ज्ञानेश्वर दत्तात्रय सावंत : समाजशील व्यक्तिमत्त्व

 ज्ञानेश्वर दत्तात्रय सावंत : एक संवेदनशील,समाजशील व्यक्तिमत्व 

      बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील उकळी सुकळी हे एक रिसोड रस्त्यावरील गाव. दत्तात्रय आयाजी सावंत (पाटील) आणि आई सखुबाई यांच्या पोटी १८ जानेवारी १९४८ रोजी एक रत्न जन्माला आले आणि ते म्हणजे ज्ञानेश्वर दत्तात्रय सावंत. या कुटुंबाची सुरुवातीची आर्थिक परिस्थिती चांगली होती. चार भाऊ, चार बहिणी आणि तीन काका एवढा मोठा त्यांचा एकत्रित मोठा कुटुंबाचा विस्तार. खूप खर्च आणि नियोजनाचा अभाव यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती काही काळाने खालावली. पुढे काही दिवसांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर या कुटुंबाला चांगले सुखा समाधानाचे आले.

      ज्ञानेश्वर यांचे एकत्रित कुटुंबामध्ये सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळेत गावातच झाले. शिकण्याची विशेष आवड असल्यामुळे त्यांनी गावाबाहेर श्री शिवाजी हायस्कूल मेहकर येथे आठवीत प्रवेश घेतला. शाळेत जाण्या येण्याची व्यवस्था नसल्यामुळे आणि परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्यांना शाळेसाठी दररोज सहा किलोमीटर पायी चालत जावे लागले.

      शाळेत शिकत असताना त्यांचा एक मित्र पांडुरंग नवले हा अतिशय मजेशीर,गंमतीदार आणि कलाकार होता. अफलातून काही करण्यात त्यांना फार रस होता. गावात गणेश उत्सवाच्या दिवसात गुळाच्या मोठ्या कढईत त्यांच्या मित्राने व यांनी राम,लक्ष्मण व सीता यांचे हुबेहूब पुतळे तयार केले होते. शिवाय वीस एकर तलावात त्यांनी दिवे लावले होते. त्यांची ही सृजनशीलता व नवनिर्माणक्षमता खरोखर वाखण्याजोगे होती. या उपक्रमाने गावातील माणसांना खूप आनंद झाला होता.

 सन १९६४ मध्ये ते मेहकरला चांगले गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाले. एक बोर्डाची कठीण असलेली परीक्षा आपण पास झालो,याचा त्यांना मनस्वी आनंद झाला होता. ज्ञानेश्वर दत्तात्रय सावंत हे अभ्यासू आणि चिकित्सक वृत्तीचे विद्यार्थी होते. खूप शिकायचे. स्वतःच्या पायावर उभे राहून काही तरी आगळेवेगळे करून दाखवायचे,अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. शिक्षणाचे महत्त्व पटल्यामुळे त्यांनी उच्च शिक्षण घेण्याची तयारी दर्शविली. मेहकर येथील एम. ई. एस. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. जिद्द ,चिकाटी, परिश्रम आणि नियोजन यांच्या जोरावर ते १९६९ मध्ये बीए झाले. त्यांना शिक्षक होण्याची खूप इच्छा होती. म्हणून 

 त्यांनी शासकीय शिक्षण महाविद्यालय यवतमाळ येथून १९७१ मध्ये बीएड केले.

       बीए, बीएड असल्यामुळे ज्ञानेश्वर दत्तात्रय सावंत यांना त्याकाळी सहज नोकरी लागली. ते श्री शिवाजी हायस्कूल उदयनगर ( उंद्री ) येथे सहायक शिक्षक म्हणून १ जूलै १९६९ रोजी रुजू झाले. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपण खुप काही कमावले असे वाटणे त्यांना साहाजिकच होते. पन्नास साठ वर्षांपूर्वी मुलामुलींची लग्ने लवकर करण्याची प्रथा होती. आईवडिलांना मुली ओझे वाटायच्या. अशा परिस्थितीत ते कौशल्याबाई सोबत ७ जानेवारी १९६७ रोजी विवाहबद्ध झाले. कौशल्याबाई त्याकाळी जेमतेम सहावी पास होत्या. तो काळच असा होता की मुलींना शक्यतोवर शिकविल्या जात नव्हते. चूल आणि मूल सांभाळण्यासाठीच परमेश्वराने मुलींना जन्माला घातले आहे, अशी समाजाची धारणा होती. ज्ञानेश्वर दत्तात्रय सावंत यांनी श्री शिवाजी हायस्कूल उदयनगर, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय देऊळगाव माळी आणि दादासाहेब चौधरी विद्यालय सोनाटी येथे , शिक्षक म्हणून अशी एकूण ३७ वर्षे शिक्षकाची प्रामाणिकपणे नोकरी केली. त्यांनी उत्तमोत्तम विद्यार्थी घडविले. कधी कर्तव्यात कसूर केली नाही. विद्यार्थी हा केंदस्थानी मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहर्निश झटत राहिले.

       नोकरी करत असताना त्यांना आलेला जीवघेणा वाईट अनुभव त्यांनी सांगितला. एकदा शाळेत येत असताना मुलांनी झाडावर असलेल्या आग्या मोहोळाला दगड मारले. त्याचा परिणाम असा झाला की त्या मधमाश्या उठल्या आणि मुलांना चावल्या. घायाळ झालीत. सावंत सर मुलांच्या पाठीमागून शाळेत ड्युटीवर येत होते. ही गंभीर बाब त्यांच्या लगेच लक्षात आली. त्यांनी जिवाची पर्वा न करता मुलांना मातीवर खाली झोपविले. मुलांना हिंमत दिली. योगायोगाने पाठीमागून एसटी आली. मुलांना एसटी समोर उभे केले. एसटी थांबवण्याची विनंती केली. सर्व मुले एसटीत बसवून मेहकर येथील डॉक्टर चवरे यांच्या दवाखान्यात आणली.औषधोपचार केले.सर्व मुलांना बरे वाटल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधिन केले. बऱ्याच दिवसांनी सरांनी मुलांवर केलेला खर्च पालकांनी परत केला.' मुलांना सहकार्य करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असे समजून हे मी काम केले, या कामामुळे मला आत्मिक समाधान मिळाले' असे ते सांगतात.

     शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यात ते हिरिरीने भाग घेतात. शिक्षणाचे महत्त्व ते गोरगरिबांना आणि मासावर्गीय विद्यार्थ्यांना पटवून देतात. शैक्षणिक कार्याचा एक भाग म्हणून त्यांनी गावामध्ये २००६ मध्ये कॉन्व्हेंट ते बारावीपर्यंत शाळा सुरू केली. तसेच त्यांनी २०१० मध्ये हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे अमृतराव पाटील कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सुध्दा स्थापन केले आहे. सर या संस्थेच्या विकासाकडे जातीने लक्ष देतात. सामाजिक कार्य म्हणाल तर पूर्वी गावामध्ये पाणी भरण्यावरून जातीजातींमध्ये वाद होता. अस्पृश्यांसाठी पाणी भरण्यासाठी दुसरी व्यवस्था नव्हती. तेव्हा त्यांनी गावामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करून सर्वांसाठी पाणी भरण्यासाठी एकच विहीर (आड) मोकळी करून दिली. धार्मिक कार्यात ते भाग घेतात. गावातील मठाकडे सुध्दा लक्ष देतात.

    नोकरीत असताना त्यांच्या चांगल्या कार्याची पावती म्हणून लातूर येथे तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते त्यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच निवड श्रेणीसाठी तयार केलेल्या प्रबंधास देखील शासकीय महाविद्यालय बुलढाणा या संस्थेच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. शिवाय बुलढाणा जिल्ह्याच्या नाट्य गौरव परिषदेचा " जीवन गौरव पुरस्कार " २०१६ मध्ये त्यांना मिळाला होता. एकंदरीत शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात ते अग्रेसर असून साधे, सरळ , निगर्वी, समाजशील, संवेदनशील आणि परोपकारी असे व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना सुपरिचित आहे.

# प्रा. दिगंबर कानडजे, (८२७५२३१८७४)

    सागवन - बुलडाणा 

 


Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत