. सरांनी प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने संगीताची उपासना केलेली आहे असे मला वाटते. पुरस्कार हा काही मागून मिळत नसतो, तो स्वतःहून घरी चालत आला पाहिजे असे मला वाटते. अरविंद टाकळकर सरांना सर्व पुरस्कार घरी चालून आले आहेत. त्यांच्या कार्याचा पावती म्हणून त्यांना 2015 मध्ये जन शिक्षण संस्था बुलढाणा तर्फे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, 2016 मध्ये उत्कृष्ट शिक्षक गौरव पुरस्कार , 2017 आणि 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य सह्याद्री सांस्कृतिक कला प्रतिष्ठान बुलढाणा यांच्यातर्फे सन्मानपत्र देऊन सरांना गौरविण्यात आले आहे.
#. प्रा दिगंबर कानडजे (८२७५२३१८७४)
मधुकोष निवास, सागवन-बुलडाणा