भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर : जीवन व कार्य
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर : जीवन व कार्य
-------------------------------------------------------------
डॉ.बाबासाहेबांचे आजोबा मालोजी सकपाळ हे भारतीय ब्रिटिश सैन्यात सैनिक म्हणून नोकरीला होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून रामजींनी देखील भारतीय ब्रिटिश सरकारी सैन्यात सुभेदार पदावर काम केले. मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या महू या गावी १४ एप्रील १८९१ रोजी रामजी आणि भीमाबाई या आईवडिलांच्या पोटी भिमराव हे चौदावे रत्न जन्माला आले. सर्व भावंडात ते सर्वात लहान होते. भिमराव सहा वर्षांचे असतानाच त्यांची आई मरण पावली. रामजीचे संपूर्ण कुटुंब हवालदिल झाले. पुढे भिमरावांच्या पालनपोषणाची जबाबदारी वडील रामजी आणि बहिण मिराबाई यांच्यावर येऊन पडली.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यावर ते सातारा येथे वास्तव्यास आले. मुलांनी शिकावं, खूप मोठं व्हावं आणि नाव कमवावं असे त्यांना वाटे. रामजी आंबेडकर यांना माहित होते की शिकल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय आपल्याला आणि आपल्या समाजाला पर्याय नाही. हे सर्व लक्षात घेऊन रामजी आंबेडकर यांनी भीमरावचे नाव वयाच्या सहाव्या वर्षी ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील सरकारी शाळेत पहिल्या वर्गात दाखल केले.
तेव्हा ही शाळा राजवाडा परिसरातील एका वेगळ्या वाड्यात भरत होती. हा वाडा छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार प्रतापसिंहराजे भोसले यांनी बांधला होता. या वाड्यात पूर्वी राजघराण्यातल्या मुलींची शिक्षणाची व्यवस्था केली जात होती. १८५१ साली हा राजवाडा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि शाळेसाठी ब्रिटिश सरकारच्या ताब्यात देण्यात आला. तेव्हापासून ती शाळा सातारा सरकारी हायस्कूल म्हणून ओळखल्या जावू लागली होती. येथे फक्त पहिली ते चौथी पर्यंत वर्ग होते.
रामजी सुभेदाराने भिमरावचा वर्गात प्रवेश घेतेवेळी त्यांनी आंबेडकरांचे आडनाव त्यांचे मूळगाव ''आंबावडे'' असल्या कारणाने त्यांनी अंबावडेकर असे नोंदविले. पुढे या शाळेतील शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी भिमरावांचे आडनाव आंबेडकर करून घेतले. आजही त्या शाळेच्या रजिस्टर मध्ये भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद पाहायला मिळते. ब्रिटिशकालीन सरकारी शाळेला १९५१ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाल्यामुळे या शाळेचे नामकरण छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल असे करण्यात आले. तेव्हापासून या शाळेत दरवर्षी १४ एप्रिलला 'आंबेडकर जयंती ' आणि ७ नोव्हेंबरला ' शाळाप्रवेश दिन ' म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृतीप्रित्यर्थ उत्साहाने साजरा केला जातो. या शाळेत नेहमी गरजू, गोरगरिब, शेतमजूर, कष्टकरी,अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय मुलांचे प्रवेश होतात. या शाळेतील विद्यार्थी ''मी डॉ.बाबासाहेबांसारखा शिकून मोठा होईल, कलेक्टर होईल ,वकील होईल, इंजिनिअर होईल " अशा भावना प्रवेश घेताना व्यक्त करतात. यांना या शाळेत शिकण्याचा सार्थ अभिमान वाटतो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे माध्यमिक शिक्षण मुंबईतील एलफिन्स्टन स्कूलमध्ये झाले. ते दहावीची परीक्षा १९०७ मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. पुढे ते बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये बीए झाले . डॉ.बाबासाहेब आंबेडकर फार बुध्दिमान,चौकस,अभ्यासू आणि कष्टाळू होते. ते २४ तासांपैकी १८ तास सतत अभ्यास करायचे. एकच ध्यास - सतत अभ्यास, हे त्यांचे घोषवाक्य होते. बीए, एमए, एमएस्सी, डीएस्सी, पीएचडी, बार ॲट लाॅ , एलएलडी,, डिलीट अशा एकूण ३२ पदव्या त्यांनी मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, बॉन विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ग्रेइन या विद्यापीठांच्या संपादित केल्या होत्या. खरोखर त्यांनी उच्च शिक्षणाचा कळस गाठला होता, असे म्हणावे लागेल. अथांग ज्ञानाचा सागर म्हणून त्यांची ख्याती होती. तरीही त्यांना कधीही शिक्षणाचा गर्व झाला नाही. विनम्रता, सहिष्णूता,समता ,बंधूता आणि मानवता त्यांच्यामध्ये ओत:प्रोत भरलेली होती. अर्थशास्त्र, समाजशास्त्र ,राज्यशास्त्र ,मानववंश शास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र शिक्षण, इतिहास आणि कायदा या सामाजिक शास्त्रांचा सखोल अभ्यास करून या विषयांवर त्यांनी संशोधन केले होते.
डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांचे वयाच्या १४ व्या वर्षी रमाबाईशी सन १९०६ मध्ये भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये लग्न पार पडले. रमाबाई तेव्हा केवळ नऊ वर्षांच्या होत्या. रमाईने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर चांगली साथ दिली. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाच अपत्ये होती. यापैकी केवळ यशवंत नावाचं मुल जिवंत राहिले. त्यांचा राजरत्न नावाचा एक आवडता पुत्र होता. तोही जन्मानंतर काही महिन्यांतच वारला. पुढे दुर्दैवाने रमाईचे १९३५ मध्ये दुःखद निधन झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर फार कोलमोडून गेले. त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कोणत्याच गोष्टीत मन रमेना. ते बैचेन होत असत.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृति ठीक नसल्यामुळे ते डॉ मालवणकरांकडे औषधोपचार घ्यायचे. त्या दवाखान्यात डॉ सविता कबीरांची ओळख डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी झाली. ओळखीचे रूपांतर लग्नात झाले. पुढे प्रकृती अस्वस्थाच्या कारणामुळे त्यांनी डॉ. सविता कबीर यांचेशी पहिल्या पत्नीच्या निधनानंतर चौदा वर्षांनी १५ एप्रिल १९४८ रोजी दुसरे लग्न केले. डॉ सविता एमबीबीएस असल्या कारणाने त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चांगली काळजी घेत होत्या. पुढे त्यांनी सविता आंबेडकर नाव धारण केले. सर्वजण आदराने त्यांना माई तथा माईसाहेब म्हणायचे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित चळवळीला प्रेरणा दिली. अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव आणि अन्याय नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या व कामगारांच्या हक्कांचे संरक्षण केले. भारतीय संविधानाच्या द्वारे देशातील नागरिकांना समान हक्क आणि स्वातंत्र्य मिळवून दिले. भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून त्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्षपद भूषविले. त्यांनी मोठ्या संख्येने आपल्या अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माच्या पुनरूज्जीवनासाठी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. दलितांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी कठोर परिश्रम घेतले.
" मनुष्य सतत दिर्घोउद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होतो. विद्येबरोबरच आमच्यात शील पाहिजेत. विद्या ही तलवारीसारखी आहे, परंतु तिचे महत्त्व तिला धारण करण्यावर अवलंबून आहे. जर शिकले सवरले लोक शिलाशिवाय निपजू लागले, तर त्यांच्या शिक्षणात समाजाचा आणि राष्ट्राचा नाश आहे. जोपर्यंत भारतात सामाजिक लोकशाही गुण्यागोविंदाने नांदणार नाही, तोपर्यंत खरी लोकशाही यशस्वी होणार नाही. " असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.
ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ते लोकप्रिय झाले. भारतीय संविधानाची निर्मिती केली. विविध कार्याची पावती म्हणून त्यांना "भारतरत्न" हा सर्वोच्च पुरस्कार १४ एप्रील १९९० रोजी तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमन यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. ते एक अर्थशास्त्रज्ञ ,वकील, राजकारणी, प्राध्यापक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. ६ डिसेंबर रोजी त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे,त्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन!
# प्रा दिगंबर कानडजे
सागवन- बुलढाणा