विक्रम एकनाथ म्हस्के : विद्यार्थीप्रिय शिक्षक

       विक्रम एकनाथ म्हस्के : एक आदर्श विद्यार्थीप्रिय शिक्षक 

--------------------------------------------------------------

       बुलडाणा जिल्ह्यातील चांडोळ येथील विक्रम एकनाथ म्हस्के सध्या तुळशी नगर येथे राहत आहे. यांचा जन्म ६ जून १९६७ रोजी एका सामान्य गरीब कुटुंबात झाला. चांडोळ येथील त्यांची आत्या श्रीमती लक्ष्मीबाई लिंबाजी सोनुने हिच्या प्रपंचाची वाताहत होऊ नये म्हणून सरांचे वडील एकनाथ दगडू म्हस्के हे ७-८ वर्षांचे असतानाच सरांच्या जन्माआधी आत्या घरी आले होते. सरांच्या आत्याला बाबुराव, जयसिंग आणि हौसाबाई असे तीन अपत्ये. सरांच्या वडिलांनी प्रथम भाच्यांना शिक्षण देऊन नोकरीवर लावले. बाबुराव सोनुने यांना शिक्षक म्हणून तर जयसिंग सोनुने यांना ग्रामसेवा सहकारी पतसंस्थेचे गटसचिव म्हणून नोकरी लागली.

      सरांचे वडील बालवयातच ध्रुपदाबाईशी विवाहबद्ध झाले होते. तो काळच बालविवाहाचा होता. आत्याचे कुटुंब सांभाळून त्यांनी प्रकाश, नर्मदा, कांता आणि अनिल या मुलांबाळांकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. एकनाथ म्हस्के यांना सामाजिक कार्यात विशेष रस होता. गावातील भांडणतंटे मिटविणे, लग्नकार्य जुळवून देणे, अडल्यानडल्यांना मदत करणे आणि योग्य मार्गदर्शन करणे या त्यांच्या स्वभावामुळे एकनाथ म्हस्के यांना गावात आणि पंचक्रोशीत ' म्हस्के मामा ' म्हणून ओळख असे. सरांच्या आत्याचा आणि स्वतःच्या भावंडांचा फार मोठा कुटुंब परिवार बनला होता. या संयुक्त कुटुंबाची धुरा म्हस्के मामांनी स्वतः सांभाळली होती. आत्याची दहा एकर जमीन होती. या शेतीमध्ये विक्रम म्हस्के आणि त्यांची भावंडे काम करत करत मोठी झाली होती. 

  विक्रम सरांचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल चांडोळ येथे झाले‌. शिक्षण घेत असताना त्यांनी आत्याच्या घरी राहून गल्लोगल्ली दूध विकले. शिवाय दर रविवारी बाजारात जाऊन गुळ आणि मिरची विकण्याचे काम केले. या कामातून त्यांना व्यवहारज्ञान आणि दोन पैसे मिळाले. एकनाथ मामांची मुले देखील सुसंस्कारी, आज्ञाधारी आणि हाती पडेल ते काम करणारी होती म्हणून एवढ्या मोठ्या खटल्यात ती टिकली,शिकली आणि नोकरीवर लागली.

       विक्रम म्हस्के हे 1983 मध्ये चांगल्या गुणांनी एसएससी झाले. सरांना शिक्षक होण्याची आवड असल्यामुळे त्यांनी अत्यंत काटकसरीने दोन ड्रेसवर राहून बुलडाणा येथील शासकीय अध्यापक विद्यालयात १९८५ मध्ये डीएड पूर्ण केले. डीएड तर झाले, पण आता नोकरी मिळणार कशी ? काही दिवस त्यांनी आत्याच्या शेतात कपाशीचे व भेंडीचे प्लाॅट बांधले. नोकरीबाबत त्यांनी खूप विचार केला. चांडोळ येथे डॉ लव्हाळे एक नामांकित डॉक्टर होते. डॉक्टर लव्हाळे हे फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे होते. महात्मा फुले सत्यशोधक चळवळीचे ते अनुयायी होते. तसेच चिखली येथील पंढरीनाथ पाटील सुद्धा महात्मा फुलेंना गुरु मानत असे. या दोघांच्या विचारसरणींचे डॉ लव्हाळे आणि म्हस्के मामा होते. डॉ लव्हाळे यांची दलितमित्र पंढरीनाथ पाटील यांचेशी चांगली ओळख होती. तेव्हा डॉ लव्हाळे आणि म्हस्के मामा पंढरीनाथ पाटीलांना भेटले आणि विक्रम म्हस्के यांना आंचरवाडी येथील श्री शिवाजी आश्रम शाळेच्या वसतिगृहात अधीक्षक म्हणून कामाला लावले. सरांचा वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी चांगला परिचय झाला. विद्यार्थ्यांना पटवून दिले की घरची चटणी भाकर समजून येथील भाजी भाकर खा. आपल्याला मोफत शिकायला मिळते हे महत्त्वाचे आहे, याची जाणीव ठेवून अभ्यास करा आणि भविष्यात स्वतःच्या पायात उभे रहा.

      सरांनी पुढे राज्यनिवड मंडळाची परीक्षा दिली. 11 नोव्हेंबर 1986 रोजी ते सिंदखेडराजा तालुक्यातील वरदडी बुद्रुक येथे जिल्हा परिषद शिक्षक म्हणून रुजू झाले. नोकरी लागल्याचा आनंद अतिशय अवर्णनीय होता. सरांनी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत राहून मुलांची खूप काळजी घेतली.विद्यार्थ्यांना सर्वप्रथम वाचन ,लेखन आले पाहिजे याची काळजी घेतली. कबड्डी खेळामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. त्या शाळेतील विद्यार्थी कबड्डी खेळामध्ये तालुकास्तरावर प्रथम आले. शाळेतील आणि गावातील मंडळींनी त्यांचा यथोचित गौरव केला.

    12 जुलै 1991 रोजी सरांची बदली सिंदखेडराजा येथून बुलढाणा पंचायत समितीमध्ये चांडोळला झाली. सरांना येथे इयत्ता चौथीचा बौद्धिकदृष्ट्या खूप कच्चा असलेला वर्ग देण्यात आला होता. वाचता येत नाही, लिहिता येत नाही असा गुणात्मकदृष्ट्या मागासलेला वर्ग सरांनी एक आव्हान म्हणून स्वीकारला. सरांनी जास्तीचे वर्ग घेतले.प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले. याचा परिणाम असा झाला की तो वर्ग गुणात्मकदृष्ट्या खूप अग्रेसर ठरला. सरांनी केवळ विद्यार्थ्यांनाच शिकवले नाही तर स्वतः सुद्धा विद्यार्थी बनून जीवन जगले. घरप्रपंच, नोकरी आणि अभ्यास यांचा मेळ घालून फावल्या वेळात अभ्यास केला आणि त्यांनी अमरावती विद्यापीठाची बीएची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली.

        सर पदवीधर झाल्यामुळे त्यांची शेगाव पंचायत समितीमध्ये २० सप्टेंबर १९९७ रोजी पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती झाली. सर जिथे जातील तेथे स्वतःची शाळा समजून त्यांनी शाळेची आणि विद्यार्थ्यांची प्रगती केली. नंतर सरांची केळवद येथे १९९८ मध्ये बदली झाली. सरांची कामाची पद्धत, अध्यापन कार्य, शाळेतील शैक्षणिक वातावरण आणि पालकांच्या अडचणी समजून घेण्याची हातोटी या गोष्टी लक्षात घेता सरांना त्या ठिकाणी जवळपास एक तप काम करण्याची संधी मिळाली. सरांनी त्याठिकाणी उत्तमोत्तम विद्यार्थी घडविले. केळवदचा "आदर्श शिक्षण पॅटर्न" चिखली पंचायत समितीमध्ये विशेष लक्ष देऊन राबविला. केळवद येथील सरांचे अनेक विद्यार्थी एमबीबीएस, इंजिनियर्स,प्रशासकीय अधिकारी, आदर्श लोकप्रतिनिधी आणि चांगले पत्रकार बनले आहेत.

   प्रशासकीय कारणावरून सरांची बदली २०११ साली तराडखेड या गावी करण्यात आली. तराडखेड येथे कोणतेही शैक्षणिक वातावरण नव्हते. शाळाबाह्य विद्यार्थ्यांची खूप संख्या होती. अशा परिस्थितीत विविध उपक्रम राबवून शिक्षक मित्रांच्या सहकार्याने तेथे चांगले शैक्षणिक वातावरण तयार केले. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. विद्यार्थी पटसंख्या वाढविली. बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ अशा विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे, यासाठी गुम्मी आणि मासरूळ येथील हायस्कूलची स्पर्धा चालायची.

    सन 2015 मध्ये जनशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या वतीने 'महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार' देऊन तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी विक्रम म्हस्के यांचा गुणगौरव केला. हा माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय क्षण होता, असे सरांनी आवर्जून सांगितले.  

     १४ डिसेंबर २०१८ रोजी सरांना मासरूळ येथे मुख्याध्यापक म्हणून बढती मिळाली. कोणतेही चांगले काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रसंगी अनेकांची मने दुखवली जातात. परंतु शाळा आणि विद्यार्थी यांचे हित लक्षात घेता शिक्षकांनी जीव ओतून प्रामाणिकपणे काम केले पाहिजेत, अशी मनोभूमिका विक्रम सरांची होती. मासरूळ शाळेमध्ये अत्यंत सुंदर अशी परसबाग तयार केली. त्यात भाजीपाल्याची लागवड केली. हाच भाजीपाला शालेय पोषण आहारामध्ये नियमित वापरण्यात आला. या परसबागेचा तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक आला. खूप मेहनत घेऊन शिक्षकांच्या सहकार्याने मासरुळ शाळेला नामांकित " आयएसओ " दर्जा प्राप्त करून दिला,ही त्यांच्या कामाची उपलब्धी आहे.

   १४ डिसेंबर २०२३ रोजी सरांचे प्रमोशन होऊन ते केंद्रप्रमुख म्हणून पांगरी उबरहंडे येथे बदलून गेले. केंद्रप्रमुख झाल्यामुळे त्यांना अनेक शाळांना भेटी देण्याचा योग आला. सरांनी चांगले चांगले उपक्रम लक्षात आणून दिले. शाळांचा संख्यात्मक आणि गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी शिक्षकांना मौलिक असे मार्गदर्शन केले.

सरांना दोन अपत्ये. मुलगी बी.ए.बी.एड.असून जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. तर मुलगा धीरज एमबीबीएस डीएनबी असून तो मोताळा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतो आहे. त्याची पत्नी बीएएमएस, एमडी आहे. असा हा सरांचा विद्याविभूषित परिवार आहे.

    विक्रम म्हस्के सर पदवीधर शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस,पंजाबराव देशमुख शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष,धाड जि.प. शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष, निसर्ग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सागवन या संस्थेचे उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

विक्रम सरांनी वसतिगृह अधीक्षक, शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख अशा विविध पदांवर काम करून त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. ते व्यवसायनिष्ठ, प्रामाणिक, संवेदनशील, संयमी, समाजशील, निगर्वी, शांत असे आदर्श व्यक्तिमत्व आहे.  

# प्रा. दिगंबर कानडजे, मधुकोष निवास 

      सागवन-बुलडाणा 




  


    

Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व