गजानन बाजीराव सोळंकी - एक संयमी समाजशील व्यक्तिमत्त्व
गजानन बाजीराव सोळंकी - एक संयमी समाजशील व्यक्तिमत्त्व
--------------------------------------------------------------------
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पाटोदा या लहानशा खेड्यात गजानन बाजीराव सोळंकी यांचा १० ऑक्टोबर १९६७ रोजी एका सधन कुटुंबात जन्म झाला. पाटोदा हे गाव विकासापासून फार दूर राहिलेले आणि कमी लोकसंख्येची गाव म्हणून फार दुर्लक्षित होते. या गावात बाजीराव सोळंकींना चार भाऊ व एक बहीण असा मोठा परिवार.. एक फार मोठी असामी म्हणून त्यांचा पंचक्रोशीत मानसन्मान होता. जवळपास या कुटुंबात दीडशे एकर जमीन होती. एवढं मोठं कुटुंब पाटोदा गावात गुण्यागोविंदाने राहत होते. याशिवाय गेरु माटरगाव, टाकरखेड हेलगा आणि हरणी गावातील काही शेतजमीन त्यांना आजीआजोबा कडून मिळाली होती. त्याकडेही त्यांना लक्ष द्यावे लागत होते.
त्यांचे वडील बाजीराव बाळकृष्ण सोळंकी आणि आई गोदावरी हे दोघेही शिकलेले होते. तसे पाहिले तर त्या काळी शिक्षण घेण्यासाठी तशा सुविधाही उपलब्ध नव्हत्या. लोकांचा कल देखील शिक्षणाकडे नव्हता. अशाही परिस्थितीत त्यांच्या वडिलांना शिक्षण घेण्याची हौस. तेव्हा वडिलांनी शिक्षण हे जीवन जगण्यासाठी आवश्यक बाब आहे हे समजून त्यांनी बुलढाणा येथे एडेड हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथे दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. वास्तविक तो काळ असा होता की सातवा वर्ग जरी पास असले तरी शिक्षकाची सहज नोकरी लागत होती ,परंतु घरी भरपूर शेती असल्यामुळे त्यांना नोकरी करण्याची इच्छा झाली नाही. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी त्या काळी जनतेची मनोधारणा होती. बाजीराव सोळंकी हे शेतीनिष्ठ जीवन जगणारे एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. तेव्हा त्यांनी शेतीला प्रथम प्राधान्य दिले होते.
गजानन सोळंकी यांना अरुण,दिलीप, राजेंद्र, अजय असे चार भाऊ आणि कावेरी एक बहीण. त्यांची आई गोदावरी ह्या देखील आठवा वर्ग शिकलेल्या होत्या. वास्तविक गोदावरीताई सुद्धा नोकरीला सहज लागू शकत होत्या परंतु त्यांनी घर प्रपंचाला महत्त्व देऊन एक उत्तम गृहिणी म्हणून नाव कमविले होते. अशा सुशिक्षित आई-वडिलांच्या सान्निध्यात सर्व भावंडांचे बालपण चैनीत गेले. सोन्याच्या चमचात घास भरवावा अशी त्यांची ऐपत होती. आईवडील शिकलेली असल्यामुळे साहजिकच त्या कुटुंबामध्ये शैक्षणिक वातावरण होते. ते कुटुंब शिक्षणाचे महत्त्व जाणून होते. संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम या कुटुंबात झाले.
काही काळानंतर गजाननच्या आईवडिलांना शेती करण्यासाठी गेरू माटरगावला जाणे भाग पडले. ते तेथे सर्व मुलाबाळांना घेऊन राहायला गेले. गेरू माटरगाव हे स्थळ सुद्धा कोकणा सारखे निसर्गरम्य होते. आपल्या मुलांनाही शिकवावं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करावं ही त्यांची तीव्र इच्छा होती. गेरू माटरगाव हे आडवळणी आणि शिक्षणाच्या दृष्टीने गैरसोयीचे होते. अशा ठिकाणी शिक्षणाची विशेष व्यवस्था नसल्यामुळे ही सर्व भावंडे बुलढाणा येथे दाजीकडे म्हणजेच प्रा .जे. के. परिहार यांच्याकडे शिक्षणासाठी राहायला आली. प्रा. परिहार सरांनी सर्व भावंडांचे शिक्षण मोठ्या मनाने जिल्हा परिषद गव्हर्मेंट हायस्कूल मध्ये केले. गजाननला विज्ञानाची विशेष आवड असल्यामुळे त्यांनी जिजामाता महाविद्यालयात बीएस्सी (जीवशास्त्र) पदवी संपादन केली.
त्यांना शालेय जीवनापासून ते महाविद्यालयापर्यंत खो-खो खेळाची विशेष आवड होती. त्यात त्यांनी चांगले प्रयत्न करून राज्यस्तरावर दोन वेळा विजय मिळविला. बीएससी झाल्यानंतर त्यांनी बुलढाणा येथे सोळंकी प्रोव्हिजन किराणा स्टोअर्स १९९२ मध्ये सुरू केले. त्यांनी नोकरीला प्राधान्य न देता व्यवसायाला महत्व दिले. काही काळानंतर 'तू एवढे पदवीचे शिक्षण घेतले आहेस, तर त्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, म्हणून तू शिक्षक हो 'असा सल्ला प्रा परिहार सरांनी गजानन ला दिला. पडत्या फळाची आज्ञा मानून त्यांनी सरांच्या आग्रहाखातर बुलडाणा येथील शासकीय डीएड महाविद्यालयात प्रवेश घेतला. जिद्दीने अभ्यास करून डीएड ही शिक्षकाची पदविका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली.
जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत ते स्वस्थ बसले नाही. त्यांनी सुदर्शन सोलर वॉटर हीटर वितरक, गजानन ट्रेडर्स व इलेक्ट्रॉनिक्स आणि ट्रॅक्टर अवजारे व मशिनरी वितरण अशा विविध व्यवसायात जातीने लक्ष घातले. रिकामं मन सैतानाचा कारखाना होऊ दिला नाही. स्वतः व्यवसाय केला आणि इतरांनाही व्यवसाय मिळवून दिला. या सर्व बाबतीत प्रा. जे. के. परिहार यांनी श्रीकृष्णाची भूमिका बजावली. तसेच त्यांनी सहकार क्षेत्रात देखील पाऊल टाकले. १९९५ मध्ये प्रताप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था स्थापन करून बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मितीसाठी आर्थिक हातभार लावला. जेव्हा जेव्हा गजाननराव बेचैन होऊन उद्दिग्न व्हायचे तेव्हा तेव्हा प्रा. परिहार सरांनी त्यांना समतोल असे मार्गदर्शन करुन एक चांगली दिशा दिली. मन हे विधायक कामात गुंतवून ठेवले पाहिजेत याची जाणीव त्यांना करून दिली.
पुढे एक दिवस बुलढाणा जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या जागा निघाल्या. नोकरीसाठी परिहार सरांनी अर्ज करावयाला लावला. प्राथमिक शिक्षक म्हणून सोनेवाडी येथे १०/२/२००३ रोजी प्रथम नियुक्ती मिळाली. शाळा हे मंदीर व विद्यार्थी हे दैवत मानून त्यांना उन्नत करण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. लहान मुलांना शिकविणे हे एक आव्हानात्मक काम असते, ते सतीचे वाण मानून त्यांनी जिद्दीने आणि आवडीने स्विकारले. पुढे त्यांनी उत्तमोत्तम विद्यार्थी घडविण्याचे काम केले.
ज्ञानदीप शिक्षण संस्था बुलढाणा, मातृभाषा प्रतिष्ठान बुलडाणा , अखिल भारतीय राष्ट्रीय शरद पवार विचार मंच बुलडाणा अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे सांभाळून तेथे प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांना दोन अपत्य असून अभिषेक हा ॲग्रीकल्चर बिजनेस मॅनेजमेंट मध्ये पदवी शिक्षण घेत आहे, तर मिताली एच.एस.सी होऊन नीट परीक्षेची चांगली तयारी करते आहे. पर्यावरण विषयक जाणीव जागृती, विविध संस्थेमार्फत रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच प्रा. डाॅ. एस. एम. कानडजे यांचे मार्गदर्शनाखाली त्यांनी मराठी मातृभाषा प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष या नात्याने मराठी भाषा , साहित्य व संस्कृती च्या संवर्धनार्थ विविध उपक्रम राबविले आहेत.
सामाजिक बांधिलकी म्हणून कुटुंबातील मोठ्या भावांची मुले बुलडाणा शहरातील नामांकित शाळेत शिकविली. वृद्धाश्रम व अनाथ बालके यांना सहकार्य करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त करून दाखविला. क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना विशेष रूची असल्यामुळे त्यांनी जय मातृभूमी क्रीडा मंडळाला वाहून घेतले आहे. स्थापनेत त्यांचा सहभाग असून सध्या ते सक्रिय सभासद आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा हिरक महोत्सव दिनानिमित्त त्यांनी वादविवाद स्पर्धेत भाग घेतला होता, त्यात त्यांना प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल सन्मानित करण्यात आले होते. एकंदरीत त्यांचा स्वभाव मनमिळाऊ, सहकार्यशील, मेहनती, संवेदनशील, निगर्वी आणि समाजशील आहे.
# प्रा दिगंबर कानडजे, मधुकोष निवास,
सागवन बुलडाणा (८२७५२३१८७४)