सुभाष किन्होळकर : एक सर्जनशील साहित्यिक

        बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात किन्होळा या गावी सुभाष गंगाराम किन्होळकर यांचा जन्म १५ एप्रिल १९७० रोजी झाला.आईवडिल हेच त्यांचे दैवत होते. आईवडिलांनी काबाडकष्ट करून सुभाष आणि इतर भावंडांचे पालनपोषण केले. त्यांच्याकडे थोडीफार जमीन होती, पण तिही नापिकी. आईवडिल फारसे शिकलेले नसल्यामुळे त्यांना शेती आणि मोलमजुरी करुन कुटुंबाचा मोठा गाडा चालवावा लागला. किन्होळकरांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. घरची परिस्थिती नाजूक असल्या कारणाने रात्रीची शिळी भाकर आणि मित्रांची लिहिण्याची जुनी पाटी यावर त्यांनी शाळा केली. कुटुंबाला मदत करण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात त्यांनी सुट्टीच्या दिवशी मजुरी केली. सर्वकाही करुन जो वेळ मिळेल तो त्यांनी शाळेच्या अभ्यासासाठी घालवला. त्याकाळी हुशार विद्यार्थी जुनी पुस्तके अर्ध्या पाऊण किंमतीत विकायची. काही पाने फाटलेली पुस्तके असायची. अशी पुस्तके कमी पैशात विकत घेऊन त्यांनी दिव्यावर अभ्यास केला.

        १९८१ मध्ये चौथ्या वर्गाची परीक्षा पास झाल्यानंतर पुढे त्यांनी एम ई.एस हायस्कूल धामणगाव बढे येथे पाचवीत प्रवेश घेतला. पाच वर्षे जवळपास ४ किलोमीटर पायी चालत जावून सुभाषने दहावीपर्यंतचे शिक्षण काटकसरीने पूर्ण केले. दहावीपर्यंत त्यांना पायाला चप्पल किंवा बुट मिळाला नाही. चालताना कधी कधी बोटं फुटायची तर कधी पायात काटे घुसायची.त्यांनी खूप सहन केले. आईबाबांकडे चपला मिळण्यासाठी कधी त्यांनी हट्ट केला नाही. शाळेत जावू देतात हेच खूप झाले असे त्यांना वाटे. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पुढे शिक्षण मिळण्याची त्यांना शाश्वती नव्हती. परंतु शिक्षणाची उर्मी त्यांना बेचैन करायची. खूप शिकावं, मोठं व्हावं आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा असे त्यांना सतत वाटे. पैशाची जुळवाजुळव करून त्यांनी मोताळा येथील एमईएस कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी सायन्सला प्रवेश घेतला. त्यांनी शनिवार - रविवारी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊन एसटी पासची व्यवस्था केली. शाळेत असताना त्यांना कविता तोंडपाठ करण्याची आणि ती गाऊन दाखवण्याची फार हौस होती. पुढे महाविद्यालयात गेल्यामुळे त्यांना हळूहळू कवितेचे मर्म कळू लागले. एक प्रसंग त्यांच्या जीवनाला कलाटणी करणारा ठरला. सुट्टीच्या दिवशी ते एकदा वडिलांसोबत शेतात गेले. उन्हाळ्याचे दिवस होते. वडील मात्र शेतामध्ये कुदळीने कुंधा काढत होते. पोट भरण्यासाठी वडिलांची चाललेली धडपड पाहून किन्होळकरांना एक उत्स्फुर्त कविता सूचली. ही कविता म्हणजे त्यांच्या कवितासंग्रहांचे उगमस्थान ठरली. पाहता पाहता ते बऱ्यापैकी चांगल्या कविता लिहू लागले. गुरेढोरे जंगलात चारायला नेऊ लागले. मात्र कविता लिहिण्याच्या नादात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ते बारावी पूर्ण करू शकले नाही. तरीही त्यांनी तीन वर्षांनी बारावी परीक्षा उशिरा का होईना पण एकदाची पास केली.

        वडिलांच्या निधनानंतर ते पोरके झाले. त्यामुळे त्यांचे शिक्षणात मन लागेना, पण जगताना जे अनुभवले ते त्यांनी कवितेत मांडले. किन्होळकरांच्या कवितेचा उगम बापाच्या कष्टमय जीवनातून झाला. बापाचे कष्ट त्यांच्या संवेदना बनल्या. हळूहळू कसदार साहित्य निर्मिती होत गेली. पुढे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाची कास धरली. इंग्लिश लिटरेचर हा विषय घेऊन जळगाव जिल्ह्यातील शेंदुणीच्या गजाननराव गरुड महाविद्यालयात प्रवेश घेऊन १९९४ ला बीए केले. बीए करत असताना रोज साधी भाजीभाकर आणि फार झालं तर सणासुदीला गोडधोड मिळायचे. तेथे कामं सुद्धा करावी लागली. खोल्या झाडून काढणे आणि चक्कीत जाऊन दळून आणणे, इथपर्यंत काम करण्याची जबाबदारी त्यांच्या येऊन पडली होती. तरी त्यांनी ती शिक्षणाचे महत्त्व कळल्यामुळे निमुटपणे पार पडली. शिक्षक होण्याची आवड असल्यामुळे त्यांनी बीपीएड केले. शैक्षणिक पात्रता लक्षात घेता त्यांना स्वर्गीय जुलालसिंग राजपूत विद्यालयात १९९५ मध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. विनाअनुदानित शाळा असल्यामुळे काही दिवस तेथे बिनपगारी नोकरी केली. डोनेशनशिवाय शाळा महाविद्यालयात नोकरी नाही, हे सत्य त्यांनी जवळून अनुभवलं होतं. त्यांनी शिक्षक होण्याचा नादच सोडून दिला. पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी धामणगाव बढे येथे इंग्रजी विषयाचे कोचिंग क्लासेस सुरू केले. त्यात त्यांचा बऱ्यापैकी जम बसला.

      नोंदणी विवाह पद्धतीने २१ जून १९९६ रोजी किन्होळकरांनी कांताशी विवाह केला. ती सुस्वाभावी, प्रेमळ आणि अडचणीत पाठीशी उभे राहणारी, प्रसंगी घरासाठी कष्ट करून हातभार लावणारी धर्मपत्नी म्हणून त्यांच्या जीवनात आली. काटकसरीने आणि निगोतीने संसार करणारी ती एक आदर्श गृहिणी ठरली. सुभाष किन्होळकरांना दोन अपत्ये असून ते सुसंस्कारित आणि उच्चविद्याविभूषित आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी विशेष करून ग्रामीण भागातील मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली.‌ त्या मुलांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाची शिबीरे घेतली. प्रेरणादायी व्याख्याने देऊन सामाजिक प्रबोधनाचे काम केले. गुणवंत विद्यार्थी हेरून त्यांना अधिक प्रेरणा मिळण्यासाठी त्यांचा यथोचित गौरव केला. सामाजिक, शैक्षणिक, संघटनात्मक, पर्यावरणविषयक अशा विविध क्षेत्रात काम करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा जनमानसात ठसा उमटविला. कै.नरेंद्र लांजेवार सोबत राहून पुस्तकमैत्रीचा आणि बाल वाचनालयाचा उपक्रम यशस्वी केला. बाप गेला तेव्हाची गोष्ट, जनसेवक: मुक्त्यारसिंग राजपूत ह्या त्यांच्या चिंतनशील कादंबऱ्या आहेत. मशाल, रानमेवा हे त्यांचे विशेष काव्यसंग्रह असून ट्रिंग ट्रिंग, टिक टॉक इंग्रजी कवितासंग्रह ,आम्ही गोजिरी मुले, या रे सुंदर जगू , फुलपाखरे आहोत आम्ही! आणि हसतखेळत हे त्यांचे बालकवितासंग्रह प्रकाशित झाली आहेत. गगनगंध, चिंचगाभारा आणि पेरणसांज हे ललितलेखसंग्रह खाऊचे पैसे आणि लाल सावट हे कथासंग्रह आणि संवेदनांची आस्वादक उकल हा समीक्षाग्रंथ अशी त्यांची मौल्यवान ग्रंथसंपदा वाचकांसाठी उपलब्ध आहे.

      सुभाष किन्होळकरांच्या मशाल, झळ, शिक्षणसेवक: कृष्णा डोळसे, गगनगंध, आम्ही गोजिरी मुले, लाल सावट या साहित्यकृतींना नामांकित संस्थेकडून पुरस्कार मिळालेले आहेत. सुभाष किन्होळकर यांच्या यब्बो , झळ आणि शिक्षणसेवक: कृष्णा डोळसे या ग्रंथांवर सध्या अनेक विद्यार्थी पीएचडी करत आहे. मराठी साहित्य जगत आयोजित मेहकर येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. द लिटररी ॲंड सायंटिफिक रिसर्च ट्रस्ट बुलडाणा या संस्थेचे ते सदस्य आहे. तसेच विदर्भ साहित्य संघ बुलडाणा शाखेचे ते अध्यक्ष असून मराठी भाषेचा विकास कसा करता येईल, याकडे ते विशेष लक्ष देतात. त्यांना बालसाहित्याची खास आवड असल्यामुळे अखिल भारतीय बाल साहित्य अकादमी मराठी विभाग दिल्ली या संस्थेने स्विकृत सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. सुभाष किन्होळकरांची शून्यातून आणि संघर्षातून वाटचाल झाली असून आजरोजी ते कवी, कादंबरीकार, कथाकार, ललितलेखक आणि विशेष करून बालसाहित्यिक म्हणून सर्वांना सुपरिचित आहे. 

# प्रा. दिगंबर कानडजे, मधुकोष निवास,

     सागवन-बुलडाणा.



 

 

Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व