सैनिक दलात काम करणारे खेचर : पेडोंगी

          * सैनिक दलात काम करणारे खेचर : पेडोंगी *

        भारतीय सैन्यासाठी अविरत कष्ट उपसणाऱ्या, आपल्या जीवाची पर्वा न करता स्वामिनिष्ठेने शत्रूराष्ट्राच्या गोळ्यांच्या वर्षावातही आपल्या पोस्टवर रिपोर्टिंग करणाऱ्या एका स्त्रीलिंगी खेचराची ही एक गोष्ट. ही माहिती मी गुगल वरून आणि योगेश शुक्ल यांच्या साहित्यातून संकलित केली आहे. पेडोंगीच्या पराक्रमाची "गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये" नोंद झाली आहे . बऱ्याच लोकांना माहित नाही की, सरहद्दीवर भारतीय सेनेचा एक मजबुत कणा असलेला खेचर सैन्यासाठी माल वाहतूकीचे काम करते. पेडोंगी हे एक स्त्रीलिंगी खेचर आहे. सीमेवर, जिथे वाहतुकीची साधने नसतात, रस्ता नसतो, रेल्वेलाईन नसते, तेथे सैन्याला दारुगोळा आणि इतर उपजिवेकेची साधने, इंधन आणि रसद पुरविण्याचे काम खेचरं करतात.                  

        पेडोंगी नावाचे एक खेचर साधेसुधे नव्हते. तर भारताच्या संरक्षणात आपलं आयुष्य तिने वेचलं आहे. जेव्हा दळणवळणाची साधने नव्हती तेव्हा भारतीय सेनेत जवळपास ६००० पेक्षाही जास्त खेचरं दळणवळणाचे काम करित होती. भारताची सरहद्द उत्तरेस हिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेली आहे. ती समुद्रसपाटीपासून जवळपास १७,००० फुटापर्यंत उंच आहे. या उंच शिखरांवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून भारताच्या सरहद्दीचे रक्षण असतात. भारतीय सेनेच्या अनेक पोस्ट अशा ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी कोणतेच वाहन जाऊ शकत नाही.तेथे खाण्यापिण्याची व्यवस्था नसते. तिकडे स्वतःचा जीव वाचवणं हीच मोठी कसरत असते, अशा भागात दारुगोळा, रसद आणि इंधन इत्यादि गोष्टी वाहून नेणं हे किती कष्टाचे कठीण का असते,याची कल्पनाच न केलेली बरी!

      या मादी खेचराचे सैनिकी नाव होते 'पेडोंगी. तिचा स्टाफ नंबर १५३२८ हा होता. इ.स. १९६२ मध्ये पेडोंगी भारतीय सैन्यात दाखल झाली. त्या काळात आधुनिक संपर्क प्रणाली आणि प्रगत अशी वाहन नसल्याने भारतीय सैन्याची सगळी जबाबदारी खेचरांवर अवलंबून होती. बॉम्बच्या स्फोटात,गोळ्यांच्या वर्षावात, निसर्गाच्या प्रतिकुल परिस्थितीला न जुमानता पेडोंगी ने निमूटपणे काम केले. तसेच तिच्या सहकाऱ्यांनी भारतीय सैन्याला रसद पुरवण्याचं काम केलं. १९७१ सालची गोष्ट. भारत- पाकिस्तान युद्ध चालू होतं. भारतीय सेनेला रसद पुरवठा करित असताना अचानकपणे पेडोंगीला पाकिस्तानी सैन्यांनी पकडले आणि बंदी बनविले. तिला पाकिस्तानी सैन्याला मदत करण्यासाठी कामाला लावलं. 

     अहो! कोण म्हणते प्राण्यांना भावना नसतात ? भारताच्या सरहद्द रक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकणारी पेडोंगी, संधी मिळताच पाकिस्तानी सैन्याला गुंगारा देऊन परत आली होती. पाठीवर असणाऱ्या मिडीयम मशीनगन आणि दोन बॉक्स गोळ्यांसकट , आपल्या जिवाची पर्वा न करता गोळ्यांच्या वर्षावात जवळपास २५ किलोमीटरचे अंतर चालून ती आली होती. तिची प्रामाणिक देशभक्ती पाहून भारताच्या बटालयीन कमांडरने पेडोंगीच्या पराक्रमाची दखल घेतली. कोणी म्हणेल की पेडोंगीला रस्ता माहीत होता म्हणून परत आली. पण ती एकटीच का परत आली? तिच्यासोबत इतर पकडलेली खेचरं परत का आली नाहीत ? पण ती जिवावर उदार होऊन भारताच्या सरहद्दीत परत आली.

      १९८७ ला पेडोंगी भारतीय सेनेच्या 53 एटी कंपनी (एएससी) मध्ये काम करत होती. त्याकाळात २९ वर्षाची असणारी पेडोंगी सर्वात वयोवृद्ध खेचर होती. पण त्या वयातही आपल्या पाठीवर जवळपास १७,००० फूट उंचीवर सामान वाहून नेण्याची तिची क्षमता होती. युनिटचे कमांडिंग ऑफिसर मेजर चुनीलाल शर्मा ह्यांना पेडोंगीच्या पराक्रमाची नोंद घेताना तिला सामान वाहण्यापासून मुक्त केलं. तिची ऑफिशियल नियुक्ती 53 एटी (एएससी) कंपनीची ती देवदूत होती. ह्या युनिटच्या १९८९-९० च्या ग्रिटींग कार्डवरही पेडोंगीचे तिच्या सेवेसाठी स्थान दिलं गेलं. तिची बरेली आणि उत्तरप्रदेशमध्ये नियुक्ती करण्यात आली. 

      १९९२ ला पेडोंगीला एका खास कार्यक्रमासाठी दिल्लीला बोलावण्यात आलं होतं. तिच्या पराक्रमासाठी आणि देशसेवेसाठी कर्नल गिरधारी सिंग ह्यांच्या हस्ते मखमली निळ्या घोंगडीने सन्मानित करण्यात आले. त्याच वेळेस तिला 'पेडोंगी' हे नाव देखील मिळाले. उत्तर सिक्कीममध्ये असलेल्या पेडोंग ह्या युद्धभूमीच्या नावावरून तिचं नामकरण पेडोंगी करण्यात आलं होतं. भारतीय सेनेत अतुलनीय शौर्य, सेवा देणाऱ्या घोडयांना आजवर नाव देण्याचा सन्मान मिळालेला होता. पण पेडोंगी ही पहिली खेचर होती जिला हा सन्मान देण्यात आला. 

     सन १९९७ मध्ये पेडोंगीच्या सेवेची नोंद " गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड " मध्ये घेण्यात आली. सर्वात जास्त कालावधीसाठी सेवा देणारी पेडोंगी खेचर, अशी नोंद सुवर्ण अक्षरांनी इतिहासात नोंदवण्यात आली. २५ मार्च १९९८ रोजी पेडोंगीने अतिशय समाधानाने अखेरचा श्वास घेतला.भारतीय सेनेतील खेचरांच्या सेवेतील एका युगाचा अंत झाला. तिला शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. असं म्हणतात की खेचराला एकदा रस्ता दाखवला की पुढल्या संपूर्ण आयुष्यात तो तुम्हांला रस्ता दाखवेल, एवढी त्याची प्रखर स्मरणशक्ती असते. पेडोंगीचा पराक्रम अभूतपूर्व असा होता. आपला शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखण्याची कला तिला अवगत होती. संपूर्ण आयुष्य तिने १७,००० फुटावर भारतीय सरहद्दीचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी वेचलं. तिचे हे योगदान गौरवास्पद आणि अविस्मरणीय होते. पेडोंगीला आज जाऊन अनेक वर्षे झाली. देशासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या पेडोंगीला मनापासून सलाम.

# प्रा दिगंबर कानडजे 

मधुकोष निवास, सागवन-बुलडाणा 

Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व