संजय गोविंदराव टाके : एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

       संजय गोविंदराव टाके : एक अष्टपैलू व्यक्तिमत्व 

           बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील संभाजी नगर प्रभागात संजय गोविंदराव टाके यांचा जन्म २५ जानेवारी १९६८ रोजी एका गर्भश्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील गोविंदराव रंगनाथ टाके आणि आई निर्मला गोविंदराव टाके हे त्याकाळी देशमुख घराण्याला शोभेल असे एक साजेसे वैभवसंपन्न कुटुंब होते. त्यांचे वडील शिकलेले असल्यामुळे त्यांना महसूल खात्यात नायब तहसीलदार पदाची चिखली येथे नोकरी मिळाली होती. दुर्दैवाने १९ जून १९८५ रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. संपूर्ण कुटुंबावर अवकळा पसरली. त्यावेळी संजय टाके बिकाॅम च्या पहिल्या वर्षात शिकत होते.

         परिवारात संजय टाके हे मोठे असल्याने खचून गेले. तरीही त्यांनी स्वतःला सावरलं. ते हतबल न होता नव्या जोमाने कामाला लागले. पदवीधर होऊन मोठं व्हावं आणि कुटुंबालाही मोठं करावं या हेतूने प्रेरित होऊन ते अभ्यासाला लागले. परंतु योगायोग सांगून येत नाही. कुटुंबाला आर्थिक हातभार लावून सुस्थितीत आणावे असे त्यांना वाटले आणि म्हणून त्यांनी अर्धवट शिक्षण सोडून नोकरी पत्करली. लवकरच अनुकंपा तत्त्वावर त्यांना महसूल विभागात नोकरी मिळाली. ते चिखली तहसील कार्यालयात वडिलांच्या आशीर्वादाने २६ ऑगस्ट १९८५ रोजी अवघ्या १८ व्या वर्षी कनिष्ठ लिपिक पदावर रुजू झाले.

       संजय टाके यांना दोन बहिणी. वडिलांनी मोठ्या बहिणीचे लग्न नोकरीत असताना केले होते. त्यांच्या निधनानंतर कर्ता पुरुष म्हणून दुसऱ्या लहान बहिणचे लग्न करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. बुलढाणा येथील लोकल फंड विभागात प्रभाकर घोडके हे ऑडिटर होते. या व्यक्तीची शहानिशा करून अतिशय चांगल्या पद्धतीने लहान बहिणचे लग्न त्यांनी लावून दिले. एकदाचे ते वडिलांच्या वचनातून मोकळे झाले.

       संजयचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आदर्श विद्यालय चिखली येथे झाले. त्यांचे वर्गशिक्षक असोलकर सर होते.ते फार शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे होते. त्यांना शिस्त, प्रामाणिकपणा, सहकार्यवृत्ती,परोपकार याचे बाळकडू शालेय शालेय जीवनापासून सरा़कडून मिळाले होते. आई आणि स्वतः एवढाच परिवार असल्यामुळे आणि नोकरीत असल्या कारणाने आईने लग्नाचा त्यांच्यामागे सतत तगादा लावला होता. शेवटी आईच्या आग्रहाखातर त्यांनी २६ एप्रिल १९९५ रोजी भुसावळ येथील अनिता नामक सुसंस्कारित मुलीशी लग्न केले. " मी जरी बिकाॅम नसलो तरी माझी पत्नी बिकाॅम आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो " असे ते आवर्जून सांगतात.

      त्यांनी पत्नीला बंधनात न ठेवता स्त्री स्वातंत्र्य दिले. 31 जानेवारी 2025 रोजी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी पत्नीला कार व एँक्टिवा चालवायला शिकवली. तसेच घरची आर्थिक व्यवहाराची जबाबदारी तिच्याकडे सोपविली, असे ते सांगतात. नोकरीत असताना त्यांचा सर्वसामान्य लोकांशी संपर्क आला. त्यात एक गोष्ट त्यांना समजली. लोकांशी तुम्ही फक्त प्रेमाने बोलले तरी त्यांचे समाधान होते. तसेच आपल्याकडे कामासाठी आलेल्या व्यक्तीमध्ये जर आपण विठ्ठल पाहिला,त्याचे काम विनाविलंब आणि विनासायास करून दिले तर त्यांना झालेला आनंद जणू काही विठ्ठलमय होते. नोकरी करत असताना कुणाचेही काम शक्य तितक्या कमी वेळात करत असल्याने त्यांचे चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच माझे सुख होते असे संजय टाके आवर्जून सांगतात. देउळगाव मही येथे मंडळ अधिकारी असताना ते नियत कालावधीत फेरफार मंजूर झाली की नाही हे संबधिताला व्हाटस् अप द्वारे सकाळी ते तातडीने कळवत असे.. 

      सामाजिक कार्य म्हणाल तर त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी खूप काही केले आहे. मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असतांना त्यांनी सरंबा येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा एक मुलगा शिक्षणासाठी दत्तक घेतला होता. तसेच देऊळगाव राजा येथे पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असतांना बोरखेडी बावरा गावच्या जि.प.शाळेतील 25 लहान विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक स्वेटर व कानटोपी त्यांनी स्वखर्चाने वाटप केली आहे. कारगिल युध्दानंतर जवळपास 15 वर्षे त्यांना मिळणाऱ्या पगारातून एक दिवसाचा पगार त्यांनी सैनिकांना मदत म्हणून जिल्हा सैनिक कार्यालयात जमा केला आहे. या कार्याबद्दल त्यांना जिल्हाधिकारी यांचे हस्ते वेळोवेळी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित देखील करण्यात आले आहे.

       त्यांनी सन २०१५ पासून माॅर्नींग वाॅक ला सुरुवात केली. तेव्हा कानडजे सर,जगताप सर,सावळे सर,सैय्यद सर,चवरे सर,शिंदे सर,रिंगे सर, हे नेहमी सकाळी फिरायला जात होते.

मित्रांच्या संपर्कात आल्यामुळे मला जीवन जगण्यासाठी बळ मिळाले आणि मी अंतर्बाह्य बदलून गेलो,असे भावोद्गार त्यांनी काढले. त्यांनी एकदा ठरवले की मग त्यात बदल होणे नाही ही त्यांची खरी ओळख होती. ती आजही टिकून आहे. लोकं म्हणतात की स्वभाव बदलत नाही. पण त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे की संयम ठेवला आणि त्यात सातत्य ठेवले की आपसूकच माणूस बदलून जातो.

      त्यांनी लिपिक पदापासून आपल्या नोकरीला महसूल विभाग नोकरीला सुरूवात केली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना कनिष्ठ लिपिक,अव्वल कारकून, मंडळ अधिकारी,अन्न पुरवठा निरीक्षक आणि शेवटी नायब तहसीलदार म्हणून प्रमोशन मिळाले. चिखली ,मेहकर , जळगाव जामोद , देऊळगाव राजा आणि अमरावती अशा विविध ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी मिळाली. काम करित असताना त्यांनी 'जनसेवा हिच सेवा' समजून जवळपास ४० वर्षे निष्कलंक सेवा करून शेवटी ते नायब तहसीलदार या पदावरून सेवानिवृत्त झाले..

संजय टाके यांना दुसऱ्याला मदत करणे, गरिब आणि होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, कास्तकारांच्या जिवनात नवचैतन्य निर्माण करणे, निवडणूक सारख्या कामात जबाबदारीने काम करणे आणि सायकलिंग करणे हे छंद त्यांनी जोपासले आणि त्यात रस घेऊन काम केले.

      मागील 4 वर्षापासून दररोज पहाटे 5 वाजेपासुन सायकलींग करतात. 100 दिवस सतत 50 किमी सायकलिंग केल्याबद्दल श्री किरण पाटील जिल्हाधिकारी यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. मागील वर्षी चिखली ते पंढरपूर अशी 425 किमी सायकल वारी त्यांनी केली. त्यांचा मोठा मुलगा ऋषीकेश हैद्राबाद येथे आंतरराष्ट्रीय कंपनीत इंजिनिअर म्हणून अतिशय चांगल्या पँकेजवर कार्यरत आहे . तर लहान मुलगा उच्च शिक्षणासाठी पुण्याला जाणार आहे. त्यांची मुलगी दामिनी विवाहित असून बँकेच्या परिक्षेची तयारी करते आहे. त्यांनी घराचे परिसरात उन्हाळ्यात पक्ष्यासाठी 10 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्ववस्था केलेली आहे. नोकरीत असताना प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्यांचा कर्मचारी वर्गात आणि समाजात त्यांचा नावलौकिक आहे.

    आयुष्यात कितीही खडतर प्रसंग आले तरी ते न डगमगता त्यातून ते विनासायास बाहेर पडले. 40 वर्षे प्रदीर्घ अशी निष्कलंक सेवा करुन ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा स्वभाव संवेदनशील,सहिष्णू, संयमी, समाजशील आणि सर्वांना हवाहवासा आहे. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे असे मला वाटते.

प्रा. दिगंबर कानडजे,

मधुकोष,सागवन - बुलडाणा.

Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व