संघर्षशील व्यक्तिमत्त्व : तुळशीराम जगदेव तायडे
संघर्षमय जीवनातून वाटचाल करणारे : तुळशीराम जगदेव तायडे
--------------------------------------------------------------------------
तुळशीराम जगदेव तायडे आजरोजी बुलडाणा येथे राहत असून ते सध्या शह्यांशी वर्षाचे एक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचे आईवडील जगदेव आणि आई आपाबाई हे निरक्षर असून कोऱ्हाळा बाजार येथे राहत होते. तुळशीराम जगदेव तायडे यांचा जन्म १९३९ साली झाला असावा असे ते सांगतात.जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मी सात -आठ वर्षाचा होतो असे त्यांनी सांगितले. आईवडील काय करत होते, कसे देवाघरी गेले, हे त्यांना काहीही माहिती नाही.सांगता देखील येत नाही. साहाजिकच आई वडिलांचा सहवास त्यांना मिळाला नाही. मोलमजुरी हेच त्यांचे पोट भरण्याचे साधन होते. शिकण्याची इच्छा जरी झाली तरी शिकायला जायचं कोठे हा प्रश्न होता. त्याकाळी शिकण्याची सोय नव्हती.
शेवटी अनाथ, निराधार म्हणून हातेडी येथील त्यांच्या मामांनी त्यांचा सांभाळ केला होता. मामा रावुबा जाधव यांचेकडे हातेडी येथे जवळपास पंधरावीस एकर जमीन होती. शिवाय बैलं,बकऱ्या,गायी आणि काही कोंबड्या देखील होत्या. तसे पहिले तर त्यांच्याकडे माणसाची गरज होती. हे सर्व जित्राब सांभाळण्यासाठी एक काळजीचा पोरगा पाहिजे म्हणून तुळशीरामला मामांनी कायमचे ठेवून घेतले. ते प्रामाणिकपणे त्यांच्या घरी काम करू लागले. तुळशीराम बाबा मामाच्या घरी लहानपणापासूनच येजा करित असत. त्यांना इमानदारीने काम करण्याची सवय होती. सकाळ संध्याकाळ तुळशीराम आपल्या घरी काम करतो आहे, हे पाहून त्यांना कीव यायची. आपला भाचा लय कामाचा आहे, तो रात्री बे रात्री शेतामध्ये राखण करतो. शेतात कष्टांचे काम करतो. ढोरावासरांची काळजी घेतो. मांडवामध्ये असलेली चित्रा गाय स्वतः लक्ष घालून सांभाळतो, हे त्यांना माहीत होतं आणि म्हणून ते तुळशीराम भाच्याला जीव लावत असे. स्वतःच्या लेकराप्रमाणे कपडेलत्ते आणि खायाप्यायला देत असे. यात्रेचे दिवस आले की ते तुळशीरामला चारआठ आणे यात्रेसाठी खर्ची देऊन यात्रेला जाण्यासाठी मुभा देत होते.
पुढे मामांनी त्यांनी केलेल्या अपार कष्टांची परतफेड म्हणून त्यांनी तळेगाव येथील काळुबा सपकाळ यांच्या शांता नावाच्या मुलीशी तुळशीरामचे लग्न लावून दिले. तेव्हा ते अंदाजे २० वर्षांचे होते. मामांच्या कुटुंबात त्यांनी खूप इमानदारीने बरेच दिवस काम केले. परावलंबी जीवन जगण्यापेक्षा अलग राहून स्वतः काहीतरी करून दाखवावे असे त्यांना वाटले. क्षणाचाही विलंब न लावता अंगावरच्या एका कपड्यानीशी ते मामाच्या घरातून बायकोला घेऊन बाहेर पडले. आता राहयचे कोठे ? हा प्रश्न त्यांना पडला होता. चुलत मामा श्रीपत यांचे बैलांच्या कोठ्यात राहण्यासाठी काही दिवस जागा मिळाली.एका बाजूला बैलं राहायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी एक कुडाची खोली तयार करून त्यात संसार थाटला. ते जिद्दी, स्वाभिमानी, इमानदार आणि मेहनती होते. आजही ते तसेच आहे. स्वतः शेतमजूरीला जाऊन त्यांनी काटकसरीने आणि निगोतीने संसार केला.
तुळशीराम जगदेव तायडे यांना दोन मुले आणि दोन मुली असे एकूण चार अपत्ये. उपचाराअभावी त्यातील एक मुलगा आणि एक मुलगी लहानपणीच दगावली. पुढे निर्मला आणि बाबुराव या दोन अपत्यांची त्यांनी काळजी घेतली. ते स्वतः अर्धपोटी राहिले पण या दोन लेकरांना त्यांनी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपले. अपार कष्ट केले. स्वतःचे घर नसल्यामुळे त्यांना सरकारी एक गुंठा प्लाट मिळाला. त्यांना ही जागा मिळाल्यामुळे अतिशय आनंद झाला. भविष्यात स्वतः च्या मालकीचे एक घर बांधू, असा विचार त्यांच्या मनात आला असावा. शिक्षण घेतलं की माणूस मोठा होतो, हे तुळशीराम बाबाला कळत होते. आपण जरी शिकू शकलो नाही तरी मुलाला शिकवावं आणि त्याला मोठं करावं हे स्वप्न त्यांनी पाहिले.
त्यांनी कुटुंबासाठी खुप कष्ट सोसली. पोटभर खायला मिळालं नाही. हे कुटुंब कायम अर्धपोटी राहायचे. ज्यांच्याकडे कामाला जात होते त्यांची कामे वेळेवर झाली पाहिजे, त्यांचे नुकसान व्हायला नको. रोजंदारी मिळो वा न मिळो पूर्णपणे काम संपल्यानंतरच घरी यायचे. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. त्यांची काम करण्याची निष्ठा वाखाणण्याजोगी होती. आजचे मजूर आता पूर्वीसारखे इमानदार राहिले नाही. ते ज्या ज्या ठिकाणी मोलमजुरी करायचे, त्यांची मुले आजही घरी येऊन सांगतात की सर, तुमचे बाबा आमच्याकडे कामाला यायचे तेव्हा त्यांनी कधीही मजुरीचे पैसे आम्ही स्वत: दिल्याशिवाय घेतले नाही. तसेच असेही इमानदारीपूर्वकपणे सांगतात की त्यांच्याच कामाच्या मजुरीचे पैसे अजूनही आमच्याकडे निघू शकतात. कारण कधीही त्यांनी हिशेब केला नाही. जे दिले ते घेतले. यातून मिळणाऱ्या मजुरीवर मुलाला शिकविले आणि घरप्रपंच देखील भागविला.
बाबांनी मोलमजुरी करून त्यांच्या मुलाला शिकविले तसेच मुलाने सुध्दा फावल्या वेळात कष्ट करून आणि काटकसरीने शिक्षण घेतले. आज त्यांचा मुलगा बाबुराव शिकून शिक्षक झाला आहे. सध्या ते गेल्या २५ वर्षांपासून मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेवर कार्यरत आहे. त्यांनी शून्यातून, संघर्षातून आणि नोकरीच्या भरोशावर चांगली प्रगती केली. आज त्यांचे जवळ १६ एकर बागाईत शेती आहे. त्यांची बागायती शेती पूर्ण पाण्याखाली असून त्यांनी सिंचनाची व्यवस्था केली आहे. त्यांचे बुलढाणा येथे चांगले घर आहे. तुळशीराम बाबांचे एक नातू एमबीबीएस असून तो वैद्यकीय अधिकारी म्हणून पुण्यात आहे. मोठी नात इंजिनिअर असून ती पुण्यात कंपनीमध्ये चांगले काम करते आहे. लहानी नात बीएस्सी (कृषी) पदवीधर असून उच्च शिक्षण घेण्याच्या तयारीत आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच की आजीआजोबा, आईवडील जरी शिकले सवरले नसले तरी ते खूप प्रामाणिक, इमानदार आणि कष्टकरी होते. त्याचेच फळ म्हणून आजरोजी त्यांचे कुटुंब उच्चशिक्षित आणि सुसंस्कारित झाले आहे. आज तुळशीराम बाबा सुखासमाधानाने जीवन जगत आहे.
आज तुळशीराम जगदेव तायडे निरोगी दीर्घायुष्य जीवन जगत आहे. ज्येष्ठ माणसं जरी निरक्षर असले तरी त्यांचे विचार हे सुविचार आहेत. त्यांचेजवळ अनुभवांची शिदोरी आहे. त्यांनी मला बोलताना सांगितले की सर, कुठलीही गोष्ट विचारल्याने नासत नाही,तर ती न विचारल्याने नासते. खरोखर किती अर्थपूर्ण विचार त्यांनी मांडला आहे हा ! हा सुंदर विचार मला बरेच काही शिकवून गेला. ते साधे, सरळ, कष्टाळू, प्रेमळ आणि परिस्थितीची जाणीव ठेवून आहे. आज ते ८६ वर्षांचे असून निरोगी जीवन जगत आहे. ते चांगले फिरतात , चालतात, बोलतात आणि त्यांची स्मरणशक्ती सुध्दा अजून उत्तम आहे.
# प्रा दिगंबर कानडजे (8275231874)
मधुकोष, सागवन-बुलडाणा