सावित्रीची लेक - प्रतिभा कुंडलिक दळवी

      सावित्रीची लेक - आदर्श शिक्षिका : प्रतिभा कुंडलिक दळवी ------------------------------------------------------------------------------

       बुलढाणा जिल्ह्यातील म्हसला बु. येथील मूळ रहिवाशी असलेले आणि नोकरीनिमित्त चिखली येथे स्थायिक झालेले पुंडलिक गणपत दळवी यांची प्रतिभा ही धर्मपत्नी. कुलमखेड येथील पुंडलिक सांडूजी कानडजे यांची प्रतिभा ही सुकन्या. तीन भाऊ आणि एक बहीण अशा या कुटुंबात प्रतिभा ही लाडात वाढली. ती एकटीच असल्यामुळे तिचे कुटुंबात चांगले कौतुक झाले. ती लहानपणी चुणचुणीत आणि तल्लक बुद्धिमत्तेची होती. तिचे वडील शिक्षक असल्यामुळे आणि आई उत्तम गृहिणी आणि शिकलेली असल्यामुळे तिच्याकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. साहजिकच तिला शिक्षणाविषयी लळा लागला. तिचा जन्म १५ जुलै १९६७ चा असून आजरोजी ती सेवानिवृत्त शिक्षिका असून उत्तम गृहिणी आहे.

      त्याकाळी बालवाडी अंगणवाडी ह्या भानगडी नव्हत्या.वय वर्षे सात झाले की पहिल्या वर्गात प्रवेश मिळत असे. वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असल्यामुळे तिचे शिक्षण एका ठिकाणी कधीच झाले नाही. सर्वप्रथम संभाजीनगर मध्ये तिला पहिल्या वर्गात प्रवेश मिळाला. वडिलांची बदली झाल्यामुळे तिच्या शिक्षणाची फार परवड होत होती. थोडीफार शाळेत ओळख झाली रे झाली की लगेच तिची शाळा वडिलांच्या बदलीमुळे बदलल्या जात होती. तेव्हा भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव येथे प्रतिभाचे दुसरी ते सातवी पर्यंत शिक्षण झाले. ती शांत,आईला कामात मदत करणारी आणि अभ्यासू होती. तेव्हा रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करावा लागत असे. अशा परिस्थितीत ती चार - चार तास दिव्या भोवती खाली मान घालून लिहत बसायची आणि कधी कधी वाचता वाचता झोपी जायची. पाठांतर करणे हाच तिचा आवडीचा छंद होता. आपले पाठ झाले किंवा नाही हे तपासण्यासाठी ती कोपऱ्यात जाऊन एकांतात तोंडपाठ म्हणून पाहायची आणि जे आठवले नाही ते पुन्हा वहित पाहून वाचून पुन्हा पाठ करायची. त्यामुळे अभ्यास चांगला लक्षात राहत असे. अशा अभ्यासुवृत्तीमुळे तिचे शाळेत कौतुक होत होते. 

शिक्षणाची प्रचंड आवड आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द या जोरावर तिने पुढे खूप शिकायचे असे मनात ठरविले होते.

       पुनश्च वडिलांची जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथील जिल्हा परिषद शाळेत बदली झाली आणि तिची शाळा आपोआप बदलल्या गेली‌.. तिने अभ्यासासाठी खूप मेहनत घेतली. शेवटी तिने दहावीची परीक्षा माहोरा येथे १९८२ मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. तेव्हा मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण नगण्य होते. मुलींना शाळेत पाठविणे अनेकांना ते कठीण वाटायचे. लेकीबाळींनी घराचा उंबरठा ओलांडून नये अशी ग्रामीण भागात एक समज होता. आपलं घर भलं अन् काम भलं अशी समजूत खेड्यात झाली होती. तरीही अशाही वातावरणात प्रतिभाने त्यावर मात करून सावित्रीची लेक म्हणून स्वतः ला सिध्द केले. दहावीची परीक्षा देऊन ग्रामीण भागात नावलौकिक मिळविला.

        पूर्वी ग्रामीण भागात लवकर लग्न करण्याची प्रथा होती. तिचे वडील पुंडलिक कानडजे माहोरा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. त्यांनी अनेकांच्या आग्रहाखातर प्रतिभाचे लग्न करायचे ठरविले. प्रतिभाच्या आईवडिलांनी तिच्याजवळ हळूच लग्नाचा विषय काढला. प्रतिभा गोंधळून गेली. काय बोलावे हे तिला सुचत नव्हते. आईवडिल सुशिक्षित आणि शिक्षक असल्या कारणाने ती लग्न करण्यास निमुटपणे तयार झाली. पण आतून तिचे मन काही तरी कुजबुजत होते. पुढे खूप काही शिकून मोठं व्हावं, नोकरीला लागावं असे तिच्या मनात विचार येत होते. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली.म्हणून मी आजरोजी चांगल्या गुणांनी दहावी झाले, सावित्रीबाई शिक्षिका बनल्या, त्यांच्या सारखं आपल्याला शिक्षिका होता येणार नाही कां?असा विचार प्रतिभाच्या डोक्यात चमकून गेला. लग्न झाले की आपल्या सर्व इच्छांवर पाणी फिरणार या विचाराने तिचे मन ग्रासले होते.

           प्रतिभाच्या काही अटी मान्य करून तिचे वडील पुंडलिक सांडूजी कानडजे सर वरसंशोधनाच्या कामाला लागले. प्रतिभाचे वडील रविवारी शक्यतोवर कुलमखेडला यायचे. माझी व त्यांची अधूनमधून भेटी व्हायच्या. मी श्री शिवाजी हायस्कूल चांडोळ येथे गणित शिक्षक रुजू झालो होतो. मला त्यांचा स्वभाव खूप आवडत होता. मी प्रतिभाच्या लग्नाची हळूच गोष्ट काढली. त्यांना मी सहज सांगितले की माझा मित्र कुंडलिक गणपत दळवी हा म्हसला बु. येथील असून तो माझा वर्गमित्र आहे. तो क्लार्क म्हणून चिखली येथील श्री शिवाजी डीएड काॅलेजवर नोकरीला आहे. तो सध्या शेतजमिनीने जरी कमी असला तरी मेहनती, काटकसरी आणि हुशार आहे. स्वभावाने मनमिळावू आणि निर्व्यसनी आहे. असा नवरदेव प्रतिभासाठी चालेल का? बघा , विचार करा आणि विशेष म्हणजे तो डीएड वर असल्यामुळे प्रतिभा ला शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य देईल. त्यांनी होकार दिला. प्रतिभाचे लग्न १९८३ मध्ये अवघ्या सोळाव्या वर्षी थाटामाटात पार पडले.

        प्रतिभाला लग्न झाल्या झाल्या दहावीच्या पात्रतेवर डीएड ला प्रवेश मिळाला. मनात ठरल्याप्रमाणे तिला शिक्षक प्रशिक्षण करण्यासाठी संधी मिळाली. तिला खूप आनंद झाला. प्रतिभाने घरप्रपंच सांभाळून नियमित काॅलेज केले. नियोजन करून खूप अभ्यास केला. शिकण्याची जिद्द, चिकाटी आणि अभ्यासूवृत्ती या त्रिसूत्रींच्या जोरावर प्रतिभाने १९८५ मध्ये श्री शिवाजी डीएड कॉलेज चिखली येथे डिएड पदविका परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. तिला, कुटुंबाला आणि तिच्या आईवडिलांना जो काही आनंद झाला होता तो अवर्णनीय होता.

        चिखली येथील श्री शिवाजी अभ्यास शाळेत प्रतिभाला सावित्रीबाई फुलेंचे स्वप्न साकार करण्यासाठी १३ सप्टेंबर १९८५ रोजी सहायक शिक्षिका म्हणून नियुक्ती मिळाली. मनोमन तिला खूप आनंद झाला. पुढे प्रतिभा थांबली नाही. घरप्रपंच, नोकरी मुलाबाळांचे संगोपन आणि येणारे जाणारे पाहुण्यांचे आदरतिथ्य सांभाळून तिने बहि:शाल विद्यार्थी म्हणून बारावी व अमरावती विद्यापीठाचे बी.ए. आणि मराठीत एम.ए. केले. एवढ्यावर ती थांबली नाही तर दर वर्षी परीक्षा देत राहिली. सावित्रीबाईचे विचार तिला स्वस्थ बसू देईना. शिक.अजून शिक आणि मुलींना शिकव. नोकरी करुन तिने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत अवकाशकालीन डी.एड. आणि एम.एड. केले. 

      या शिक्षणाचा फायदा केवळ तिलाच मिळाला नाही तर तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे,ते सर्व पदवीधर असून सुसंस्कारित आहे. प्रतिभाचे पती ते देखील एम.ए.एम.एड.असून सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. दोन्ही जावई आजरोजी एम.ए. / एम.एस्सी असून कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक आहेत. महिलांनी नोकरी लागली की थांबायला नको. घरप्रपंच सांभाळून अखंडपणे शिक्षण चालू ठेवावे असे विचार त्यांनी मजजवळ व्यक्त केले.मानले बुवा या सावित्रीच्या लेकीला!

# प्रा दिगंबर कानडजे, मधुकोष, 

     सागवन-बुलडाणा (८२७५२३१८७४)

 



      


Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत