बाॅर्डर ड्युटी - तारेवरची कसरत: राजू वाघला चव्हाण-----

 बाॅर्डरवरची ड्युटी म्हणजे एक तारेवरची कसरत: राजू वाघला चव्हाण-----

         सैनिक हा भाकरीसाठी जरी लढत असला तरी देशसेवा ही आपसूकच त्याच्या नसानसात, मनामनात भिणलेली असते. अगदी घरादारावर तुळशीपत्र ठेवून आणि जीवावर उदार होऊन डोळ्यात तेल घालून तो लढत असतो. ऊन,वारा, पाऊस,थंडी आणि आकस्मिक नैसर्गिक आपत्तीची कोणतीही तमा न बाळगता तो देशासाठी लढत असतो.खरोखर या सैनिकांचे कार्य महान आहे, त्याला तोड नाही.आपण संपूर्ण समाजांनी त्यांच्या प्रती आदरभाव राखला पाहिजे. त्यांच्या या कार्याला भारावून जाऊन मी एक सच्चा माजी सैनिक राजू वाघला चव्हाण यांची भेट घेतली.भेटीत मी त्यांच्या भावना आणि भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्न केला. राजू वाघला चव्हाण हे नाईकनगर, तालुका मोताळा,जिल्हा बुलढाणा या छोट्याशा गावचा आहे. सध्या ते बुलडाणा येथे तुळशीनगर मध्ये राहतात.त्यांचा जन्म १ मार्च १९६८. सहा भाऊ आणि दोन बहिणी असा त्यांचा कुटुंब विस्तार. भावांमध्ये ते सर्वात लहान भाऊ असून ते केवळ १५ दिवसांचे असताना त्यांचे वडील अपघाती वारले. त्यावेळी त्यांचे गावातील घर धाब्याचे होते आणि वर एक जुनाट मोठी माडी होती. अचानक ती माडी कोसळली आणि त्यांचे वडील त्याखाली दबून वारले. तेव्हापासून राजू चव्हाण पोरके झाले.ते म्हणाले की कळायला लागल्यापासून मी मोठ्या भावाला 'बाबा' म्हणायचो.कारण खऱ्या अर्थाने ते त्यांचे पालक बनले होते.

       त्यांच्या गावी त्या वेळी शिक्षणाची सोय नव्हती.गाव फार आडवळणी होते. मामाच्या गावी राहून पळसखेड नागो येथे पाचवी पर्यंत शिक्षण घेतले. अभ्यासाने ते हुशार आणि बंजारी असल्याने भारत विद्यालय बुलडाणा येथे शिकण्यासाठी प्रवेश मिळाला. आरक्षणामुळे वसतिगृहात प्रवेश मिळाला.सहाजिकच त्यांना खूप बरे वाटले. तेथे दहावी झाले. त्यावेळी राजू चव्हाणला झालेला आनंद अव्दितीय होता. शक्यतोवर त्याकाळी मिलिटरीमध्ये भरती होण्यासाठी ग्रामीण भागातील माणसं आपल्या मुलांना पाठवित नसत. त्यांना असे वाटायचे की सैन्यात भरती झालेला मुलगा शक्य तोवर घरी वापस येत नाही.तो तिकडेच बाॅर्डरवर युद्धात शहीद होतो.

       सैनिक झाल्यावर खूप काही जग पाहायला मिळते. चांगले ड्रेस घालायला मिळतात.देशाची सेवा केली की आपल्याला देखील चांगला मानसन्मान आणि पैसा मिळतो. हे सर्व राजू चव्हाण ऐकून होते‌ आणि म्हणून त्यांनी निश्चय केला की सैन्यात भरती व्हायच. शेवटी ते वयाच्या १८ व्या वर्षी (१९८६ ) बीएसएफ मध्ये भरती झाले. त्यांच्या कुटुंबाला खूप आनंद झाला.

 

     नोकरी करत असताना त्यांना विलक्षण अनुभव आले.

सर्वप्रथम त्यांनी दिल्ली,पंजाब, श्रीनगर आणि शेवटी त्रिपुरा - अगरताला येथे ७ वर्ष नोकरी केली. अशी एकूण २० वर्षं देशाची सेवा करून ते सुखरूप सहिसलामत बीएसएफ खात्याच्या नोकरीतून सेवानिवृत्त होऊन घरी परतले. सुखरूप घरी परत आल्याचा सर्वात जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर तो त्यांच्या धर्म पत्नीला विजयाला... कारण मिल्ट्रीतून आपला नवरा सुखरूप घरी परत आला , हा त्यांच्यासाठी एक भाग्याचा क्षण होता. 

       श्रीनगरमध्ये असताना उग्रवादी ऑपरेशन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. तेव्हा सैनिक राजू चव्हाण यांना फार वाईट अनुभव आला. ते म्हणाले की," आम्ही पाचजण ड्युटीवर होतो. एका घरात उग्रवादी लपून बसले होते.चारही बाजूने त्या घराला घेरले. फायरींग करण्यात आली.तेव्हा दोन उग्रवादी जागीच ठार झाले. ऑपरेशनमध्ये आमचा एक सैनिक देखील ठार झाला आणि एक जखमी झाला.बाकीचे उग्रवादी पळून गेले. माझं नशीब बलवत्तर आणि आईवडीलांचे आशीर्वाद म्हणून मी सहीसलामत वाचलो." दुसरा अनुभव पश्चिम बंगाल मधील आहे. तो राजू चव्हाण यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितला. " आम्ही आठजण ड्युटीवर होतो. आमचा सामना डाकूंशी झाला. त्यात देखील तीन डाकू मारल्या गेले. त्यांनी आम्हाला गराडा घालून ठार मारण्याचा चंग बांधला होता.याही वेळी मी बालंबाल वाचलो."- 

        त्यांचे लग्न विजया नावाच्या मुलीशी १९९५ मध्ये झाले. त्याकाळी शक्य तोवर आर्मीच्या माणसाला खेड्यातील मंडळी मुली देत नसत. लढाईवर जावे लागते. मुलगा घरी येईल की नाही याची खात्री नसते. परंतु विजयाताईने मन खंबीर करून देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला, म्हणजेच राजू चव्हाण यांना होकार दिला आणि यशस्वीपणे हा संसाराचा गाडा चांगला चालवून दाखविला.एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका सामान्य स्त्रीचा हात असतो, हे तिने सिद्ध करून दाखवले. त्यांना अजय हा एक मुलगा आणि अश्विनी ही एक मुलगी असून छोटा परिवार आहे.त्यांच्या नोकरीतील मायापुंजी आणि पत्नीने काटकसरीने केलेला संसार यातून त्यांनी मुलामुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी खर्च केला. आज त्यांचा मुलगा अजय बीई इलेक्ट्रिकल,एमबीए आहे. तर मुलगी अश्विनी बीएचएमएस असून ती दिल्या घरी सुखी आहे. ." एका माजी सैनिकाची मुले उच्च शिक्षण घेऊन सुसंस्कारित झाली आहे,याचा मला सार्थ अभिमान आहे. हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई आहे असे मला वाटते." अशा भावना त्यांनी मजजवळ व्यक्त केल्या. 

   युवकांना त्यांनी सल्ला दिला, " तुम्ही शारीरिक मेहनत घेत चला. मी तुम्हाला मैदानी खेळांची माहिती देतो. सैनिक होऊन देशाची सेवा करा. खूप पगार मिळतो आणि अनेक सुखसुविधा देखील मिळतात.शिवाय आता पहिल्यासारखी नोकरी अवघड नाही.भरती व्हावयाचे असेल तर शारीरिक आणि लेखी परीक्षेत पास व्हा आणि या सैनिकी नोकरीला कमी न लेखता ती मिळविण्यासाठी प्रयत्नशील रहा.मी माझ्या कुवतीप्रमाणे तुम्हाला सदैव मदत करायला तयार आहे."

         १९८६ ते २००६ पर्यंत सलग २० वर्षे निष्कलंक नोकरी केली. नोकरीतील फंड मिळाला. मला चांगली पेन्शन लागू झाली. तरीही त्यांनी ठरवले की 'रिकामं मन सैतानाचा कारखाना' होऊ नये म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी वाॅचमन म्हणून प्रामाणिकपणे नोकरी केली आणि आजही ते करत आहेत.

      " मी माझ्या अनुभवावरून सांगतो की अनेक फौजी/ सैनिक सेवेत असो अथवा सेवानिवृत्त असाल, एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे सर्वप्रथम आपल्या कुटुंबाला सुखी समाधानी ठेवण्यासाठी आपली मायापुंजी व्यसनामध्ये वाया घालू नका.आपल्या मुलाबाळांना उच्च शिक्षण देऊन त्यांना माजी सैनिकाचे आरक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे करा. आपल्या ताकदीचा उपयोग गावातील मुलामुलींना सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी वापर करावा. सैनिक म्हणून सेवेत असताना ज्या काही वाईट सवयी होत्या, त्या सेवानिवृत्त झाल्यानंतर लगेच सोडून देणे नितांत गरजेचे आहे. अन्यथा आपले हाल झाल्याशिवाय राहणार नाही.समाजासाठी, गावरक्षणासाठी काही विधायक कार्य करता आले तर जरूर करा आणि हे शक्य होणार नसेल तर चालेल.पण कुणाला त्रास होईल असे कृत्य करू नका, असे ते पोटतिडकीने सांगतात. खरोखर राजू चव्हाण हे माजी सैनिक जरी असले तरी ते मानवतावादी, संवेदनशील,साहशी आणि इतरांना सहकार्य करण्यात अग्रेसर आहे.

# . प्रा दिगंबर कानडजे 

     मधुकोषनिवास, सागवन-बुलडाणा

Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व