डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम - एक सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम - एक सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व
--------------------------------------------------------------------------
नुकतीच डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती एक "वाचन प्रेरणा दिन" म्हणून भारतभर साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा अल्पसा परिचय करून देण्याचा मी इवलासा प्रयत्न करतो आहे.
तामिळनाडू राज्यात रामेश्वरम येथे डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम असे होते. ते आजन्म ब्रह्मचारी होते. ते एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ आणि आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती होते. त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन फार मोठे नाव कमविले. त्यांची घरची परिस्थिती हलकीची असल्यामुळे त्यांनी माध्यमिक शिक्षण रामनाथपुरम येथे सरकारी शाळेत पूर्ण केले. त्यांनी अक्षरशः गावात वर्तमानपत्रे विकून शिक्षणासाठी पैसा उभा केला,पण आईवडिलांना तसेच इतरांनाही त्रास दिला नाही. जिद्द, चिकाटी, तल्लख बुद्धी, अभ्यासूवृत्ती आणि शिकण्याची विशेष आवड वैशिष्ट्यांवर त्यांनी तिरुचिरापल्ली येथे विज्ञान शाखेची पदवी संपादन केली. पुढेही त्यांनी शिक्षण थांबविले नाही. शिकतच रहावे असे त्यांना सतत वाटे. त्यांनी मद्रास येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये बी.एस्सी ( गणित ) ही पदवी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण केली. तसेच त्यांनी एरोनॉटिक्स चा डिप्लोमा देखील प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण केला.
तसेच अमेरिकेत जाऊन त्यांनी " नासा " या संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. आपल्या ज्ञानाचा उपयोग माझ्या भारत देशाला व्हावा म्हणून ते लगेच भारतात परतले. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम उच्चविद्याविभूषित असल्यामुळे त्यांना सन १९५८ मध्ये '' संरक्षण ,संशोधन व विकास संघटन '' ( डीआरडीओ) या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या चांगल्या कार्याची पावती म्हणून पुढे १९६३ मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो ) शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती मिळाली. या संस्थेत त्यांनी खूप मेहनत घेतली. पुढे त्यांनी 'अग्नी ' या क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी पूर्ण करुन दाखविली. यावेळी त्यांना झालेला आनंद अतिशय अवर्णनीय होता. तेव्हापासून त्यांना ' मिसाईल मॅन ' म्हणून ओळखू लागले. भविष्यात त्यांना आपल्या कुशल कामगिरीमुळे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती मिळाली. तेथे त्यांना आपल्या मनाप्रमाणे काम करण्याची उत्तम संधी मिळाली. डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सन २००२ मध्ये भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना वाचन , लेखन , चिंतन आणि संशोधन या विषयात विशेष रस होता. त्यांच्या व्यस्त जीवनातून ते वेळ काढून वाचन करित असत. वाचन करत करत त्यांनी लेखणी हातात धरली आणि एक चांगले साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळविला. त्यांनी जवळपास 25 पुस्तके प्रकाशित केली. त्यापैकी अग्निपंख (विंग्स ऑफ फायर ), प्रज्वलित मने (इग्नाटेड माइंड्स) आणि टर्निंग पॉईंट्स ही त्यांची विशेष महत्त्वाची पुस्तके असून वाचक रसिकांच्या संग्रही ठेवण्यासारखी आहे.' प्रज्वलित मने ' हा एक सुंदर ग्रंथ असून तो देशाला पुढे नेण्यासाठी, एका गौरवशाली भविष्याकडे नेण्यासाठी आणि एक दूरदृष्टी योजना राबविण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. 'आत्मविश्वास' या विषयी ते म्हणतात, 'आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम हे अपयश नावाच्या आजाराला मारण्यासाठी सर्वोत्तम औषध आहे. ते तुम्हाला एक यशस्वी व्यक्ती बनवेल यात शंका नाही.'
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची गुणग्राहता, वैज्ञानिक दृष्टीकोन, संवेदनशील वृत्ती आणि कुशाग्र बुद्धिमत्ता वाखाणण्याजोगी आहे. मिसाईल मॅन,एक महान शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती, साहित्यिक आणि साधा,सरळ,प्रांजळ,प्रेमळ असा माणूसकिचा गौरीशंकर माणूस विचारात घेऊन डाॅक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना भारत सरकारकडून पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण (१९९०) आणि भारतरत्न (१९९७) ह्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. खरोखर ते एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून आपल्या सर्वांसाठी भूषणावह आहे.
संपूर्ण गाव साक्षर व्हावं आणि मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मानवी जीवनात वाचनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. वाचन करून आपलं जीवन समृद्ध करता यावं म्हणून 'गाव तेथे वाचनालय' असणे ही सुद्धा काळाची गरज आहे .जवळपास नव्वद टक्के गावांमध्ये आजरोजी वाचनालय कार्यरत असून गावांसाठी शासन ही वाचन चळवळ राबवित आहेत. "वाचाल तरच वाचाल" या म्हणीचा अर्थ ग्रामीण भागातील जनतेला समजावून सांगण्याची वेळ वाचनालयावर येऊन पडली आहे. तेव्हा शासनमान्य वाचनालयाने विशेष काळजी घेऊन आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आठवण ठेवून घरोघरी आबालवृद्धांना वाचनाची गोडी लागावी असे मला वाटते .
२७ जुलै २०१५ रोजी माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे दुःखद निधन झाले. निधन होण्यापूर्वी त्यांचे मित्रासोबत शेवटचे बोल होते की, 'मित्रा, श्रीजन पाल सिंग, तू मजेदार माणूस आहेस ! तू ठीक आहे ना?' यांचा अर्थ असा होतो की ते मृत्यूशय्येवर असताना देखील सहाय्यक मित्राची विचारपूस करित होते. माणसाने माणसाकडे माणूस म्हणून पहावे असा त्यांचा दृष्टीकोन होता. ते सर्वांचा मानसन्मान करित असत.
मृत्यूबद्दल ते सांगतात , ' मृत्यू म्हणजे काहीच नाही. पण पराभूत आणि अपमानास्पद जगणे म्हणजे दररोज मरणे होय.' वाचाल तरच वाचाल, हे घोषवाक्य त्यांचा जीव की प्राण होते. वाचनाने माणूस किती मोठा होतो, हे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना सर्वप्रथम कळले आणि म्हणूनच वाचनाचे महत्व सर्वांना कळावे, यासाठी त्यांनी स्वतःचा जन्मदिन हा ' वाचन प्रेरणा दिन ' म्हणून साजरा करावा असे शासनाला आवाहन केले. तेव्हापासून १५ ऑक्टोबर हा दिवस भारतभर ' वाचन प्रेरणा दिन ' म्हणून साजरा केला जातो. हा कार्यक्रम नुकताच भारतभर साजरा झाला. त्यानिमित्ताने डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन!
# प्रा.दिगंबर कानडजे, मधुकोष ,
सागवन बुलडाणा (८२७५२३१८७४)