गोदावरीबाई - एक बाणेदार व्यक्तिमत्त्व

 गोदावरीबाई भुतेकर-पाटील : एक बाणेदार करारी व्यक्तिमत्त्व 

       बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस बुll या गावी एका गर्भश्रीमंत कुटुंबात २४ मे १९३९ रोजी गोदावरीबाईचा जन्म झाला. रुस्तुमराव चंद्रभान पाटील पऱ्हाड आणि आई जनाबाई या वारकरी संप्रदाय विचारधारेच्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. सर्व भावंडात त्या मोठ्या होत्या. त्यांचा कुटुंबविस्तार फार मोठा होता. त्यांना ५ भाऊ व ४ बहिणी. त्यांच्या वडिलांजवळ त्या काळात ५०० एकर जमीन होती,असे ते सांगतात. परिसरातील पंचक्रोशीत त्यांच्यासारखे सधन कुटुंब नव्हते. काळ्या आईवर त्यांचे नितांत प्रेम होते. शेती म्हणजे एक सोन्याची खाण आहे अशी त्यांची धारणा होती. सांगायचे तात्पर्य म्हणजे त्या भागापुरते ते स्वातंत्र्यापूर्वी त्या गावचे एक मोठे वतनदार होते. ते परोपकारी आणि समाजशील होते. संध्याकाळी गावात ते फेरफटका मारायचे. ज्या घरातून धूर निघाला नाही , त्या घरात ते जायचे. चूल का पेटली नाही, हे आस्थेने विचारपूस करायचे.त्यांना कळायचे की हे घर आज उपाशी आहे. त्या कुटुंबाला ते पायली दोन ज्वारी बाजरी आणि काही सामान देऊन मदत करायचे. गावात कोणीही अर्धपोटी राहून रात्र काढायला नको अशी त्यांची भावना होती. अनेक कुटुंबांना त्यांनी मानसिक आधार देऊन आर्थिक मदत देखील केली आहे. यावरुन हे कुटुंब किती कनवाळू आणि संवेदनशील होते हे लक्षात येते.

     भारतीय स्वातंत्र्यापूर्वी शिक्षणाची फार हेळसांड होती. केवळ तालुक्याच्या ठिकाणी आणि काही ठिकाणी मोठी वस्ती असलेल्या गावात शाळा होत्या. मुलगी ही शिकली की चांगला प्रपंच करू शकते. याची जाणीव तिला झाली. आपणही शिकले पाहिजे आणि इतरही मुलींना शिकविण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे हा विचार गोदावरीबाईच्या मनात आला आणि तो विचार तिने गल्लोगल्ली-घरोघरी पेरला. परंतु तो काळ शिक्षणाला महत्त्व देणारा नव्हता. मोठ्या घरची फार कमी मुलेमुली शाळा शिकायची. गोदावरीबाईंना देखील शिक्षणाची आवड होती. गोदावरीबाईंना शिक्षणाचे बाळकडू त्यांच्या वडिलाकडून मिळाले. गोदावरीचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण डिग्रज बुद्रुक येथे झाले. गावात आता पुढील शिक्षणाची व्यवस्था नव्हती. 

       गोदावरीची पुढे शिकण्याची खूप इच्छा होती. पण मार्ग सापडेना. तिचे लहान बंधू बुलढाणा येथील डॉ. एम.आर.पऱ्हाड यांचे शिक्षणासाठी देऊळगावराजाला खोली करून तेथे कोणालातरी राहणं भाग होतं. तेव्हा गोदावरीच्या ही गोष्ट लगेच लक्षात आली. तिने स्वतःहून होकार दिला आणि ती भावाला घेऊन देऊळगावराजाला आली. भावालाही शिकविले आणि सर्व कामधाम करुन स्वतःही शिक्षण घेतले. येथे त्यांनी स्वतःचे सातवी पर्यंतचे शिक्षण कस्तुरबा हायस्कूल देऊळगावराजा येथे पूर्ण केले. त्यांना सातवी पास झाल्याचा आनंद काही वेगळाच होता. त्यावेळी त्यांना सहज नोकरी लागत होती, पण त्या काळी मुलीने नोकरी करू नये असा शिरस्ता होता. शिवाय उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी आमजनतेची धारणा होती. तेव्हा मुलीचं काय, पण पुरुष देखील नोकरी करण्याच्या मनस्थितीत नव्हते.

       त्या सर्वसामान्य मुलींपेक्षा सुशिक्षित ,देखण्या आणि घरंदाज होत्या. आईवडिलांना लग्न करण्याची त्या काळी फार घाई असायची. जवळपास बालविवाहाचे प्रमाण तेव्हा खूप होते. गोदावरीबाईंचे लग्न अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी इसरूळ मंगरूळ येथील एका गर्भश्रीमंत कुटुंबातील संतोषराव पाटील यांचे चिरंजीव बाजीराव पाटील यांचेशी झाले. तेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती. बाजारहाट, लग्नकार्य, जत्रा,नवस ,जावळं,शेंडी,मावंजा अशा कामांसाठी बैलगाडी, दमणी,छेकडा अशा वाहनांचा वापर केला जात होता. गोदावरीबाईंच्या कुंकवाच्या कार्यक्रमासाठी संतोषराव पाटलांनी ६० पेक्षाही जास्त बैलगाड्या आणल्या होत्या. पुढे त्यांचे लग्न याहीपेक्षा मोठ्या थाटामाटात पार पडले. गोदावरीचे पती बाजीराव पाटील यांना राजकारण व समाजकार्यात विशेष रस होता. ते उत्तम शेतकरी तर होतेच पण चांगले मुरंबी राजकारणी देखील होते. राष्ट्रीय काँग्रेसचे ते कार्यकर्ते होते. त्यांनी गावचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य ही पदे उपभोगली होती. त्यांचा पंचक्रोशीत फार गवगवा होता.

       गोदावरीबाई ह्या जशा सामाजिक होत्या तशाच आध्यात्मिक देखील होत्या. त्यांना गायनाची व वाचनाची खूप आवड होती. त्यांचा पेहराव नेहमी स्वच्छ व नीटनेटका असायचा. त्यांच्या डोक्यावरून कधी पदर ढळलत नव्हता. त्यांना भजन, कीर्तन, भागवत सप्ते,भंडारे यात आवड होती. ते कोणत्याही कार्याला सढळ हाताने मदत करित असे. त्यांचे हरिपाठ आणि भगवतगीतेतील काही अभंग तोंडपाठ होते. त्या सामाजिक, संवेदनशील, परोपकारी आणि दानशूर होत्या. अडल्यानडल्यांची कामे त्या जातीने लक्ष घालून करीत असे. त्यांच्याजवळ जातीभेद नव्हता. कोणत्याही जातीधर्मांची माणसं त्यांच्या माजघरात वावरत असे. बारा बलुतेदार आणि पै पाहुणा त्यांच्या घरातून कधी उपाशी गेला नाही की खाली हात गेला नाही. पती बाजीराव पाटील जनतेची सेवा करण्यात मग्न, तर गोदावरी पाटलीणबाई शेती आणि शेतमजूर सांभाळण्यात मग्न.

       गोदावरीबाईंना दोन मुलं आणि चार मुली. त्यांनी सर्वांना शिकवून सुसंस्कारित केले. या मुलांमुलीमध्ये माणूसकीचे आणि सामाजिक बांधिलकीचे बाळकडू त्यांना वारसाहक्काने आईवडिलांकडून मिळाले. त्यांच्या मुली कोठेही कमी पडल्या नाहीत. त्यांनी निगोतीने, काटकसरीने आणि प्रामाणिकपणे संसार केला आणि आईवडिलांचे नाव काढले. ह्या सर्व मुलींना त्यांच्या जडणघडणीत आईवडिलांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन कामाला आले.

       सन १९७२ चा दुष्काळ भयंकर मोठा होता. याची झळ विशेष करून गरिबांना आणि शेतकऱ्यांना जास्त पोहचली होती. जनावरांना चारा मिळत नव्हता की माणसाला खायाला अन्न मिळत नव्हते. अशा परिस्थितीत माणसं भाजीपाला आणि कांदे उकडून खात होती. कसेबसे दिवस काढत होती. तेव्हा अमेरिकेकडून जव गहू आयात करण्यात आला होता. तो खायला कचरकचर लागायचा. तेव्हा आहे त्या परिस्थितीत पोटाची आग विझवण्यासाठी ते जव गहू खावे लागले. अशा बिकट परिस्थितीत गोदावरीबाईंनी गरिबांना हिंमत दिली.आजचे वाईट दिवस निघून जातील, काळजी करू नका एक दिवस पुन्हा सुखाचा येईल असा आशावाद ती भेदरलेल्या जीवात पेरत होती. गरजूंना धान्य वाटप करत होती. भुकेलेल्या अन्न द्यावे , तहानलेल्यांना पाणी पाजावे, हा त्यांचा मूळ स्वभाव होता. गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात त्या नेहमी धावून जात असत. त्यांच्या शेतात काम करणारं शेतमजूर तर त्यांनी स्वतःचे कुटुंब समजून सांभाळलं होतं.त्यांची उपासमारी पासून काळजी घेतली होती. शेतात कष्टांची कामे असो अथवा नसो त्यांना गोदावरीबाईने धान्यांच्या स्वरूपात आणि काही पैशाच्या स्वरूपात मदत सुध्दा केली.               

        दवाखाना करण्यासाठी आणि सुखदुःखाच्या कामासाठी पैसे देऊन बैलगाडी दिली. गोदावरीबाईला जरी वेद कळत नसले तरी त्यांना गरिबांच्या मनातील वेदना कळत होत्या. त्यांच्या शेतातील भाजीपाला, हिरव्या मिरच्या,भूईमुगाच्या शेंगा,जळतण, मक्याची कणसे असा वाणोळा शेतमजूरांना आणि बारा बलुतेदारांना तो विनासायास मिळत होता. अहो शेतात काय पिकत नाही?. अठरा पगडराशींचे धान्य काळी आई भूमीपुत्रांना देते. खरोखर या काळ्याआईचे आणि गोदावरीबाईचे उपकार कोणताही लाभार्थी विसरणे शक्य नाही असे मला वाटते.

       गोदावरीबाईचे थोरले चिरंजीव पांडुरंग पाटील भुतेकर यांनी इसरूळ मंगरूळ या गावचे दहा वर्षे सरपंच पद भूषवले आहे. आजरोजी ते सध्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे. त्यांची तिन्ही नातवंडही उच्चशिक्षित असून मोठा नातू संदीप भुतेकर हा तुरुंग उपअधीक्षक आहे. तर दुसरा नितिन जिल्हा परिषद शिक्षक आणि अजित हा नागपूर येथे इंजिनियर आहे. सांगायचे तात्पर्य म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे " शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी " असे त्यांचे कुटुंब घडले. या माऊलीने जवळपास तीन पिढ्या पाहिल्या असून त्या सर्व सुशिक्षित आणि सुसंस्कारित आहे.

     आई ही जन्म देणारी जननी, खाऊ पिऊ घालणारी आई आणि ती संस्कार करणारी पहिली शिक्षिका असते. हीच भूमिका गोदावरीबाईंनी उभ्या आयुष्यात वठवली आणि प्रामाणिकपणे निभावली. गोदावरीबाई देवभोळी नव्हती. कोणत्याही कर्मकांडावर तिचा विश्वास नव्हता, पण तिची डोळस अंधश्रद्धा तिला जगण्यासाठी बळ देत असे. तिच्या वागण्यात बोलण्यात उद्धटपणा नव्हता. ती नम्र आणि बाणेदार स्वभावाची होती. आता गोदावरीबाई केवळ आठवणीच्या रूपाने नात्यागोत्यात आणि घर परिवारात शिल्लक राहतील यात शंकाच नाही, एवढे त्यांचे काम उल्लेखनीय आहे.

   त्यांना शेवटपर्यंत बीपी किंवा शुगरचा त्रास नव्हता. त्यांची नजर सुद्धा चांगली होती. त्यांचे संपूर्ण कुटुंब आजही लोकांच्या सुखदुःखात हजर असतात. त्या चालता बोलता ८ सप्टेंबर २०२५ रोजी आपल्यातून निघून गेल्या. त्या निगर्वी, सहकार्यशील, संवेदनशील,समाजशील, प्रेमळ आणि सर्वांना घेऊन चालणाऱ्या एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या होत्या.

# प्रा दिगंबर माणिकराव कानडजे ( ८२७५२३१८७४)

     मधुकोष, सागवन-बुलढाणा.

Popular posts from this blog

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

प्रा.जगदेवराव बाहेकर: एक सर्वस्पर्शी बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व