माधवराव जुमडे - एक अष्टपैलू व्यक्तिमत्व
माधवराव जुमडे - एक अष्टपैलू व्यक्तिमत्व
----------------------------------------------------------------------
बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बुद्रुक या गावी भटक्या जमातीतील गरीब मेंढपाळ कुटुंबात माधवराव यांचा 23 जून 19954 रोजी जन्म झाला. माधवरावांचा जन्म साखळी बुद्रुक येथे जरी झाला असला तरी ते मूळचे मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील आहे. त्यांचे पंजोबा खंडू धनगर हे अंदाजे 160 वर्षांपूर्वी मेंढ्या चारत चारत भटकंती करत साखळी बुद्रुक येथे कुटुंबासह आले आणि तेथेच स्थायिक झाले. ते गाव त्यांना आवडल्यामुळे त्यांनी काही मेंढ्या विकून तेथे जमीन घेतली. माधव चेंडू जुमडे हे त्यांचे संपूर्ण नाव असून वडील मात्र त्यांना प्रेमाने गोपू म्हणायचे. आजही घरादारात, गावात, नातेवाईकात, समाजात आणि मित्र परिवारात माधवराव "गोपूनाना" या नावानेच ओळखले जातात. दप्तरी मात्र त्यांचे खरे नाव माधव आहे.
वडील चेंडू गंगाराम जुमडे हे सातवा वर्ग पास होते आणि आई सोनाबाई ह्या अडाणी,प्रेमळ आणि स्वयंपाकात सुगरण होत्या. माधवराव यांचा कुटुंबविस्तार फार मोठा होता. वडील सातवा वर्ग पास असल्यामुळे त्यांना १९३१ साली अप्रशिक्षित शिक्षक म्हणून पहिली नोकरी मिळाली, तेव्हा त्यांना केवळ ८ रुपये पगार होता. काही काळ नोकरी केल्यानंतर ते 1970 ला सेवानिवृत्त झाले. नोकरीचा कालावधी कमी मिळाल्यामुळे बाबांना फार कमी पेन्शन मिळत होते. या अल्पशा पैशांमध्ये आर्थिक कसरत व्हायची. नाव सोनाबाई हाती कथळाचा वाळा नाही, अशी गत माझ्या आईची झाली होती,असे माधवराव सांगतात. आई काटकसरी, मेहनती,कणखर आणि जिद्दी होती. जुमडे साहेबा़ंचे वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने २७ वर्षे प्रपंच सांभाळून संसाराला हातभार लावला.
माधवरावांचा धनगर समाज हा रानोमाळ आणि दऱ्याखोऱ्यात भटकंती करणारा असल्यामुळे त्यांच्या समाजात शिक्षणाचा गंध नव्हता. त्याकाळी त्यांच्या आजोबांनी मुलांमुलींची नावे धोंडू, गोंडू ,चेंडू, झेंडू, सुपडा, गिरजा अशी ठेवली होती. यावरून लक्षात येते की धनगर समाजात किती मागासलेपणा होता.
माधवचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्याकाळी खऱ्या अर्थाने आनंददायी शिक्षण होते. अंगणवाडी, बालवाडी ह्या गोष्टी तेव्हा नव्हत्या. वय वर्ष सात झाले किंवा उजवा हात डाव्या कानाला पोचला की लगेच पहिल्या वर्गात प्रवेश मिळायचा. शाळेतील शिक्षक जे काम सांगतील ते विद्यार्थी आनंदाने करायचे. कोणत्याही पालकांची तक्रार असायची नाही. शाळेतील खोल्या गाईच्या शेणाने सारवणे, झाडे लावणे,झाडांना पाणी घालणे आणि शाळेसमोरील अंगण झाडणे अशी अनेक कामे माधवाने आनंदाने केली. त्यामुळे त्यांना स्वावलंबनाची सवय लागली. तिच शिदोरी त्यांना आयुष्यभर टिकून आहे.
आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मित्रांकडून अभ्यासासाठी जुनी पुस्तके अर्ध्या किंमतीत घेतली होती. शालेय जीवनात नाटक, बँडवादन, लंगडी, चित्रकला, व्हाॅलीबॉल, मल्लखांब, गावातील नवमीत सोंग घेणे, गोट्या खेळणे,धब्बा कुट्टी करणे, सायकल चालवणे, चोरून सिनेमा पाहणे, तीन पायांची शर्यत, उंच उडी आणि बालवीर पथक अशा विविध गोष्टींत त्यांना भाग घेण्यात विशेष रस होता. मूर्ती लहान पण कीर्ती महान, असा त्यांचा लौकिक त्यांच्या समाजात निर्माण झाला होता.
माधवचा स्वभाव खटपटी आणि साहसी होता. कोणी काहीही म्हटले की त्यांनी होकार द्यायचाच आणि प्रत्यक्ष कृती करायची. असे अनेक जिवघेणे प्रसंग त्यांच्या जीवनात आले आणि त्या प्रसंगात ते नशिबाने वाचले. एकदा त्यांनी डोळे स्वच्छ होतात म्हणून मित्रांच्या आग्रहाखातर डोळ्यात लिंबू पिळून घेतले आणि नसते डोळे गमवायची वेळ आली असती पण त्यातून ते सहीसलामत सुटले. दुसरा एक प्रसंग तर त्यांच्यावर जीवघेणा आला होता. त्यांना बालवीर व वीरबाला जिल्हा मेळाव्यात "धावत्या विमानाचा" प्रसंग सादर करायचा होता. हे अवघड काम त्यांना करायचे होते. नकार शब्द त्यांच्या डिक्शनरीत कधीच नव्हता. दोन मित्रांमध्ये ते स्वतः आडवे झाले आणि दोन पाय मागच्या मित्राच्या खांद्यावर आणि दोन हात पुढच्या मित्रांच्या खांद्यावर, असे दृश्य त्यांनी साकार केले. विमान जोरात धावत असताना माधवराव बदकन खाली पडले पण ते नशिबाने वाचले. माधवरावांचे केव्हढे हे धाडस! यांना अवलिया म्हटले तर वावगे ठरू नये असे मला वाटते.
माधवराव 1971 मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले आणि 1975 ला बुलडाणा येथील जिजामाता महाविद्यालयात त्यांनी ढोरमेहनत घेऊन बीए केले. त्यांच्या आईवडिलांना विलक्षण आनंद झाला होता.कारण त्याकाळी या भटक्या समाजात पदवीधर होणे फार दुरापास्त होते. माधवराव कासवगतीने शिकत राहिले आणि एकेक परीक्षा पास होत गेले. आईवडिलांनी काही मेंढ्या विकून माधवरांची शिक्षणाची हौस भागविली.पण त्यांना काहीही कमी पडू दिले नाही. माधवरावांना शिकण्याची खूप इच्छा असल्यामुळे त्यांनी जिजामाता महाविद्यालयात जावून अर्थशास्त्रात एमए केले. पुढे शासकीय शिक्षण महाविद्यालयात 1978 मध्ये बीएड केले. नोकरी लागल्यानंतर देखील ते अविरतपणे शिकत राहिले.1981 ला बहि:शाल विद्यार्थी म्हणून त्यांनी इतिहासात एमए केले. तसेच 1984 ला एम एड सुद्धा केले. खऱ्या अर्थाने शिक्षकीपेशातील सर्वोच्च शिक्षण त्यांनी घेतले.. बीए, एमए,एमएड हे सर्व शिक्षण त्यांनी शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात राहून आनंदाने घेतले. वस्तीगृहात त्यांना कधी हाताने स्वयंपाक करावा लागला, तरी तो त्यांनी आनंदाने केला.कारण त्यांना स्वावलंबनाची आवड होती. ती या ठिकाणी कामी आली.
माधवरांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेमुळे २४ जुलै १९७८ रोजी शासकीय अध्यापक विद्यालय बुलढाणा येथे सहाय्यक शिक्षकाची नोकरी मिळाली. आरक्षण आणि उच्चशिक्षण असल्यामुळे त्यांना अनेक नोकऱ्या घरी चालून आल्या होत्या. पण त्यांनी डीएड कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून राहणेच पसंत केले.एक शिक्षक झाल्यापेक्षा अनेक शिक्षक तयार करण्यात त्यांना अभिरुची होती. त्यांच्या नोकरीतील प्रामाणिकपणा, चिकित्सक अभ्यास आणि नोकरीतील अनुभव या जोरांवर ते एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आणि गटशिक्षणाधिकारी म्हणून १९८७ मध्ये मेहकर येथे रूजू झाले. काही काळ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा येथे ते अधिव्याख्याता म्हणून राहिले होते.
कामांचा अनुभव लक्षात घेता त्यांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे प्राध्यापक म्हणून बोलावण्यात आले. तेथे त्यांनी चांगल्या गोष्टींचा अभ्यास करून पायंडा पडला. पुढे त्यांचे प्रमोशन झाले. त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती येथे सहसचिव म्हणून १ नोव्हेंबर २००५ रोजी पदभार स्वीकारला. समकक्ष पदावर शासनाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) म्हणून त्यांची अकोला येथे २००७ मध्ये बदली केली. पुढे त्यांना शिक्षण उपसंचालक विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून पदोन्नती मिळाली.
त्यांनी शिक्षक, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, सहसचिव, शिक्षणाधिकारी आणि सहाय्यक शिक्षण संचालक एवढ्या जबाबदार पदांवर एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करून आपल्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कधी माणसे दुखावली नाहीत तर माणसे जोडण्याचा अखंडपणे प्रयत्न केला. खरोखर ते उच्चपदावर जरी जाऊन पोचले असले तरी त्यांना कधी "ग" ची बाधा झाली नाही. ते एक सामान्य माणूस म्हणूनच जीवन जगले. माणूसकी हाच त्यांचा स्थायीभाव होता आणि आजही आहे. ते संयमी ,उत्साही ,आनंदी आणि हसत खेळत विनोदी जीवन जगणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे.
# प्रा. दिगंबर कानडजे (८२७५२३१८७४)
मधुकोष, सागवन-बुलडाणा