बहुव्यासंगी कलाध्यापक : संजय माधव गुरव
एक बहुव्यासंगी कलाध्यापक : संजय माधव गुरव
खामगाव येथील कलाध्यापक संजय यांचे वडील माधवराव हे अभियांत्रिकी पदवीधर होते. बिकट परिस्थितीत त्यांच्या वडिलांना नोकरी मिळाल्यामुळे कुटुंबाला फार मोठा आधार झाला. घरामध्ये सुसंस्कृत,धार्मिक आणि शैक्षणिक वातावरण निर्माण झाले. सरांचे प्राथमिक शिक्षण खामगाव येथील नगर परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण ए. के. नॅशनल हायस्कूलमध्ये झाले. प्राथमिक शाळेत शिकत असताना पुस्तकात मन रमत नव्हते. मातीत खेळावसे वाटे. सतत मातीकाम करण्याची त्यांना इच्छा व्हायची. तेव्हा ते शाळेला दांडी मारून तासनतास कुंभारवाड्यात जाऊन कु़ंभारासोबत गप्पा मारत बसायचे. सरांना कलाकौशल्यात विशेष आवड असल्याने त्यांनी ए.टी.डी, बी.एफ.ए. , आणि ए.एम.अशा कौशल्याधिष्ठित पदव्या संपादन केल्या. या शैक्षणिक पात्रतेच्या जोरावर त्यांना अर्जून खिमजी नॅशनल हायस्कूल खामगाव या नामवंत शिक्षण संस्थेत कला अध्यापक म्हणून नोकरी मिळाली. शाळेत प्रामाणिकपणे काम करून अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडविले.
त्यांच्या खामगाव येथील जुन्या घराच्या आतील व बाहेरील भिंतीवरील फटीला व वळचणीला चिमण्यांची घरटी होती. दगडामातीची घरं असली की तेथे पक्ष्यांना राहण्यासाठी आपसूकच संधी चालून येते. त्यांना घरटी करण्यात ज्यादा कष्ट लागत नाही. सरांच्या घराच्या अंगणात चिमुकल्या चिमण्यांची सतत वर्दळ वाढली. त्यांची चिवचिव ऐकून त्यांच्यात आपसूकच जिव्हाळा निर्माण झाला. त्यात चिमणी बद्दल कुतूहल निर्माण करण्यात त्यांच्या गंगू आजीचा फार मोठा हात होता. आजी नेहमीच त्यांना पशुपक्ष्यांच्या आणि विशेष करून चिमणींच्या छान छान गोष्टी सांगायची. सरांचे आई, वडील , मामा आणि गंगूआजी हे वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. वारकरी संप्रदायातील विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्या घरी काकडा आरती आणि भजन हे नित्यनेमाने चालायचे. किर्तन ऐकणे तर त्या कुटुंबाचा छंद होता. तोच गुण संजय सरात उतरला. सरांना सुध्दा भजन,कीर्तन आणि संगीत यात विशेष रस निर्माण झाला.
आम्ही खामगाव येथील नवीन घरात २००६ साली राहायला गेलो. १९९७ नंतर प्रथमच त्यांना अंगणात चिमणी दिसली. सरांची पत्नी सौ.मंगला हिने चिमणीचे कौतुक केले. तिला पाणी आणि दाणे दिले. तेथून त्यांना 'चिमणी वाचवा' प्रकल्पाची प्रेरणा मिळाली असे ते सांगतात. २००६ सालापासून ते चिमणी वाचवा प्रकल्प राबवित असून त्याचे रूपांतर चिऊताई घरकुल योजनेत त्यांनी केले. आज महाराष्ट्रासह इतर मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, गुजरात, झारखंड व छत्तीसगड राज्यात चिऊताई घरकुल योजनेच्या माध्यमातून कार्य सुरू असून एकूण एक लाखापेक्षाही जास्त चिमणी घरटे त्यांनी वितरित केली आहेत. टाकाऊ पर्यावरण पूरक वस्तूपासून, मातीची मडकी आणि लाकडी फळ्या यापासून त्यांनी चिमण्यांची घरटी बांधली आहे.
याशिवाय यांनी चिमणी व इतर पक्षांच्यासोयीसाठी गच्चीवर पाणीपात्रे ठेवलीत. चिमण्यांना निरंतर थंड पाणी मिळावे व पाण्याने अंघोळ करता यावी म्हणून " गच्चीवरची कमळबाग " हा नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी सुरू केला. सर्वसामान्यांना भारतीय कमळाची ओळख व्हावी या उद्देशातून " नदी - तलाव जिथे, कमळबाग तिथे " या उपक्रमास सन २०२० पासून सुरुवात केली. हा उपक्रम महाराष्ट्रभर फिरून सुरू केला असून यात अनेक ठिकाणी त्यांना यश प्राप्त झाले आहे.
देव देवता, गणपती यांच्या मूर्ती जर प्लॅस्टर ऑफ पॅरिसने केल्या तर त्या टणक होतात आणि विसर्जनानंतर मात्र त्या पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे पर्यावरणाला फार मोठी हानी पोहचते. पर्यावरण पूरक उपक्रम राबवित असतांना ईको फ्रेण्डली गणेशमूर्ती कार्यशाळेत आजपर्यंत २.५ लक्ष विद्यार्थ्यांवर संस्कार केले असून त्यांना शाडूमातीपासून आकर्षक गणेशमूर्ती बनविण्याचे मोफत प्रशिक्षण त्यांनी दिले आहे. याकामी सामाजिक संस्था, शाळा व महाविद्यालयाचे यांचे मोठे सहकार्य लाभत आहे. पालकांनी सुद्धा मुलांना त्यांचे आवडीनुसार शिकू दिले तर मुलं भविष्यात नक्कीच आवडीच्या क्षेत्रात काम करतील .त्यांच्या पायावर उभे राहून ते उद्योगी बनतील. किमान मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम होतील यात शंकाच नाही,असे विचार त्यांनी मांडले.
पक्षी ओळख व संवर्धन , गच्चीवरची परसबाग, वनराई बंधारे ,घरोघरी रोपवाटिका, बीज संकलन, रेन वाॅटर हार्वेस्टींग, पिंगळा घुबड संवर्धन, नामशेष होत चाललेल्या देशी वृक्षांची ओळख व रोप निर्मिती, कलाकौशल्य शिबीर, पर्यावरणविषयक जनजागृती असे विविध उपक्रम त्यांनी राबविले असून आजही ते मोठ्या आनंदाने राबवित आहे. सेवानिवृत्तीनंतर ते सपत्नीक पुढील आयुष्य , पक्षी आणि निसर्ग संवर्धनासाठी घालवणार आहे. त्यांना गायन आणि संगीत याची देखील खूप आवड आहे. त्यांना या उपक्रमांसाठी कुठलाही शासकीय निधी मिळत नाही. मात्र काही सामाजिक संस्था उपक्रमात सहभागी होवून हातभार लावतात. खरोखर ते संयमी, शांत, निगर्वी, पशुपक्ष्यांवर प्रेम करणारे, उपक्रमशील आणि बहुव्यासंगी असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे.
# प्रा. दिगंबर कानडजे, (८२७५२३१८७४)
मधुकोष, सागवन-बुलडाणा.