नथ्थूसेठ मोहनसिंग चांदा : एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

        नथ्थूसेठ मोहनसिंग चांदा : एक अष्टपैलू व्यक्तिमत्व 

---------------------------------------------------------------------------

        बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ हे गाव फार मोठ्या वस्तीचे आहे. चांडोळ या गावी परदेशी राजपूत समाज मोठ्या संख्येने राहतो. येथे परदेशी राजपूत , मराठा, मुस्लिम, देशमुख आणि इतर सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदतात. एकमेकांच्या सुख दुःखात अग्रक्रमाने सहभागी होतात.येथे शैक्षणिक, वैद्यकीय आणि शेतकरी वर्गाच्या सोयींसाठी उत्तम अशा सोयीसुविधा उपलब्ध असून हे एक व्यापारी गाव आहे. चांडोळ येथील शाळेत अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडविण्याचे काम जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा आणि श्री शिवाजी हायस्कूलने केले आहे. आज रोजी शेकडो विद्यार्थी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस अधिकारी, वकील आणि एमपीएससी मार्फत शासकीय अधिकारी बनले आहेत. या मागील जे प्रेरणास्रोत होते ते म्हणजे चांडोळ येथील कै.नथ्थूसेठ चांदा. आज त्यांना जावून उनेपुरे पंचाऐंशी वर्षे झाली असली तरी त्यांच्या कार्याच्या रुपाने ते सर्वांच्या मनात घर करुन राहिले आहेत. 

     चांडोळ गावातील नथ्थूसेठ मोहनसिंग चांदा एक गर्भश्रीमंत सधन व्यक्ती. त्यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी 30 एप्रिल 1930 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोहनसिंग चांदा तर आईचे नाव ताराबाई. हे एक फार मोठे कुटुंब म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते आणि ते तसेच आहे. नथ्थूसेठ चांदा यांना मोतीलाल चांदा एक भाऊ आणि दोन बहिणी. स्वातंत्र्योपूर्वीचा काळ असल्यामुळे शिक्षणाच्या विशेष सोयी सवलती नव्हत्या. तरीही अशा परिस्थितीत त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढील शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा असून देखील त्यांना गावकुसाबाहेर जाणे शक्य झाले नाही. कुटुंबात ते मोठे असल्यामुळे साहजिकच त्यांचा लाड झाला. त्यांनी वडिलांना शेती करण्यासाठी मदत केली. यातून त्यांना शेतीविषयी माहिती मिळत गेली.  

       ते बुद्धीने कुशाग्र आणि चतुर होते. त्यांना माणसे जोडण्याची कला अवगत होती. त्यांनी अनेक माणसांना माणूसकीचे धडे दिले. माणसाने माणसाकडे माणूस म्हणून पाहिले पाहिजेत हे तत्वज्ञान यांनी समाजासमोर मांडले. अवघ्या पंधराव्या सोळाव्या वर्षी ते गावातील भक्कंड कुटुंबातील रुखमण यांच्याशी 1946 मध्ये विवाहबद्ध झाले. भारत देश स्वतंत्र झाला. गावोगावी ग्रामपंचायत कायदा अस्तित्वात आला. चांडोळ हे गाव मोठे असल्यामुळे तेथे ग्रामपंचायत स्थापन झाली. आता ते खऱ्या अर्थाने सार्वजनिक जीवनात उतरले. गावातील अनेक समस्या सोडविण्यात आणि लोकांच्या सुख दुःखात सहभागी होण्यात रस घेऊ लागले. त्यांनी समाजकारणात आणि राजकारणात हिरिरीने भाग घेतला. नथ्थूसेठ मोहनसिंग चांदा हे एक दिलदार, समजुतदार आणि समाजशील व्यक्तिमत्त्व होते म्हणून 1960 मध्ये ते ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून निवडून आले. त्यांच्या चांगल्या कार्याची पावती म्हणून त्यांना सलग 15 वर्षे सरपंच पदावर काम करता आले. या काळात त्यांना अनेक ग्रामविकासाची कामे करता आली. 

       आपल्याला चांगले शिक्षण घेता आले नाही त्याची खंत त्यांना होती. गोरगरिबांच्या आणि मागासवर्गीयांच्या मुला-मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी गावांमध्येच जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळेची स्थापना केली. तसेच भविष्याचा वेध घेऊन या शाळेसाठी त्यांनी ई क्लास दहा एकर जमीन शाळेसाठी मिळवून दिली. त्यांचे विशेष नोंद घेण्यासारखेह हे काम होते. जसा त्यांचा समाजाविषयी कळवळा होता तसाच त्यांचा शेतकऱ्यां विषयी देखील कळवळा होता. शेती आणि शेतकरी यांच्या समस्या ते जाणून होते. शेतात पेरले नाही तर उगवणार कोठून, त्याची त्यांना जाणीव झाली. शेतकऱ्यांना बी बियाणे खते घेण्यासाठी आर्थिक तरतूद व्हावी म्हणून " शेतकरी सहकारी पतसंस्था " स्थापन केली. 

         गावामध्ये प्राथमिक शिक्षणाची तर सोय झाली, परंतु उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय कशी करता येईल? यावर ते सातत्याने विचार करीत असत. बुलढाण्यातील ॲड.रामसिंग देवसिंग भोंडे (भोंडे सरकार), चिखली येथील पंढरीनाथ पाटील आणि ॲड. ज्योतीराव रामभाऊ राऊत हे शिक्षण प्रसाराचे आणि गावोगावी शाळा स्थापनेचे काम करतात हे त्यांना कळले होते. तसेच शिक्षण संस्था काढण्यात पुढाकार घेतात याची माहिती त्यांना मिळाली होती. तेव्हा या सर्वांच्या सहकार्याने चांडोळ येथे त्यांनी श्री शिवाजी हायस्कूलची स्थापना 1 जूलै 1971 रोजी करून घेतली. तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांचा 15 सप्टेंबर 1971रोजी मासरूळ येथे विशेष कार्यक्रम होता. या कार्यक्रमात कै. नथ्थूसेठ चांदांनी कार्यक्रम स्थळी जाऊन श्री शिवाजी हायस्कूल चांडोळ ची अधिकृत मान्यता मिळवून घेतली. हे सुद्धा त्यांचे शिक्षणासाठी विशेष योगदान आहे.

    शाळेची तर स्थापना झाली खरी, पण शाळा भरवायची कोठे ? हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा अशा प्रसंगी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी स्वतःचे घर आणि घरावरील माडी वर्गखोल्यासाठी आणि स्वतः ची बैठक ऑफीस साठी उपलब्ध करून दिली. ही त्यांची सामाजिक बांधिलकी लक्षात घेण्यासारखी होती. शिक्षणासाठी त्यांच्या मनात केवळ कळवळा नव्हता तर खरी तळमळ होती आणि ती त्यांनी कृतीत आणून दाखविली. खरोखर ते कृतिशील समाजसुधारक होते असे म्हटले तर वावगे ठरू नये असे मला वाटते. या कामाचा कोणताही मोबदला न घेता आपलं हे एक सामाजिक दायित्व आहे असे समजून त्यांनी काम केलं.

       या सर्व गोष्टी करत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष केले नाही. त्यांचा थोरला मुलगा अकोला कृषी विद्यापीठात प्राध्यापक आणि धाकटा मुलगा पीएसआय झाला. तर त्यांचा मधला मुलगा उत्तम शेती करतो आहे.  

 तसेच त्यांना दोन मुली असून त्या सुद्धा सधन कुटुंबामध्ये सुखी समाधानी आहे‌. मित्रमंडळी सोबत ते नेहमी शिवारफेरी करायचे. ते सकाळ संध्याकाळ मित्रांना घेऊन फिरायचे. ते सामान्य माणसाच्या गरजा ओळखून होते. तोरणदारी आणि मरणदारी ते आवर्जून उपस्थित राहायचे. एकंदरीत त्यांचा स्वभाव मनमिळाऊ, प्रेमळ, सहकार्यवृतीचा, परोपकारी आणि समाजशील होता म्हणून त्यांना अख्ख्या पंचक्रोशीत आदराने " चांदा सेठ" म्हणून ओळखू लागले. नथ्थूसेठ चांदा यांचा शाळेमुळे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीशी संबंध आला. त्यांनी गोरगरिबांच्या मुलांना या शिक्षण संस्थेत नोकऱ्या मिळवून दिल्या. शेषराव सोनुने, खैरे मॅडम, ताजी, राजू नामदेव देवकर अशा अनेकांना नोकरी मिळवून देण्यासाठी स्वतः ची प्रतिष्ठा पणाला लावली.

       सामाजिक जीवनात कार्य करत असताना नथ्थूसेठ चांदा यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना जवळ धरले. सोनाजी माळी मामा , अजगर खॉ पठाण, दौलत खाॅ पठाण, मुसा शेठ व्यापारी, हरचंद बारवाल, रामधन घुनावत, धन्नु टेलर ,लक्ष्मण खैरे आणि मुख्याध्यापक जे के हिंगे अशी अनेक त्यांची जीवाभावाची माणसं होती. फिरायला, जेवायला, राजकारणात आणि समाजकारणात ही मंडळी सदैव त्यांच्या सोबत सावलीसारखी असायची. ते संयमी, निगर्वी, शांत आणि परोपकारी वृत्तीचे एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.

# प्रा दिगंबर कानडजे (८२७५२३१८७४)

मधुकोष, सागवन-बुलडाणा 


         


   

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत