गणेशराव जाधव : एक व्यवसायनिष्ठ बँक अधिकारी

        गणेशराव जाधव : एक व्यवसायनिष्ठ बँक अधिकारी 

         मराठवाडा म्हटला की मागासलेपण डोळ्यासमोर उभे राहते. परंतु गेल्या दहा वर्षांपासून मराठवाड्याचा विकास झपाट्याने होतो आहे. जालना जिल्ह्यातील वालसावंगी एक मोठं गाव. ते उद्योगधंद्यात आणि व्यापारासाठी नावाजलेले आहे. तेथील हरेएक माणसं कामावर प्रेम करतात. छोटा मोठा धंदा करण्यात त्यांना रूची आहे. लाचारी आणि उधारी त्यांना आवडत नाही. श्रमप्रतिष्ठेला ते विशेष महत्त्व देतात. उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरते,अशी त्यांची श्रद्धा आहे. कष्टाने मोठं होण्यात त्यांना समाधान वाटते. वालसावंगीकरांपासून खूप काही शिकण्यासारखे आहे. 

      वालसावंगीच्या कुशीत जन्मलेले गणेश बाबुराव जाधव सध्या पिंपळगाव रेणुकाई येथे जालना जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत शाखा व्यवस्थापक आहे. ९ सप्टेंबर १९६८ रोजी गणेश बाबुराव जाधव हे एका गरीब कुटुंबात जन्माला आले.

आई साखराबाई आणि वडिल बाबुराव , तीन भाऊ आणि एक बहिण असा त्यांचा कुटुंब विस्तार. आई वडील अडाणी, सहा जणांचे कुटुंब आणि जमीन केवळ चार एकर. घर प्रपंच कसा चालवायचा हाच त्यांच्या समोर मोठा प्रश्न होता. सर्वांनी शेती आणि शेतमजूरी करून घरखर्च भागवावा असे त्यांच्या वडिलांनी सांगितले. तसे पाहिले तर ते कोळी समाजाचे कुटुंब. कोळी समाज अनुसूचित जमाती मध्ये गणला जातो. खाण्या पिण्याची अडचण असल्यामुळे रात्रीबेरात्री नदीत जावून खेकडे ,मासे धरणे हे जिकिरीचे काम ते करीत असत. शाळेबद्दल कोणी मार्गदर्शन करत नव्हते. शाळेत जाणे गणेशला जिवावर येत होते. तसा त्यांना शाळेच्या कामापेक्षा बाहेरची कामे करण्यात जास्त रस होता. त्यांच्या वडिलांना वाटत होते की आपण गरिबीत आणि काट्याकुट्यात दिवस काढून कसेबसे पोट भरले. भविष्यात आपल्याला पोऱ्यांच्या वाट्याला कष्टांचे दिवस येऊ नये म्हणून त्यांनी पोरांना शिक्षण घेण्यासाठी दटावले. 'वडिलांच्या धाकामुळे मी थोडेफार शिकलो', असे गणेशराव सांगतात. गणेशचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद मराठी शाळेत झाले. त्या काळी शाळेतील शिक्षक अभ्यास केला नाही की जबर मार द्यायचे. त्यांना पीटीआय शिक्षक म्हणून कुलमखेडचे मंगलसिंग मोरे होते. ते फार शिस्तप्रिय आणि चुकीबद्दल कठोर शिक्षा करणारे होते.

        जिल्हा परिषद प्रशाला, वालसावंगी येथे गणेशराव जाधव पहिल्या प्रयत्नात दहावी नापास झाले. तेव्हा ते अपयशाने खचून गेले नाही. तर उलट म्हणाले की अपयश ही पुढील यशाची पहिली पायरी असते. म्हणून ते पुन्हा चांगले अभ्यासाला लागले आणि १९८६ मध्ये दहावी परीक्षा पास झाले. कठोर परिश्रमाने दहावी झाल्याचा आनंद त्यांचेसाठी आणि आईवडिलांसाठी खास काही होता. पुढे गणेशनी शिकावं अशी त्यांच्या आई-वडिलांची तीव्र इच्छा होती. वडिलांच्या इच्छे खातर त्यांनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबादला) अकरावी प्रवेश घेतला. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे चारजणां मिळून त्यांनी एक कुडाची खोली घेतली. त्यात त्यांनी काटकसरीने शिक्षण घेतले आणि ११ वी पूर्ण केली. पुढे खर्चाअभावी त्यांना छत्रपती संभाजीनगर सोडावे लागले. त्यांच्या वडिलांना शाळा सोडल्याबद्दल फार वाईट वाटले. ' आता मला पुढे शिकायचं नाही ' असे गणेशरावनी वडिलांना सांगून टाकले. वडिलांना राहवलं नाही. त्यात त्यांनी मात्र मार्ग काढला आणि गणेशला बारावी शिक्षणासाठी नांदेडला पाहुण्यांकडे पाठविले. मात्र तेथे काही गणेशरावांचे मन लागले नाही. शेवटी कोणालाही न सांगता शिक्षण सोडून ते घरी परतले. त्यांनी १९८८ मध्ये शिक्षणाला कायमचा रामराम ठोकला.

      त्यांच्या वडिलांना गणेशने शिक्षण सोडल्याबद्दल अतिशय राग आला. ते बैचेन झाले. आपल्या मुलांना एस.टी.चे आरक्षण आहे, कोळी समाजातील अनेक शिकले सवरले कुटुंब आजरोजी शिक्षणाचा आणि नोकरीचा लाभ घेत आहेत अन् आपलं पोरगं शिक्षण सोडून घरी आलं याचं शल्य त्यांना बोचत होतं. रागाच्या भरात त्यांनी नाही नाही ती कामे गणेशला सांगितली. शेतात कष्टांची कामे करणे, भाजीपाला पिकविणे आणि बाजारात जावून भाजीपाला विकणे ही जबाबदारी गणेशवर येऊन पडली होती. त्यांनी सुध्दा ती निमुटपणे सहन केली.

      जवळपास १९८८ ते १९९३ पर्यंत बुलढाणा, अजिंठा, पिंपळगाव रेणुकाई, सिल्लोड असा बाजारहाट त्यांनी केला. दोन पैसे कमवून त्यांनी प्रपंचाला हातभार लावला. एक दिवस बाजारहाट करत असताना जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिकांच्या जागा दहावीवर भरणे आहे असे यांना कळले. एसटी आरक्षणावर कमी गुणात बँकेत जमू शकते अशी माहिती त्यांना मिळाली. तेव्हा त्यांनी रितसर अर्ज करुन बँकेची स्पर्धा परीक्षा दिली आणि ते परीक्षेत पास देखील झाले. त्यांना २७ जूलै १९९३ रोजी बँकेत लिपिक पदावर नियुक्ती मिळाली. नोकरी मिळाल्याचा आनंद कुटुंबात एवढा झाला की तो शब्दांत सांगणे कठीण होते. नेरशेवली, हसनाबाद ,धावडा,माहोरा,पारध, पिंपळगाव रेणुकाई अशा गावी त्यांना नोकरीनिमित्त राहावे लागले. 

     त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून त्यांना बँक इन्स्पेक्टर आणि पुढे बँक मॅनेजर म्हणून बढती मिळाली. यांनी गरिबी जवळून पाहिली होती. शेतकरी शेतमजूर हेच आपले दैवत आहे,यांची आपण चांगली सेवा केली तर आपल्या पदरी पुण्य पडेल,असा त्यांचा ठाम विश्वास होता. सर्व ग्राहकांना सर्व प्रकारची मदत करणे हा गणेशरावांचा मूळ स्वभाव आहे. 

अनेक अधिकारी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करायचे असेल तर वेळकाढूपणा करतात. आज होणारे काम काहीही त्रुटी काढून लांबणीवर टाकतात, असाही अनुभव आहे. अर्थात काही चांगली माणसं देखील असतात. गणेशराव जाधव चांगल्या अधिकाऱ्यांना पैकी एक आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांनी असंख्य माणसे जोडली आहेत. त्याचबरोबर ही जोडलेली माणसे आपल्या उत्कृष्ट संभाषणामुळे त्यांनी टिकवून सुद्धा ठेवली आहे.

       आपले आईवडिल निरक्षर होते.पुढे आपण आर्थिक परिस्थितीमुळे कमी शिकलो.आता मात्र आपण नोकरीवर असल्यामुळे मुलांना चांगले शिकवू शकतो हा विचार त्यांनी मनी बाळगला आणि स्वतः च्या मुलामुलींना उच्चशिक्षित आणि सुसंस्कारित केले. त्यांना दोन अपत्ये असून मुलगा जीवन बी. ई.(मेकॅनिकल) तर मुलगी पुनम बी.ई.( काम्प्युटर सायन्स ) आहे. तसेच त्यांचा मुलगा जिद्दी, मेहनती आणि अभ्यासू आहे. मिळेल ती नोकरी पदरात पाडून घेणे हा त्याचा स्वभाव आहे. तो स्पर्धा परीक्षेमार्फत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आणि पोलीस विभाग या तिन्ही ठिकाणी तो आरोग्यसेवक व कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्र ठरला आहे. सध्या त्याने बुलढाणा पोलीस मुख्यालयात नोकरी स्वीकारली आहे. तो पुढे स्वस्थ बसणारा नाही. भविष्यात तो नोकरी करून एमपीएससी च्या परीक्षा देऊन अधिकारी होईल यात शंका नाही.

      नोकरी करत असताना ते बँकेत कधीही उशिरा जात नाही. सकाळी ते ९ ला घर सोडतात आणि रात्री उशिरा परतात.त्यांना काम करण्याचा आळस नाही. ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग आणि सैनिक यांना मात्र ते तत्पर सेवा देतात. त्यांचा आदर करतात. त्यांच्याबाबतीत ते फार संवेदनशील आहे. त्यांनी निरक्षर आणि अल्प शिक्षित ग्राहकांची विनामोबदला अनेक खाते लिंक करून दिली. ' बँकग्राहक सेवा हिच आमची ईश्वरसेवा' समजून ते प्रत्येकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करतात.' 

# प्रा डी एम कानडजे, मधुकोष निवास,

        सागवन-बुलडाणा.(भ्रमणध्वनी ८२७५२३१८७४)

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत