डॉ पंढरी इंगळे : एक प्रथितयश आयुर्वेदाचार्य
डॉ पंढरी उत्तमराव इंगळे : एक प्रथितयश आयुर्वेदाचार्य
--------------------------------------------------------------
डॉ पंढरी इंगळे यांचे वडील उत्तमराव हे बुलडाणा जिल्ह्यातील अमोना गावचे सरपंच होते. त्यांना शेती, शिक्षण,समाजकारण आणि राजकारण यात विशेष रस होता. डॉक्टरची आई गंगुबाई ह्या अतिशय मेहनती, काटकसरीने संसार करणारी एक आदर्श गृहिणी होत्या. त्यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. तरीही त्यांनी पोटाला चिमटा घेऊन काटकसरीने मुलांना शिकविले. केवळ शालेय शिक्षणच दिले नाही तर उच्च शिक्षणासाठी पैशाची तरतूद केली.प्रसंगी कर्ज काढावे लागले.पण त्यात कमीपणा वाटू दिला नाही. मुलांची हौस होईपर्यंत त्यांनी शिकू दिले. अर्थात मुलं सुद्धा हुशार असली तरच शिकतील हे सुद्धा सत्य आहे. तशी त्याची दोन्ही मुले सुद्धा हुशार निघाली म्हणून हे शक्य झाले.
एक डाॅक्टर आणि दुसरा एमएस्सी, (कृषी ) पीएचडी केला. डॉक्टरचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा अमोना येथे झाले. डाॅक्टरला शिकण्याची विशेष आवड असल्यामुळे त्यांनी अभ्यास करून जवाहर नवोदय विद्यालयात नंबर लावून घेतला.पण शिक्षणाचा भार आईवडिलांवर पडू दिला नाही. दहावीपर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालयात घेतले. बारावी मात्र श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चिखलीला केली. डॉक्टर होण्याची तीव्र इच्छा बघता त्यांच्या वडिलांनी अत्यंत बिकट परिस्थितीत पंढरीला बीएएमएसला प्रवेश केला. त्यांनी अत्यंत काटकसरीने आणि निगोतीने बीएएमएस शिक्षण पूर्ण केले.
ग्रामीण भागातील उत्तमरावचा पोरगा पंढरी डॉक्टर झाल्याचा आनंद गावात फुलांच्या सुगंधासारखा दरवळला. कारण तेव्हा खेड्यापाड्यातून डॉक्टर होणे अवघड काम होते. डॉक्टरला शिक्षणाचे फार वेड. आयुर्वेदात अजून उच्च पदवी घ्यावी असे त्यांचे मन म्हणायचे. तेव्हा इच्छा तेथे मार्ग या उक्तीप्रमाणे ते आयुर्वेदात एमडी (द्रव्यकण) झाले. पुढे त्यांनी आयुर्वेदात पीएच.डी देखील केली.
डॉ पंढरी उत्तमराव इंगळे यांचा जन्म १ जूलै १९८५ रोजी अमोना येथे झाला. आज रोजी ते ४० वर्षांचे असून एक उत्तम आयुर्वेदाचार्य आहे. त्यांचा ग्रामीण भागातील गोरगरीब आणि सर्व सामान्य जनतेशी दांडगा संपर्क असून ते त्यांच्याशी बऱ्यापैकी सुसंवाद साधतात. सद्यस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या वाढत चालली असून दवाखाना चालवणे जोखमीचे झालेले आहे. तरीही ते रुग्णांना उत्तम सेवा देतात. त्यांचा दवाखाना नेहमी रुग्णांनी भरलेला राहतो. डॉ पंढरी इंगळे यांचे गंगाई हाॅस्पिटल चिखली येथे असून ते सर्वसोयींनी युक्त आहे. डॉ पंढरी इंगळे यांची उपचार पद्धती आणि त्यातून रुग्णांना मिळालेला आराम लक्षात घेता त्यांची सर्वदूर ख्याती पसरलेली आहे. चिखली व बुलडाणा जिल्ह्यातील, शहरी व ग्रामीण परिसरातील रूग्णांची संख्या खूप आहे. शिवाय महाराष्ट्रातून वाशिम ,सांगली, सातारा ,यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, चंद्रपूर ,मुंबई, जालना, औरंगाबाद अशा जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. काही दिवस येथेच राहून औषधोपचार घेतात आणि ठणठणीत भरे होऊन आनंदाने घरी जातात.
डॉक्टर अमोना गावी जातात. गावाशी आणि शेतीच्या मातीशी त्यांची नाळ टिकून आहे. गावातील रूग्णांना ते तपासतात. ते सहजगत्या त्यांची आनंदाने तपासणी करतात. त्यांना मानसिक आधार देतात. आरोग्याची काळजी घेण्याचा आवर्जून सल्ला देतात. जीवन जगण्यासाठी जे मानसिक बळ लागते ते डॉक्टरकडून रूग्णांना मिळते. ते वैद्यकीय सेवेला तर महत्त्व देतातच,पण सामाजिक आणि पर्यावरणविषयक कामाला देखील प्राधान्य देतात. रूग्णांची प्रतिकारशक्ती कशी वाढविली पाहिजे यासाठी मार्गदर्शन करतात.
रुग्णांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असले तर ती व्यक्ती सुखी समाधानी जीवन जगू शकते असे विचार डाॅक्टरनी मजजवळ व्यक्त केले. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, याची जाणीव त्यांना आहे. म्हणून त्यांनी मानसशास्र विषयात पदवी संपादन केली. डॉक्टर इंगळे हे पाठीच्या समस्या, एव्हीएन वेदना व्यवस्थापन, मायग्रेन, अति आम्लपित्त, पक्षाघात, मूळव्याध, मूत्रपिंडातील खडे आणि कर्करोग या क्षेत्रात काम करतात
आयुर्वेद आणि नैदानिक क्षेत्रात डॉ. पंढरी इंगळे यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना "यंग रिसर्चर अवॉर्ड-२०२२" हा पुरस्कार मिळाला. तसेच आयुर्वेद क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी विदर्भ गौरव पुरस्कार आणि आयुषरत्न पुरस्कार हे दोन पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. डॉ पंढरी इंगळे यांना राज्यस्तरीय 'बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार' २०२४ साली त्यांच्या रुग्णसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी मिळाला. जागतिक कोरोना महामारीत त्यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांवर जिवाची तमा न बाळगता उपचार केले आणि त्यांना जीवदान दिले.त्यांच्या या प्रदीर्घ उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना "कोरोना योद्धा पुरस्कार" देखील मिळाला.
त्यांच्या जवळपास एका तपाच्या वैद्यकीय सेवेत त्यांनी पाचशेच्या वर शहरी आणि ग्रामीण भागात आरोग्य शिबीरे घेतली आहेत. त्यांनी चिखली तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत आरोग्यसेवा देण्यासाठी काही गावे व काही शाळा दत्तक घेतल्या आहेत.पर्यावरण संवर्धन आणि विकासासाठी ते दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम स्वतः हून आयोजित करतात. निसर्गावर ते भरभरून प्रेम करतात.
19 ऑक्टोबर 2024 रोजी रागा हेरिटेज हिंजवडी पुणे येथे गंगाई हॉस्पिटलचे संस्थापक तथा आयुर्वेदाचार्य डॉ पंढरी इंगळे यांना 2024 चा राष्ट्रीय आरोग्य सेवा कल्याण पुरस्कार देण्यात आला. 'नॅशनल हेल्थकेअर आणि वेलनेस कॉन्फरन्स अवार्ड' आयुर्वेदिक मेरुदंड आणि एव्हीएन उपचारातील नेतृत्वासाठी त्यांना देण्यात आला.. एनएचव्हीसीए हा आरोग्यसेवा आणि कल्याण क्षेत्रातील एक प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. आयुर्वेदिक न्युरोथेरपी, पंचकर्म, अग्निकर्म, विध्वकर्म आणि योग्य आहार व व्यायाम या माध्यमातून अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया न करता उपचार करून तंदुरुस्त केले. त्यांनी आयुर्वेदात संशोधन आणि शिक्षण या दोन्ही माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचा अभ्यास आणि आधुनिक उपचार पद्धती इतरांना प्रेरणादायी ठरेल, यात शंकाच नाही. तसेच ते रामसिंग चुनावाले आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएस च्या वर्गाला शिकविण्याचे काम करतात. आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा ते विद्यार्थ्यांना देतात.
अखंडनिष्ठा आणि आरोग्यसेवेसाठी दिलेले योगदान याची पावती म्हणजे डॉक्टर पंढरी इंगळे यांना मिळालेला हा राष्ट्रीय आरोग्य सेवा कल्याण पुरस्कार होय. तसेच त्यांनी सेवाभावी संस्था स्थापन केली असून ते एनजीओ गंगाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेमार्फत ते अनेक सामाजिक उपक्रम राबवितात. त्यांचा अभ्यास आणि आधुनिक उपचार पद्धती इतरांना प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही.आयुर्वेदशास्त्रामध्ये त्यांनी आजवर १६ संशोधन पेपर प्रकाशित केले आहे. डॉ पंढरी इंगळे एक सेवाभावी वृत्तीचे, प्रयोगशील, संयमी आणि उत्साही व्यक्तिमत्त्व आहे. तसेच त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्ये असून त्यांची पत्नी बी फार्म आहे. ती घरप्रपंच व मुलांचे संगोपन याकडे लक्ष देऊन फावल्या वेळेत डॉक्टरांना व्यवसायात मदत करतात. गंगाई हाॅस्पिटलचे व्यवस्थापन सांभाळतात.
ते हसतमुख असून त्यांच्या चेहऱ्यावरून नवचैतन्याचा झरा वाहताना दिसतो आहे. १ जूलै रोजी त्यांनी चाळीशी पार केली असून या दिवशी त्यांचा वाढदिवस . तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तसेच या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना सुख, समृद्धी, मानसिक स्वास्थ्य आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची वैद्यकीय व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
प्रा दिगंबर कानडजे, मधुकोष निवास,
सागवन, बुलडाणा.