संघर्षमय जीवन जगणारे : तुळशीराम जगदेव तायडे

   

संघर्षमय जीवन जगणारे : तुळशीराम जगदेव तायडे

------------------------------------------------------------------

        तुळशीराम जगदेव तायडे बुलडाणा येथे राहत असून ते सध्या शह्यांशी वर्षाचे एक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचे आईवडील जगदेव आणि आई आपाबाई हे निरक्षर असून कोऱ्हाळा बाजार येथे राहत होते. तुळशीराम जगदेव तायडे यांचा जन्म १९३९ साली झाला. 'जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मी सात -आठ वर्षाचा होतो', असे ते सांगतात. आईवडील काय करत होते हे त्यांना सांगता येत नाही.त्यांना कळण्याआधीच ते देवाघरी निघून गेले. आईवडिलांचा सहवास त्यांना मिळाला नाही. मोलमजुरी हेच त्यांचे पोट भरण्याचे साधन होते. शिकण्याची इच्छा जरी झाली तरी शिकायला जायचं कोठे?, हा प्रश्न होता. त्याकाळी शिकण्याची सोय नव्हती. 

         शेवटी निराधार म्हणून हातेडी येथील मामांनी त्यांचा सांभाळ केला. मामा रावुबा जाधव यांचेकडे हातेडीला पंधरावीस एकर जमीन होती. शिवाय बैलं,बकऱ्या,गायी आणि काही कोंबड्या असं जित्राब होतं. हे जित्राब सांभाळण्यासाठी एक काळजीचा पोरगा पाहिजे होता म्हणून तुळशीराम भाच्याला मामांनी ठेवून घेतले. तुळशीराम मामाच्या घरी लहानपणापासूनच येजा करित असत. त्यांना ईमानदारीने काम करण्याची सवय होती. सकाळ संध्याकाळ तुळशीराम आपल्या घरी काम करतो आहे, हे पाहून त्यांना बरं वाटायचं आणि कीव पण यायची. आपला भाचा लय कामाचा आहे, तो रात्रीबेरात्री शेतामध्ये राखण करतो. शेतात कष्टांची कामे करतो. ढोरावासरांची काळजी घेतो. मांडवामध्ये असलेली चित्रा गाय स्वतः लक्ष घालून सांभाळतो, हे ते जाणून होते. म्हणून ते तुळशीराम भाच्याला चांगला जीव लावत असे. स्वतःच्या लेकराप्रमाणे कपडेलत्ते आणि खायाप्यायला देत असे. जत्रेचे दिवस आले की ते तुळशीरामला चारआठ आणे देऊन जत्रेला जाण्यासाठी मुभा देत होते.

         पुढे मामांनी तुळशीरामने केलेल्या अपार कष्टांची परतफेड म्हणून त्यांनी तळेगाव येथील काळुबा सपकाळ यांच्या शांता नावाच्या मुलीशी लग्न लावून दिले. तेव्हा ते अंदाजे २० वर्षांचे असावेत. मामांच्या कुटुंबात तुळशीरामनी खूप ईमानदारीने बरेच दिवस काम केले. परावलंबी जीवन जगण्यापेक्षा अलग राहून स्वतः काहीतरी करून दाखवावे असे त्यांना वाटले असावे. क्षणाचाही विलंब न लावता अंगावरच्या एका कपड्यानीशी ते मामाच्या घरातून बायकोला घेऊन बाहेर पडले. आता राहायचे कोठे ? हा प्रश्न त्यांना पडला होता. चुलत मामा श्रीपत यांच्या बैलांच्या गोठ्यात राहण्यासाठी काही दिवस जागा मिळाली. एका बाजूला बैलं राहायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी एक कुडाची खोली तयार करून त्यात संसार थाटला. ते जिद्दी, स्वाभिमानी, ईमानदार आणि मेहनती होते. स्वतः शेतमजूरीला जाऊन त्यांनी काटकसरीने आणि निगोतीने संसार केला. आजही ते तसेच आहे. आज बरेच वय झाले असले तरी घरी ते स्वस्थ बसत नाही. काहिनांकाही काम चालू ठेवतात.

       तुळशीराम जगदेव तायडे यांना दोन मुले आणि दोन मुली असे एकूण चार अपत्ये. उपचारा अभावी त्यातील एक मुलगा आणि एक मुलगी लहानपणीच दगावली. पुढे निर्मला आणि बाबुराव या दोन अपत्यांचा त्यांनी सांभाळ केला. ते स्वतः अर्धपोटी राहिले, पण या दोन लेकरांना कमी पडू दिले नाही. स्वतःचे घर नसल्यामुळे त्यांना सरकार कडून एक गुंठा प्लाॅट मिळाला. जागा मिळाल्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला होता. पुढं स्वतः च्या मालकीचे एखादं घर बांधू, असा विचार त्यांच्या मनात आला असावा. शिक्षण घेतलं की माणूस मोठा होतो, हे तुळशीराम बाबाला कळत होते. आपण जरी शिकू शकलो नाही तरी मुलाला शिकवावं आणि त्याला मोठं करावं हे स्वप्न त्यांनी पाहिले.    

त्यांनी कुटुंबासाठी खुप कष्ट सोसली. पोटभर खायला मिळालं नाही. ते कायम अर्धपोटी राहायचे. ज्यांच्याकडे कामाला जात होते त्यांची कामे वेळेवर झाली पाहिजे, त्यांचे नुकसान व्हायला नको. रोजंदारी मिळो वा न मिळो पूर्णपणे काम संपल्यानंतरच घरी यायचे. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. त्यांची काम करण्याची निष्ठा वाखाणण्याजोगी होती. आजचे मजूर आता पूर्वीसारखे ईमानदार राहिले नाही. ते ज्या ठिकाणी मोलमजुरी करायचे, त्यांची मुलं आजही सांगतात की, सर तुमचे बाबा आमच्याकडे कामाला यायचे ,तेव्हा त्यांनी कधीही मजुरीचे पैसे आम्ही स्वत: हून दिल्याशिवाय घेतले नाही. तसेच बरेचजण असेही सांगतात की त्यांच्याच कामाच्या मजुरीचे पैसे अजूनही आमच्याकडे निघू शकतात. कारण त्यांनी कधीही हिशेब केला नाही की वाद घातला नाही.. जे दिले ते घेतले. यातून मिळणाऱ्या मोलमजुरीवर मुलाला शिकविले आणि घरप्रपंच देखील केला.

          आज त्यांचा मुलगा बाबुराव शिकून शिक्षक म्हणून नोकरीला लागला. तो गेल्या २५ वर्षांपासून जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आहे. त्यांनी सुध्दा खूप खस्ता खाल्ल्या.शून्यातून व संघर्षातून त्यांनी चांगली प्रगती केली. आज त्यांचेजवळ १६ एकर बागाईत शेती असून त्यांनी सिंचनाची व्यवस्था केली आहे. त्यांचे बुलढाणा येथे चांगले घर आहे.                  

        तुळशीराम बाबांचा एक नातू एमबीबीएस असून तो वैद्यकीय अधिकारी म्हणून पुण्यात आहे. मोठी नात इंजिनिअर असून ती पुण्यात कंपनीमध्ये काम करते आहे आणि लहानी नात बीएस्सी (कृषी) पदवीधर असून उच्च शिक्षण घेण्याच्या तयारीत आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच की आजीआजोबा, आईवडील जरी शिकले सवरले नसले तरी ते खूप प्रामाणिक, ईमानदार आणि कष्टाळू होते. त्याचेच फळ म्हणून आजरोजी त्यांची पुढील पिढी उच्चशिक्षित आणि सुसंस्कारित निघाली आहे.

          ज्येष्ठ माणसं जरी निरक्षर असले तरी त्यांचे विचार हे अनुभव संपन्न होते. त्यांनी मला बोलताना सांगितले की सर, कुठलीही गोष्ट विचारल्याने नासत नाही,तर ती न विचारल्याने नासते. खरोखर किती अर्थपूर्ण विचार त्यांनी मांडला आहे हा ! हा सुंदर विचार मला बरेच काही शिकवून गेला. ते साधे, सरळ, कष्टाळू, प्रेमळ आणि परिस्थितीची जाणीव ठेवून आहे.

# प्रा दिगंबर कानडजे (8275231874)

मधुकोष, सागवन-बुलडाणा 

     





Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत