लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

    साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : जीवन व कार्य 

---------------------------------------------------------------------------

     लोककवी ,लेखक ,समाजसुधारक, महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि विशेष करून दलितांच्या उत्थानासाठी काम करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एक ऑगस्ट रोजी जयंती आहे. त्या निमित्ताने मी त्यांच्या जीवनकार्यावर अल्पसा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या आडवळणी गावी तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी एका मातंग समाजात झाला. कोणत्या समाजात जन्माला यावे हे काही मानवाच्या हाती नसते. पण कर्तृत्वाने मोठं होणे हे मात्र त्यांच्या हाती असते. भाऊराव आणि वालुबाई या मातापित्यांच्या सहवासात अण्णाभाऊ लहानाचे मोठे झाले. तुकाराम जरी त्यांचे मूळ नाव असले तरी खऱ्या अर्थाने सर्व समाज त्यांना अण्णाभाऊ म्हणून ओळख होती. अठरा विश्वे दारिद्रयात जन्मलेल्या अण्णांना फार काही शिकता आले नाही.परंतु गावच्या शाळेत प्रवेश होताच दुसऱ्या दिवशी त्यांना अपमानित होऊन शाळा सोडावी लागली.

      सच्चेपणा हा त्यांचा लहानपणापासूनचा गुण. पण म्हणतात ना की अनुभवातून माणूस शहाणा होतो. असेच त्यांच्या बाबतीत घडले. शोषितांची कष्टकऱ्यांची दुःखे त्यांनी कविता, पोवाडे, कथा,कादंबरी, नाटक या साहित्यातून मांडली. बघता बघता पुढे ते चांगले साहित्यिक बनले. उच्च निच संकल्पनेतून धर्मांचे सुकाणू असलेल्यांनी आपल्याच समाजबांधवाना हजारो वर्षे गावकुसाबाहेर ठेवले. त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेतली. त्यांना कायम अज्ञानात, अंधकारात चाचपडत ठेवले. शिक्षणापासून वंचित केले. अस्वच्छतेची आणि कष्टांची कामे त्यांच्या वाट्याला आली होती. अण्णाभाऊ साठेंनी देखील अक्षरश: मिळेल ते काम केले. त्या कामातूनच त्यांना थोडीफार अक्षर ओळख झाली. अनुभवांतून ते कोणत्याही शाळेत न जाता फार काही शिकले. ते एक धुळीत पडलेल्या हिरासारखे होते. 

 वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी आईवडिलांसोबत वाटेगाव सोडले. ते २२७ मैलांचा पायी प्रवास करून मुंबईला पोहचले. मुंबईतील भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत त्यांना राहायला साधे घर मिळाले.गिरणीमध्ये काम करून त्यांनी कुटुंबाचे पालनपोषण केले.

       हळूहळू ते चमकू लागले.भविष्यात त्यांनी उत्तम दर्जाची साहित्य निर्मिती केली. समाजातील अन्याय आणि विषमतेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. लावणी आणि विविध साहित्यप्रकारातून त्यांनी समाजामध्ये जनजागृती केली. ते खऱ्या अर्थाने मार्क्सवादी विचारसरणीचे एक सामाजिक कार्यकर्ते होते. सन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वांतत्र्य मिळाले. आनंद तर त्यांना नक्कीच झाला.पण १६ ऑगस्ट रोजी मुंबईतील शिवाजीपार्कवर अण्णाभाऊंनी ६० हजार लोकांना घेऊन मोर्चा काढला. या मोर्चात मराठीतून नव्हे तर हिंदीतून घोषणा केली .

 " यह आझादी झूठी है, देश की जनता भूखी है ।" या हिंदी घोषणे वरूनच हे सिध्द होते की, अण्णाभाऊंना केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील जनतेची चिंता होती. 

यावरून हेही लक्षात येते की,अण्णाभाऊचे हे आंदोलन राज्यव्यापी तसेच देशव्यापी होते. या ठिकाणी अण्णाभाऊना फक्त पोटाचीच भूक नव्हे तर बौध्दिक भूख सुध्दा अपेक्षित होती. उपाशी माणसाला मानसिक स्वातंत्र्याचे महत्व कळत नाही, पण जेव्हा त्याचं पोट भरतं तेव्हा मात्र तो मानसिक स्वांतत्र्यासाठी धडपड करतो. स्वांतत्र्यानंतरच्या काळात खरे तर सर्व समाज विविध जातीधर्मांमध्ये विभागल्या गेला होता. बहुजन समाजाच्या समस्याचे समाधान व्हायला हवे होते. तसे न होता या समस्या दिवसेंदिवस आणखी वाढत गेल्या. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मानवाच्या मुलभूत गरजांची पूर्तता या सरकारकडून अपेक्षित होत्या. परंतु त्या गरजांना सुध्दा जनतेला मुकावे लागले. म्हणून अण्णाभाऊ साठे यांना १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळालेले स्वातंत्र्य मंजूर नव्हते.

    अण्णाभाऊ म्हणतात की मिळालेल्या या स्वातंत्र्यातून, इंग्रजाच्या पारतंत्र्यातून शेटजी- भटजी मुक्त झाले खरे,पण बहुजन समाज मोकळा झाला नाही. जर हे स्वातंत्र्य बहुजन समाजाचे असते तर महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना संघर्ष करावा लागला नसता. परंतु हे स्वातंत्र्य खोटे आहे, बहुजनाच्या हिताचे, हक्काचे अधिकाराचे नाही असे अण्णाभाऊ साठे म्हणाले होते. अण्णाभाऊ साठे यांना पोवाडे लिहिण्याचा आणि गाण्याचा नाद लागला होता. विविध पोवाड्यांतून त्यांनी सामाजिक , राजकीय, धार्मिक अशा विविध विषयांवर मंथन करून जनतेला प्रबोधन केले. अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून पोचवले. पुढे त्याचे रशियन भाषेत भाषांतर झाले. रशियाच्या राष्ट्रपतींकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा यथोचित गौरव आणि मानसन्मान झाला.

      “माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली” हे त्यांची गाजलेले उत्कृष्ट लावणी आहे. संयुक्त महाराष्ट्रात अण्णाभाऊंनी लोककलातून समाजप्रबोधन करून त्यांना दिव्यदृष्टी दिली. 

      अण्णाभाऊ साठेंनी स्वत: च्या कर्तृत्वावर रशियाचा प्रवास केला. अण्णाभाऊंची साहित्यसंपदा पाहून त्यांना रशियात साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले. अण्णाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख पोवाड्यातून संपूर्ण जगाला करून दिली. वैजयंता, आवडी, माकडीची चाळ, डोंगरची मैना, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगूज, फकिरा या अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यावर चित्रपट तयार झाले आहेत. आग, आघात, अहंकार ,अग्निदिव्य, कुरूप, चित्रा,फुलपाखरू, वारणेच्या खोऱ्यात ,रत्ना, रानबोका, रुपा, संघर्ष, गुलाम

डोळे मोडीत राधा चाले, ठासलेल्या बंदुका, जिवंत काडतूस,चंदन मूर्ती,मंगला,मथुरा, मास्तर , रानगंगा, कवड्याचे कणीस,धुंद रानफुलांचा,आवड, वैर, पाझर, या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. 

 बरबाद्या कंजारी ,चिरानगरची, निखारा,नवती,पिसाळलेला माणूस, आबी, फरारी,भानामती, लाडी,कृष्णा काठच्या कथा, खुळवाडी, गजाआड ,गुऱ्हाळ ही त्यांची प्रसिद्ध नाटके आहेत.

अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर,कलंत्री,बेकायदेशीर ,शेटजीचं इलेक्शन ,पुढारी मिळाला,माझी मुंबई, देशभक्त घोटाळे, दुष्काळात तेरावा,निवडणुकीतील घोटाळे, लोकमंत्र्याचा दौरा,

पेंद्याचं लगीन, मूक निवडणूक, बिलंदर बुडवे अशी त्यांची साहित्य संपदा आहेत.

स्टलिनग्राडचा पोवाडा , बर्लिनचा पोवाडा,बंगालची हाक,

 पंजाब- दिल्लीचा दंगा, तेलंगणाचा संग्राम,महाराष्ट्राची परंपरा

 अमरनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा कामगार, काळ्या बाजाराचा पोवाडा ही त्यांची प्रबोधनात्मक पोवाडे आहेत. '' माझा रशियाचा प्रवास '' हे अण्णाभाऊंचे एकमेव प्रवासवर्णनपर पुस्तक आहे.

दिड दिवस शाळेत जाणार्‍या अण्णाभाऊ साठेंनी तत्कालीन मनुवादी व प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या साहित्यापेक्षाही उच्च दर्जाची साहित्य निर्मिती केली. अण्णाभाऊ साठेना अवघे 50 वर्षांचे आयुष्य लाभले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १८ जुलै १९६९ रोजी अनंतात विलीन झाले. त्यांनी मराठी साहित्याला खूप मोठे योगदान दिले आहे. १ ऑगस्ट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, त्यानिमित्त त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन!    

 # प्रा दिगंबर कानडजे, मधुकोष निवास,

    सागवन-बुलडाणा 


Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व