रा.दे. ऊर्फ ॲड.भोंडे सरकार : एक सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व 

      विदर्भ आणि मराठवाडा यांना जोडणाऱ्या म्हसला बुद्रुक या गावी रामसिंग देवसिंग भोंडे यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९१८ रोजी झाला. रामसिंग देवसिंग भोंडे हे त्या गावी, पंचक्रोशीत, नव्हे एकूणच बुलडाणा जिल्ह्यात " भोंडे सरकार " म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.भोंडे सरकार या पंचक्रोशीतील एक फार मोठी आसामी होती. तो स्वातंत्र्यपूर्व काळ होता. मोगलाईचे साम्राज्य होते. त्याची झळ मराठवाड्याला लागून असलेल्या जवळपास सर्वच गावांना पोहचत होती. त्या काळी शिक्षण घेण्याची सोय नव्हती.गरीबांना शिक्षण घेणे तर फार कठीण होते. 

       रझाकारांचा फार मोठा प्रभाव या भागात होता. तेथे मोगलाईचे साम्राज्य होते. भोंडे सरकारांची शिकण्याची जिद्द, हुशारी, चिकाटी आणि बाहेर गावी जाऊन शिक्षण घेण्याची मानसिकता लक्षात घेता त्यांच्या वडिलांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण साखळी बुद्रुक आणि शिरपूर येथे तर माध्यमिक शिक्षण बुलडाणा येथे पूर्ण केले.

महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ पंजाबराव देशमुख या महान समाजसुधारकांनी जनतेला शिक्षण घेण्याचे महत्त्व पटवून दिले होते. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव या महामानवांनी त्या काळी जनतेला करून दिली होती. त्यांच्या विचारांनी भोंडे सरकार फार प्रभावित झाले आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी ते तयार झाले. त्यांच्या वडिलांनी भोंडे सरकारांना नागपूर येथील हिस्लॉप कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. तेथे त्यांनी खूप अभ्यास करून बीए ची पदवी मिळविली.. यावरच ते थांबले नाही तर त्यांनी कायद्याची एलएलबी परीक्षा देखील प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना राजकारणाची आवड निर्माण झाली. ते विद्यार्थी छात्रसंघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. ही त्यांच्या नेतृत्व आणि संघटन कौशल्याची एक चुणूक होती.

         नागरिकांना कायद्याचे ज्ञान मिळावे, त्यांना त्यांचे हक्क मिळवून द्यावे म्हणून जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी घर करून रहावे हा विचार घेऊन ते बुलढाण्यात स्थायिक झाले. शहरात वास्तव्यास असताना देखील त्यांनी ग्रामीण भागातील लोकांना अंतर दिले नाही. त्यांच्या कुटुंबाचा फार मोठा विस्तार होता. त्यांचेजवळ खूप जमीन होती. शेती ही " काळी आई " असून तिची आम्ही लेकरं आहोत, ही मूळ धारणा त्यांची होती. शेतीवर ते जीवापाड प्रेम करायचे. ते स्वत:ला भूमीपुत्र संबोधत असे.

       शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी यांचे विषयी यांच्या मनात जिव्हाळा होता. ते वकील असल्याने अत्यंत कमी खर्चात कष्टकरी, कामगार ,शेतकरी, शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकरी यांचे न्यायनिवाडे जिल्ह्याच्या कोर्टात करून देत होते. खऱ्या अर्थाने त्यांनी गोरगरीबांसाठी वकिली व्यवसाय सुरू केला होता. त्यांचे एक बंधू विठ्ठलराव आदर्श शेतकरी होते तर दुसरे बंधू श्रीराम भोंडे हे पंचायत समितीचे सभापती होते. एकंदरीत तिन्ही भावांचे शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक आणि कृषी क्षेत्रातील योगदान महत्वपूर्ण होते. बुलडाणा येथे वकिली व्यवसाय करत असताना भोंडे सरकारांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सहकार या क्षेत्रांत काम करण्याची आवड निर्माण झाली. राजकारणात पडल्याशिवाय जनतेच्या मूलभूत गरजा सोडविता येत नाही याची जाणीव त्यांना झाली होती.म्हणून ते बुलडाणा नगर परिषदेची पहिली निवडणूक लढले आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर १९६२ मध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. यातून त्यांना समाजाभिमुख काम करण्याची संधी मिळाली. 

 त्याकाळी बुलढाण्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती. बुलडाणा शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी कसे उपलब्ध करून देता येईल, याचा भोंडे सरकार रात्रंदिवस विचार करीत असत. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने सरकारी नोकर देखील बुलढाण्यात नोकरी करण्यासाठी तयार होत नव्हते.अशा कठीण परिस्थितीत भोंडे सरकार यांनी मोठा संघर्ष करून येळगाव धरणाची कल्पना मांडली.एवढ्यावरच ते थांबले नाही तर येळगाव धरण पूर्णत्वास नेऊन बुलडाणा शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील लोकांची तहान भागविली. आजही भोंडे सरकार यांना बुलडाणा नगरी आणि लगतचा परिसर कदापिही विसरणे शक्य नाही. आज हे धरण " भोंडे सरकार येळगाव जलाशय " या नावाने ओळखले जाते. येळगाव धरणाचे प्रणेते म्हणून आज बुलडाणा शहरात त्यांची ख्याती आहे.

       पुढे नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भोंडे सरकार थांबले नाहीत.उलट ते अधिक जोमाने कामाला लागले. सन १९७२ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. ही त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची फार मोठी उपलब्धी होती.जनतेच्या अडीअडचणी आणि भौतिक सुविधा सोडविण्यासाठी त्यांना चांगली संधी चालून आली होती. बुलडाणा मतदारसंघाचे आमदार असताना‌ घाटाखाली गावात आणि शेतात विजेची व्यवस्था नव्हती. त्यांनी अधिकारी वर्ग हाताशी धरून वीज जोडणी अभियान राबविले. शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला. गावात आणि शेतात विजेची सोय करून दिल्याबद्दल शेतकरी शेतमजूर सुखावला होता. भोंडे सरकारचा स्वभाव तसा फणसासारखा. ' फणसा अंगी काटे,आत गरांचे साठे ' या उक्तीप्रमाणे ते माणूस चुकल्यावर त्याला कडक शब्दांत समज देत असे. पुन्हा त्यांना त्याची दया यायची. अशा अनेक व्यक्तींना त्यांनी नोकरी लावून दिली आहे. आमदार असताना ग्रामीण भागात सर्वसामान्याला शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना प्राधान्य दिले. गाव तेथे प्राथमिक शाळा हा उपक्रम राबविला.

         गोरगरिबांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अमरावती श्री शिवाजी शिक्षण संस्था सन १९३२ मध्ये स्थापन केली. रादे ऊर्फ भोंडे सरकार, दलितमित्र पंढरीनाथ पाटील आणि कै.ज्योतीराव राऊत यांनी बुलडाणा येथे जिजामाता महाविद्यालय स्थापन केले. शिवाय बुलडाणा, चांडोळ, हतेडी, मासरूळ, मेरा, देऊळगाव मही, आंचरवाडी, चिखली, ईसोली, किन्होळा, शिरपूर, नांदुरा, येथे सुध्दा दहावी- बारावी पर्यंतचे शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल स्थापन करून गोरगरिबांच्या मुलांसाठी उपलब्ध करून दिले. गरीब विद्यार्थ्यांना जेवणाची व राहण्याची सोय व्हावी म्हणून काही ठिकाणी वसतिगृहाची देखील स्थापना केली. यातून अनेक उत्तोत्तम डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, कलेक्टर असे अनेक अधिकारी कर्मचारी या शिक्षण संस्थेतून निर्माण झाले.   

      तसेच भोंडे सरकार यांनी सहकार क्षेत्रात देखील भरीव काम केले.शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी समजून घेतल्या. गावोगावी जाऊन ग्राम सेवा सहकारी पतसंस्थांचे जाळे विणले. ग्रामसेवा सहकारी सोसायटी आणि जिल्हा सहकारी केंद्रीय बॅंक यांचे नाते दृढ केले.परिणाम स्वरूप भोंडे सरकार यांना बुलडाणा जिल्हा सहकारी केंद्रीय बॅंकचे उपाध्यक्ष पद देण्यात आले. तसेच ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर शेतकऱ्यांसाठी सहकारी बीजोत्पादक संस्था स्थापन केली. तसेच ते महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेचे देखील संचालक होते.

       सन १९६८ मध्ये चिखली येथे पार पडलेल्या दलितमित्र पंढरीनाथ पाटील यांच्या हिरकमहोत्सव आयोजनात भोंडे सरकारचा सिंहाचा वाटा होता. भोंडे सरकारांनी जनतेच्या सहभागातून जवळपास एक लाख रुपये निधी जमा करून पंढरीनाथ पाटीलांना यशवंतराव चव्हाणांच्या शुभहस्ते अर्पण केला. मिळालेला निधी पुढे पंढरीनाथ पाटलांनी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या उभारणीसाठी लगेच देऊन टाकला.

शेतकऱ्यांच्या जलसिंचनासाठी धरणे,तलाव छोटेमोठे कट्टे कसे बांधता करता येईल, यावर ते माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे सोबत नेहमी चर्चा करीत असत. पद्मावती धरणाचे भूमीपूजन त्यांनी भारतभाऊ बोंद्रे यांचेकडून करून घेतले. 

       १५ ऑगष्ट १९८८ हा दिवस त्यांचे साठी काळरात्र ठरला. ते मृत्यू शय्येवर असताना देखील त्यांनी पद्मावती धरणाकडे लक्ष द्या अशी आठवण माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांना करून दिली होती. यावरून भोंडे सरकार यांना शेतकऱ्यांविषयी किती कळवळा होता हे लक्षात येते.

    भोंडे सरकार यांचें शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी व सहकार क्षेत्रातील कार्य लक्षात घेता ते एक बहुआयामी सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व होते यात शंकाच नाही. ते मायाळू, सहिष्णू, दयाळू, संवेदनशील, परोपकारी,प्रेमळ, शेतीनिष्ठ, आणि संयमी होते.

 १५ ऑगस्ट रोजी त्यांची पुण्यतिथी येते, त्या निमित्ताने त्यांच्या जीवन-कार्यावर प्रकाशझोत टाकण्याचा मी अल्पसा प्रयत्न केला आहे. त्यांना विनम्र अभिवादन!

# प्रा. डी. एम. कानडजे, मधुकोष निवास 

जुना अजिसपूर रोड,सागवन,बुलडाणा (८२७५२३१८७४)







Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत