सर्पमित्र श्रीराम रसाळ

 

वन्यजीव प्राण्यांना जीवदान देणारे : सर्पमित्र श्रीराम रसाळ 

      बुलडाणा जिल्ह्यातील हातेडी बु. या गावी श्रीराम बळीराम रसाळ यांचा जन्म ९ जूलै १९७१ रोजी एका सामान्य गरीब कुटुंबात जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव कुशार्वता असून त्या निरक्षर होत्या.तर वडील बळीराम मारोती रसाळ मात्र त्याकाळी दहावी पास होते. त्यांचे वडील त्याकाळी सैन्यात भरती झाले होते. काही दिवस ते सैन्यांत राहिले, पण ते तेथे तग धरू शकले नाही. ते सैनिकाची नोकरी सोडून घरी परत आले .गरिबीने माखलेल्या कुटुंबात घरप्रपंच चालविणे एक तारेवरची कसरत होती. श्रीराम रसाळ आणि वडील यांनी सालं महिने घालून सुलोचना आणि सुमन या बहिणींची लग्नं केली.

      श्रीराम रसाळ यांचे प्राथमिक शिक्षण हातेडी बु. येथे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत झाले. प्राथमिक शाळेत शिकत असताना त्यांना शांत बसून शिकणे कधी जमले नाही. वर्गात आणि वर्गाबाहेर त्यांना वन्यजीव प्राणी धरणं फार आवडायचे. वर्गात पाल,सरडा,उंदीर किंवा सापाचे लहान पिल्लू दिसले की वर्गातील मुलेमुली घाबरून जातात. परंतु बहादुर श्रीराम मात्र मुळीच घाबरत नसे. उलट त्याला वर्गातील साप असो की इतर किटक त्यांना बाहेर काढल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. 

 आपलं कार्ट अवलिया निघालयं. फार खटपटी आणि बिलंदर आहे, त्यांना राहून राहून चिंता वाटायची. आई तर हे सगळं ऐकून काळजीत पडायची. या बालवयातच श्रीरामला वन्यजीव पाहण्याची, त्यांना हळुवार पकडण्याची सवय लागली होती. तेव्हापासून त्यांच्या मनातील भिती ‌ कमी कमी होत गेली.

     श्रीराम बळीराम रसाळ यांचे पुढील माध्यमिक शिक्षण हातेडी येथील श्री शिवाजी हायस्कूल मध्ये झाले. पाचवीत असताना एक वेगळीच भानगड त्यांनी केली होती. त्यांनी एक साप वायरच्या थैलीत बांधून आणला होता. चव्हाण सर वर्गात जीवशास्त्रातील "वन्यजीव प्राणी" या घटक शिकविणार होते. सापाबद्दल माहिती देण्यासाठी श्रीरामांनी हळूच थैलीतील धामण काढून चव्हाण सरांना दाखविली. सर,हा सर्पमित्र श्रीराम रसाळ साप शिकविण्यासाठी घेता का? असं म्हणताच  वर्गातील मुलं घाबरली.चव्हाण सरांना खूप राग आला. त्यांनी श्रीरामला बेसरमीच्या काडीने चांगले झोडपले.

      परिस्थितीमुळे आणि बंडखोरपणामुळे पुढे त्यांना शिकता आले नाही. वन्यजीव प्राणी पकडणे आणि त्यांना जंगलात जाऊन सोडून देणे हा त्यांचा आवडता छंद बनला आणि तो त्यांनी कायम जोपासला. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. जे उंदीर शेतमालाचे नुकसान करतात. तेच उंदीर सापांचे खातो. याची जाणीव श्रीराम रसाळांनी शेतकऱ्यांना करून दिली. तेव्हा सापाला न घाबरता तो मित्र समजून त्याचे संरक्षण केले पाहिजे. त्याला जीवदान देऊन सुरक्षित ठिकाणी सोडून दिले पाहिजे असे श्रीराम रसाळ आवर्जून सांगतात.

      श्रीराम बाळाजी रसाळ यांना १ ऑगस्ट १९९१ रोजी बुलढाणा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत नोकरी मिळाली. या नोकरीचा त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. श्रीराम रसाळ यांना उभे करण्यात माजी बँक शाखाधिकारी भालचंद्र शंकरराव देशमुख आणि कृषी अधिकारी बबनराव सखाराम जाधव यांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांना श्रीराम रसाळ गुरुस्थानी मानतात.

        महावीर नगरातील रहिवासी ह.भ.प. उत्तमराव भगवान मोठे यांची सुकन्या उषा हिच्याशी श्रीराम रसाळ यांचा पारंपारिक पद्धतीने विवाह झाला. जेव्हा त्यांचा विवाह झाला तेव्हा त्या बारावी कॉमर्स होत्या. घरात तिला लिहिण्या वाचण्याचे आणि अभिव्यक्त होण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. तेव्हा तिने घरप्रपंच सांभाळून फावल्या वेळात अभ्यास केला आणि बीकॉम होऊन दाखविले. तिचे कुटुंब विकासात फार मोठे योगदान आहे.

       श्रीराम रसाळ यांना दोन मुले असून दोघेही उच्चविद्याविभूषित आहे. थोरला अंकित हा बीकॉम, एमबीए आहे. तर धाकटा मेहुल एमएससी (नर्सिंग) करतो आहे. ते केवळ शिक्षित नाही तर चांगले सुसंस्कृत आणि सद्वर्तनी आहे. मुलं ही त्यांची खरी संपत्ती असून त्यांचा सार्थ अभिमान आहे, असे ते सांगतात.

     एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते कोणाच्याही घरादारात किंवा कोणत्याही अवघड जागेत साप निघाला तर ते परमेश्वरासारखे धावून जातात. त्यांची समस्या सोडविण्यासाठी जीवाची पर्वा न करता झटतात. प्रसंगी त्यांना वीषबाधा देखील होते. घरातील माणसांना ते धीर देतात आणि तो साप अलगद पकडून दूर जंगलात सोडून देतात. दुसऱ्याच्या आनंदात त्यांचा आनंद सामावलेला आहे. दुसऱ्याच्या संकटात धावून जाणे हा त्यांचा स्वभावधर्म आहे. त्यांनी अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये सापाविषयी असलेले समज -गैरसमज दूर करून प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलेले आहे. विषारी आणि बिनविषारी साप कसे ओळखावे?त्यांचे वर्गीकरण त्यांनी करून दाखविले आहे. त्यांनी गावातील ग्रामपंचायत समोर आणि शाळेत अनेक साप सोबत आणून सापाबद्दल माहिती दिली आहे. हे त्यांचे एक सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्य आहे असे म्हटले तर अवघे ठरवू नये असे मला वाटते. ते गेल्या 40 वर्षापासून वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षण याबाबतीत सातत्याने सेवा देत आलेले आहे. २००९ मध्ये "वन्यजीव संरक्षण आणि निसर्ग पर्यावरण संस्था " स्थापन केली असून ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

    बुलढाणा जिल्ह्यातील झरी या गावातील गडीत दडलेला एक कोब्रा नाग त्यांनी पकडून बाहेर काढला. त्याला दूर जंगलात नेऊन सोडून दिले. खरोखर हा किती जीवघेणा प्रसंग होता ,हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. पण तो त्यांनी आपल्या अंगावर घेतला!  

तसेच पिंपळगाव सराई या गावातील तरमळे कुटुंब. एका महिन्यापासून घरात कोब्रा नाग असल्यामुळे ते सगळं कुटुंब घराबाहेर झोपायचे. रात्रभर त्यांना झोप लागायची नाही. अशा संकटात सापडलेल्या तरमळे कुटुंबाला सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी आधार दिला. जिवाची पर्वा न करता तो कोब्रा नाग अलगद बाहेर काढला आणि तो दूर जंगलात नेऊन सोडून दिला.या कुटुंबाने त्यांचे शत: आभार मानले.खरोखर त्यांच्या या कार्याला माझा सलाम!.

        आज पावेतो त्यांनी जवळपास सन १९८४ पासून अंदाजे ७२००० साप व इतर वन्यजीव प्राण्यांना पकडून सुरक्षित स्थळी नेऊन सोडून दिले आहे. या चांगल्या कार्याची पावती म्हणून श्रीराम रसाळ त्यांना १८ में २०११ रोजी बुलढाणा जिल्हा कारागृह, १२ आक्टोबर २०१९ रोजी बुलढाणा जिल्हा पोलीस कार्यालय , २६ जानेवारी २०१९ रोजी बुलढाणा वन विभाग, १५ ऑगष्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा, ११ डिसेंबर २०२४ रोजी बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे कार्यालय आणि २६ जानेवारी २०२५ रोजी अतिरिक्त कमिशनर आयकर कार्यालय सोलापूर, अशा अनेक नामांकित संस्थेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांना महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा चिखली यांनी १० मार्च २०२५ रोजी "उत्कृष्ट कर्मचारी सेवा पुरस्कार" देऊन सन्मानित केले आहे.भावी पिढीला पुरातन वस्तूंचा परिचय व्हावा म्हणून त्यांनी " त्रिशिका प्राचीन कालीन नाणी व वस्तू संग्रहालय " हा नाविन्यपूर्ण उपक्रम २०२३ पासून सुरू केला आहे.

     या वन्यजीव प्राणी आणि पर्यावरण संरक्षण कार्यामुळे त्यांचा ग्रामीण आणि शहरी भागात एक चाहता वर्ग तयार झाला आहे. ते जिद्दी, साहसी, धाडसी, समाजशील आणि संवेदनशील असे एक विनोदी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे, असे मला वाटते.

# प्रा. दिगंबर कानडजे, मधुकोष निवास,

       सागवन-बुलडाणा.(भ्रमणध्वनी ८२७५२३१८७४)






Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व