एक सर्जनशील साहित्यिक - किसन एकनाथ पिसे

 एक सर्जनशील साहित्यिक - किसन एकनाथ पिसे 

        किसन एकनाथ पिसे यांचा जन्म १९ ऑगस्ट १९६५ रोजी 

 बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील देवखेड या गावी झाला. त्यांचा जन्म गोकुळाष्टमीला झाल्यामुळे गावातील कोतवाल काळुजी बाबा खरात यांनी कृष्णा नाव ठेवावे असा आग्रह त्यांनी कुटुंबाजवळ धरला आणि त्यावर शिक्कामोर्तब होऊन किसन हे नाव ठेवण्यात आले.

         त्यांचे वडील एकनाथराव ठमाजी पिसे आणि आई चंद्रकलाबाई हे काळ्या आईवर नितांत प्रेम करणारे एक उत्कृष्ट कष्टकरी शेतकरी कुटुंब होते. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही विचारधारा त्याकाळी बहुतेक मोठ्या शेतकऱ्यांची होती. त्यामुळे शिक्षण असूनही शक्यतोवर कोणीही नोकरीच्या भानगडीत पडत नसे. त्यांचे वडील सातवा वर्ग पास असल्यामुळे त्यांना शिक्षकाची सहज नोकरी लागत होती. पण आपण मोठे ४० एकरांचे कास्तकार आहोत या गुर्मित त्यांनी नोकरी स्विकारली नाही.

        त्याकाळी जे शेतमजूर,महिनदार आणि सालदार होते त्यांचीच मुले परिस्थितीमुळे शिकली, मोठी झाली आणि आजरोजी चांगल्या पदावरून सेवानिवृत्त झाली आहेत. वडील एकनाथराव पिसे यांना वाचनाचा छंद असल्याने सामाजिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, पौराणिक या विषयांवरील ग्रंथांचे वाचन करून त्यावर एकप्रकारे समीक्षण करून मान्यवरांसोबत ते सखोल चर्चा करीत होते. ते कामानिमित्ताने तहसीलला गेल्यावर घरी येताना मुलांसाठी भातकं न आणता वर्तमानपत्रं, पुस्तकं किंवा हिंदी उपंन्यास आठवण ठेवून आणत असे. हा त्यांचा आवडता छंद होता आणि तो त्यांनी शेवटपर्यंत जपला.

    किसनचे प्राथमिक शिक्षण देवखेड येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत आणि माध्यमिक शिक्षण किनगाव जट्टू येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये झाले. देवखेड ते किनगाव जट्टू हे जवळपास दहाबारा किलोमीटरचे अंतर त्यांनी शाळेसाठी अनवाणी पायाने झिजविले. शाळेतील शिक्षक श्री. जी.डी.देशमुख सर वाचनालय चालवत होते. त्यांच्याकडून वडिलांसाठी वाचन करण्याकरिता कादंबरी, कथासंग्रह, पुस्तके, घेऊन जाणे हे किसनचे नित्यनेमाचे काम होते. ते त्यांनी निमूटपणे पार पाडले. कथा,कादंबरीच्या मुखपृष्ठावरील लेखकांचे नाव पाहून सरांच्या मनात लेखक होण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. " या इच्छाशक्तीच्या बळावर मी स्वतः लेखक झालो, पण या पाठीमागे वडिलांची प्रेरणा होती. वाचन संकृती आमच्या भावंडात रुजवण्याचे काम माझ्या वडिलांनी केले‌. तसेच माझ्यात साहित्यनिर्मितीचे बीज माझ्या वडिलांनी रोवले." असे किसन पिसे आवर्जून सांगतात.

      त्यांच्या वडिलांना शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या मुलांनाच शिकविले नाही तर एक सामाजिक जबाबदारी म्हणून तीन भाच्यांना देखील शिकविले. शिवाय ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सरांच्या वडिलांनी सर्व मुलांना शिकविले.किसनला एमकॉम, संजयला डीएचएमएस., भास्करला बीए तर धाकट्या दिनकरला एम.ई.(इलेक्ट्रिकल इंजिनिअर) केले. आजरोजी तो सध्या हिंगोली येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. सर्वच शेतीवर अवलंबून होते. त्यामुळे त्यांची फार आर्थिक ओढाताण झाली. तरीही त्यांनी त्यावर मात करून सर्वांना उच्चशिक्षित आणि सुसंस्कारित केले.सरांनी पुढे छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात बीकॉम आणि एमकॉम केले.

    देवगिरी महाविद्यालयात शिकत असताना त्यांचा सुप्रसिद्ध कवी प्रा. फ. मु. शिंदे आणि साहित्यिक प्रा. बा. ह. कल्याणकर या नामांकित व्यक्तींचा जवळून परिचय झाला.या साहित्यिकांच्या विचारांनी ते प्रभावित झाले.

       छत्रपती संभाजीनगर हे चळवळीचे शहर असल्यामुळे त्यांना साहित्य निर्मितीची प्रेरणा मिळाली. त्यांनी साहित्यात कष्टकरी शेतकऱ्यांच्या व्यथा अंतःकरणातून मांडत आहे. शेतकरी संघटनेचे तत्कालीन नेते शरद जोशी यांच्या आंदोलनापासून शेती आणि शेतकरी यांच्या व्यथेवर लिहिण्यास प्रेरणा मिळाली. देवगिरी महाविद्यालयात असताना महाविद्यालयीन स्नेहसंमेलनात सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते रमेश देव, लक्ष्मीकांत बेर्डे ,अभिनेत्री जयश्री गडकर आणि मुग्धा चिटणीस यांचा जवळून परिचय झाला. हा त्यांचेसाठी एक अविस्मरणीय प्रसंग होता. 

       सहकार महर्षी भास्कररावजी शिंगणे यांनी सुरू केलेल्या पैनगंगा सहकारी सूत गिरणी साखखेर्डा येथे ते लेखाविभागात कनिष्ठ लिपीक म्हणून ११ जून १९९० रोजी नोकरीला लागले. येथेही मन रमेनासे झाले. पुढे ही नोकरी सोडून चिखली येथील महाराणा प्रताप संस्थेच्या अंतर्गत पांडव विद्यालय कव्हळा येथे क्रीडा शिक्षक म्हणून ते रुजू झाले.

      इघन, कोंडी (कथा संग्रह),शेतकऱ्यांच्या समस्या, काळया आईच्या कुशीतून सोनं पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची अवहेलना (लेख संग्रह), हेळसांड (कांदबरी) आणि पोशिंदा (कविता संग्रह)

ही त्यांची आजपर्यंत प्रकाशित झालेली ग्रंथसंपदा आहे.

      गावातील प्रत्येक व्यक्तीने वाचन केले पाहिजे म्हणून गावात 

 २००९ पासून देवखेड येथे राजश्री शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय सुरू केले.पोलिस हवालदार साहित्यिक प्रकाश खरात यांनी १९फेब्रुवारी २०२० रोजी शिवजयंती निमित्ताने एक ग्रामीण कवी संमेलन देवखेड येथे आयोजित केले होते. सदर कविसंमेलनाचे अध्यक्षपद किसन एकनाथ पिसे यांनी भुषविले.

       महाराष्ट नवनिर्माण सेना बुलढाणा, अक्षर साधना साहित्य संघ चिखली, मातोश्री बु. वच्छलाबाई काळनुजी गवई बहुउद्देशीय संस्था साखरखेर्डा आणि चवदार तळे स्मृती समिती, चिखली या संस्थांनी किसन पिसे यांना साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांची राहणी साधी असून त्यांच्यात उच्चप्रतिची चिंतनशीलता आहे.

# प्रा दिगंबर कानडजे 

   सागवन-बुलढाणा.

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत