बेरोजगार युवकांसाठी एक आशेचा किरण : सागर कानडजे

 

बेरोजगार युवकांसाठी एक आशेचा किरण : सागर कानडजे 

      बुलढाणा जिल्ह्यातील कुलमखेड येथील सागर राजेंद्र कानडजे हा आज रोजी केवळ पंचवीस वर्षाचा असून तो नेव्ही मध्ये खाजगी कंपनीत "ट्रेनी नेव्हीगेटींग डेक ऑफिसर " म्हणून काम करतो आहे. तर फावल्या वेळात तो मर्चंट नेव्ही करिअर इन्स्टिट्यूट चे संचालक म्हणून काम पाहतो आहे. एका सामान्य घरातील, गरिबीने माखलेल्या कुटुंबात तो मोठे होण्याचे स्वप्न पाहतो आहे.

       नातलगांच्या आधाराने स्वतःच्या हिंमतीवर शिकायचे. तेव्हा सागरने निवासी आश्रम शाळा धावडा, तालुका भोकरदन, जिल्हा औरंगाबाद या शाळेत पहिलीत प्रवेश घेतला. दहा बाय बारा साईजच्या कुडाच्या साध्या खोलीत दहाबारा मुलांच्या सोबत राहून शिक्षण घेतले. ती शाळा जरी साधीसुधी असली तरी निसर्गाने नटलेली खरी आश्रम शाळा होती. सागरचे तेथे मन रमले. त्या शाळेमध्ये झाडे लावणे, झाडाला पाणी घालणे, स्वतः खोल्या गाईच्या शेणाने सारवणे ही कामे त्याने स्वखुशीने आणि आनंदाने केली. त्याकाळी शिक्षणासाठी पुस्तके विकत घेण्याची सोय नव्हती.तेव्हा दहा बारा विद्यार्थ्यांनी एकमेकांची पुस्तके आलटून पालटून घेऊन वाचली. 

          आता पुढे कुठे कसे शिकायचे? हा प्रश्न सागरला पडला. परंतु सागरची शिकण्याची तीव्र इच्छा लक्षात घेता त्याला धाड येथील सहकार विद्या मंदिरात वडिलांनी सेमी इंग्लिशला सहावीत प्रवेश घेऊन दिला. तो कधी एसटीने तर कधी ४-५ किलोमीटर पायी चालत जावून शाळेत जायचा .घरी सतत कामामुळे सागरला अभ्यासासाठी कमी वेळ मिळायचा.परंतु जिद्द,चिकाटी, अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण संघर्ष करून पूर्ण केले. कमी मार्क्स मिळाल्यामुळे सागर नाराज न होताच आता पुढे काय करता येईल,याचाच जास्त विचार करू लागला.त्याने ५-७ किलोमीटर पायी चालत जाऊन राजर्षी शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालय म्हसला बुद्रुक येथे विज्ञान शाखेची बारावी बोर्डाची परीक्षा मार्च 2018 मध्ये उत्तीर्ण केली.

      वडिलांची इच्छा होती की मुलाने डॉक्टर व्हावे, परंतु नीट मध्ये कमी गुण मिळाल्यामुळे ते सागर कडून शक्य नव्हते. केवळ वडिलांची इच्छा मुलांवर लाधून चालत नाही,तर त्यासाठी क्षमता आणि शैक्षणिक पात्रता देखील असावी लागते, तिथे मात्र सागर कमी पडला. शेवटी सागरने जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथे बीएस्सीला (मायक्रो बाॅयलाॅजी) प्रवेश घेतला. एनसीसीची आवड आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे त्याला एनसीसी मध्ये सहज प्रवेश मिळाला. या दरम्यान संरक्षण खात्यात भरती होण्यासाठी देखील वारंवार प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. शेवटी खूप अभ्यास करून तो 2021 मध्ये बीएससी उत्तीर्ण झाला. 

     सागर जरी नावाने सागर असला तरी तो आतून शांत नव्हता. तो बेचैन व्हायचा. आपल्याला काहीतरी वेगळे करून दाखवायचेच, या ध्येयाने प्रेरित होऊन तो आतून बाहेरून पेटून उठायचा.अभ्यासिकेत जावून लॅब टेक्निशियन म्हणून नोकरी मिळते का,याचा प्रयत्न केला. परंतु नोकरी मिळण्याची चिन्ह दिसेना, शेवटी तो वेगळ्या क्षेत्राकडे वळला. पुन्हा वेगळ्या दिशेने सागरचा प्रवास सुरू झाला.आता काहीतरी नवीन करायचंच,हा विचार घेऊन सागर घराबाहेर पडला.

     धिरज आत्माराम पारवे (नेव्ही मरिन इंजिनिअर) नावाचा एक गावचा मित्रा भेटला, मित्राने नेव्ही बद्दल बरीच काही माहिती दिली. तो नेव्हीत मरिन इंजिनिअर म्हणून सरकारी नोकरीला लागला होता. त्याने हिंमत दिली. सागरने नव्या दमाने देशमुख सरांच्या ॲकेडमीमध्ये प्रवेश घेऊन खूप मेहनत घेतली. मित्राच्या सल्ल्यानुसार सागरने तामिळनाडू राज्यातील कोईमत्तूर येथे डिप्लोमा इन नॉटिकल सायन्सला(डीएनएस) १२ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रवेश घेतला. 

तेथे भाषेची समस्या, जेवणाची समस्या ह्या सतत भेडसावत होत्या, सागरने त्यावरही मात केली. प्रसंगी अर्धपोटी राहून शिक्षण घेतले.शेवटी १९ नोव्हेंबर २०२१ रोजी डीएनएसचा डिप्लोमा कोहिमतूर येथून यशस्वीरित्या पूर्ण करून तो गावी परतला. नंतर पुढे त्याला एका खाजगी नामांकित कंपनीत (रेड सी) पहिली नियुक्ती झाली.सौदी अरेबिया या देशांमध्ये 13 मार्च 2022 रोजी तो 'याबू फोर' या जहाजावरती "ट्रेनी नेव्हीगेटींग डेक ऑफीसर" म्हणून रुजू झाला. 

  खाजगी कंपनीत मर्चंट नेव्ही मध्ये सहा महिने जहाजावरती काम आणि सहा महिने घरून काम (Work from home)आणि पुन्हा नंतर सहा महिने परत कामावर. अशी जॉइनिंगची पध्दती होती. प्रत्येक वेळी ड्युटी बदलायची.देश बदलायचा. नंतर तो दुबईला "सना मरीन" मध्ये फाल्कन या जहाजावरती रुजू झाला. असा त्याचा जहाजांद्वारे गल्फकंट्री मध्ये म्हणजेच सौदी अरेबिया, दुबई, इराण, इराक, इजिप्त, पनामा कॅनॉल , मालद्विव, हॉंगकॉंग ,सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमध्ये नोकरीनिमित्त प्रवास झाला. त्यामुळे वेगवेगळ्या देशाची संस्कृती,रितिरिवाज आणि भौगोलिक परिस्थितीचा अनुभव आला.

 घरी असताना किमान दोनतीन तास "वर्क फ्रॉम होम" करतो.फावल्या वेळात त्याने बुलढाणा येथे "मर्चंट नेव्ही करिअर इन्स्टिट्यूट" स्थापन केली. येथे तो शालेय विद्यार्थ्यांना आर्मी ,नेव्ही, एअर फोर्स, पोलीस स्टाफ सिलेक्शन, डिफेन्स , अशा क्षेत्रातील पदांच्या भरतीसाठी मार्गदर्शन करतो. या कोचिंग क्लासमुळे चिखलीचा ऋषिकेश सोनवणे, कोलवडचा प्रदीप गायकवाड, बुलढाण्याचा सुजल बेंडवाल, जाफराबादचा रवींद्र बिलगे, दुधा येथील हृतिक शेलार, शिरपूरचा तुषार शेळके, केसापूरचा मोहन जगदाळे, जाफराबादचा रवींद्र केवट,अंभोडा येथील मनोहर, सिल्लोडचा आदिनाथ पाचपुते हे विद्यार्थी मर्चंट नेव्ही मध्ये भरती झाले.आज ती मुले यशस्वीरित्या जहाजावरती काम करीत असून कुटुंबाला घरी आर्थिक मदत करतात.

    महत्त्वाची गोष्ट म्हणजे मर्चंट नेव्ही करिअर इन्स्टिट्यूट कोणालाही चालवता येत नाही. या इन्स्टिट्यूटसाठी एक आरपीएस लायसन्स लागते, ते सागर जवळ आहे. त्याने स्वतः मर्चंट नेव्ही मध्ये नेविगेटिंग डेक ऑफिसर म्हणून काम केले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मर्चंट नेव्ही मध्ये कोचिंग क्लासच्या माध्यमातून भरती व्हावे असा त्याचा मानस आहे.

        # प्रा दिगंबर कानडजे,(८२७५२३१८७४)

           मधुकोष , सागवन-बुलडाणा






 

Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व