येता पावसाच्या धारा - वृक्षारोपणाची कास धरा

 येता पावसाच्या धारा - वृक्षारोपणाची कास धरा

-----------------------------------------------------------------

        वृक्षारोपण ही काळाची गरज झाली असून, त्याकडे मात्र कोणीही विशेष करून लक्ष देत नाही. गाडी ठेवण्यासाठी, थोडा वेळ विसावा घेण्यासाठी, त्या झाडाखाली जेवणं करणं असो, झाडाची सावली खूप महत्त्वाची आहे .माणसं, पशुपक्षी भर उन्हात झाडांच्या सावलीचा आसरा घेतात आणि त्या दिशेने धावत जातात. सावली जर मिळाली नाही तर जिवाची लाही लाही होते. जीव कासावीस होतो. सावलीचे महत्त्व माणसाला तापत्या सूर्यामुळे कळते. माणूस जेव्हा होरपळून निघेल तेव्हा झाडांचे महत्त्व कळेल. झाडे म्हणजेच पर्यावरण. झाडांचे महत्व 

 सजीव प्राण्यांना अथवा मानवी जीवनाला किती फायद्याचे आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही असे मला वाटते. त्यासाठी 'झाडे लावा जग वाचवा' ही चळवळ एक अभियान बनलं पाहिजे.

         वास्तविक पावसाळा आला की वृक्षारोपण आठवते. इतर ऋतूंमध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये वृक्षारोपण करून पर्यावरणामध्ये भर घालता येते. फक्त पाणी आणि माती याचे जर नियोजन केले तर कोणत्याही ऋतूंमध्ये झाडे लावता येतात. ती जगू शकतात. मात्र पावसाळा हा ऋतू झाडे लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सोयीस्कर आहे.. कारण या ऋतूमध्ये किमान चार महिने पाणीच पाणी असते. त्यामुळे बहुतांश लावलेली देशी झाडे जगतात आणि त्याला काटेरी कुंपण केले तर वाढतात. तेव्हा सामाजिक वनविभाग, स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालय यांनी न म्हणता, न सांगता देशी झाडांच्या कलमा आणून आपल्या ऐपतीनुसार आणि उपलब्ध जागेनुसार वृक्षारोपण केले पाहिजे.जर ऑफिस मध्ये 50 कर्मचारी असेल तर एक 'व्यक्ती एक झाड' दत्तक घेऊन जर वृक्षारोपण केले आणि किमान दोन वर्षं लक्ष दिले तर ते झाड मोठे होऊन टिकेल असे मला वाटते. शिवाय त्याच्या प्रवास गाडीसाठी, त्याच्या सावलीसाठी आणि ऑक्सिजनसाठी निश्चितच सोय होईल. हा वृक्षारोपणाचा उपक्रम प्रमुख अधिकाऱ्यांनी लक्ष घालून प्रामाणिकपणे राबवावा असे मी आवाहन करतो.

          आज-काल 365 दिवस वेगवेगळे ''दिन'' म्हणून साजरे करतात .उदाहरणार्थ मातृदिन, पितृदिन, पर्यावरण दिन, जागतिक महिला दिन , जागतिक वसुंधरा दिन, सौजन्य सप्ताह, असे अनेक दिन मोठ्या प्रमाणात साजरे करतात. परंतु आता एवढं करून चालणार नाही. आपण एक दिवस या घटनेसाठी समर्पित करतो आणि 364 दिवस मात्र त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतो. तेव्हा आपण तो दिवस एक दिवस साजरा न करता वर्षभर साजरा केला पाहिजे. ते अभियान अखंडपणे राबविले पाहिजेत. आपण एक दिवस पर्यावरण दिन थाटामाटात साजरा करतो. पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजेत, याचे स्मरण करून देतो. परंतु प्रत्यक्षात पर्यावरणाबद्दल आपण किती जागरूक असतो ,हा खरा संशोधनाचा भाग आहे. आपण जाहीर भाषण करतो की लग्नाकार्यात प्लास्टिक पिशव्या , ग्लास , पत्रावळी वापरु नका. परंतु आज रोजी आपण सर्वत्र पाहतो आहोत की कोणत्याही समारंभात प्लास्टिक वस्तू वापरून फार मोठा कचरा करतो आहोत. ही पर्यावरणाची हानी नाही का? जो माणूस भाषण करतो, इतरांना मार्गदर्शन करतो, पर्यावरणाची काळजी वाहतो तोच माणूस आपल्या लग्नात किंवा कोणत्याही समारंभात प्लास्टिकच्या वस्तूंचा सर्रास वापर करताना दिसतो आहे,ही फार मोठी शोकांतिका आहे. याबाबतीत कुठेतरी आत्मचिंतन करण्याची आज वेळ आली आहे. केवळ बोलके समाज सुधारक असून चालणार नाही तर प्रत्येकाने कर्ते सुधारक होण्याची गरज आहे.

          वृक्षारोपण करण्याची अनेक प्रकार आहेत. काही प्रामाणिकपणे वृक्षारोपणाचे काम करतात. कारण ते काम करण्यात त्यांना समाधान लाभते.तर काहीजण केवळ आपण प्रकाशात आलो पाहिजेत या मोठेपणासाठी काम करतात. कवी सुरेंद्र शर्मा विनोदाने वृक्षारोपणासंबंधी सांगतात की, ते एकदा रस्त्याने जात होते. एके ठिकाणी त्यांना दोन कामगार वृक्षारोपणाचे काम करताना दिसले. एक जण खड्डा खोदत होता. तर दुसरा त्याच खड्ड्यात माती टाकत होता. तेव्हा लेखकाने विचारले की तुम्ही लोक असे काय करत आहात? तेव्हा त्यांनी सांगितले की इथे तीन माणसे ड्युटीवर आहेत. एकाचे काम खड्डा खोदणे, दुसऱ्याचे काम त्यात रोप लावणे आणि तिसऱ्याचे काम पुन्हा मातीने तो खड्डा भरणे असे आहे. परंतु आज ज्याची ड्युटी वृक्ष लावण्याची होती, तोच आज सुट्टीवर आहे‌, तेव्हा आम्ही दोघेही आमचे काम प्रामाणिकपणे आणि निमूटपणे करीत आहोत." सांगायच तात्पर्य म्हणजे अशा पद्धतीने जर वृक्षारोपण करण्यात आले तर, वृक्षारोपण यशस्वी होईल का ? तेव्हा कोणतेही काम करताना भान ठेवून योजना आखली आणि ती प्रामाणिकपणे बेभान होऊन राबवली तर निश्चितच ती यशस्वी होते आणि त्यात आपल्याला समाधान देखील मिळते. तेव्हा आपण जास्तीत जास्त झाडे लावायला हवी. त्या झाडांवर लेकराप्रमाणे प्रेम करावे आणि पुढील वर्षी त्याच वृक्षांचा वाढदिवस साजरा करावा असे मला वाटते.

         जागतिक पातळीवर दोन अंशापर्यंत तापमान वाढ झाली आहे. त्यामुळे हवामानात वेगाने व अनपेक्षित बदल होत आहे .कमी दिवसात, कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याचे संकट वाढले आहे. हे सर्व बदल जागतिक हवामानाच्या बदलामुळे जाणवत आहे, असे हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी सांगितले. अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आता मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. परंतु खऱ्या अर्थाने शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध वातावरण याची कमतरता जाणवत आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड भीषण, जंगल आग आणि वनसंपदा नष्ट होताना दिसत आहे, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन एक प्रकारे नैसर्गिक संकटात वाढ होत आहे. हे सर्व टाळायचे असेल तर आपण सर्वांनी याचे गांभीर्य ओळखून वृक्ष लागवड केली नाही तर याचे गंभीर परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील यात शंकाच नाही.

        नैसर्गिक बदलामुळे वातावरण बदल झाला आहे या वातावरण बदलामुळे कमी वेळेत प्रचंड ढगफुटी होऊन त्या भागाचे अतोनात नुकसान होते किंवा मोठ्या प्रमाणात काही दिवस बखाड निर्माण होते. आता पूर्वीसारखी झड लागून सार्वत्रिक पाऊस पडताना दिसत नाही. आपण 50 वर्षांपूर्वी अनुभवले असेल की एक एक महिना झडी लागायची आणि पावसाचा एक एक थेंब हा जमिनीत जिरायचा . यातून पाण्याची पातळी वाढायची. परंतु आता पावसाचा असमतोल निर्माण झाला असून कधी खूप पाऊस पडून पाणी वाया जाते, तर कधी कमी पाणी पडून पीक वाया जाते, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

 जग बदलायचे असेल तर आपल्याला स्वतः बदलावे लागेल. या विचारातून आम्ही निसर्ग फाउंडेशन स्थापन केले असून मागील वर्षापासून नियोजित जागेवर वृक्षारोपण करतो आहोत. केवळ वृक्षारोपण करत नाही तर वृक्ष लावून त्याला ट्रीगार्ड्स उपलब्ध करून देतो आणि दरमहा वृक्ष व्यवस्थित आहे की नाही, त वाढतात की नाही याकडे लक्ष देतो.

#. प्रा दिगंबर कानडजे, मधुकोष,

 सागवन-बुलडाणा (८२७५२३१८७४)


       

Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व