एल.डी. पाटील : एक समाजशील , सेवाभावी व्यक्तीमत्व

      एल.डी. पाटील : एक समाजशील , सेवाभावी व्यक्तीमत्व 

         बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील विवरा हे घाटाखाली असलेले एक गाव.. या गावात धर्माजी पाटील आणि चिडाबाई या आईवडिलांच्या पोटी 28 फेब्रुवारी 1950 रोजी लक्ष्मण धर्माजी पाटील यांचा जन्म झाला. सर 2 वर्षांचे असताना त्यांना अर्धांगवायू झाला होता . सरांचे वडील गावचे वैद्य असल्यामुळे त्यांना लवकर आराम मिळाला. तसेच गावाचे देखील फार मोठे सहकार्य झाले. यातून सर सावरले. त्यांना तायडे ऐवजी पाटील याच नावाने कागदोपत्री ओळखले जातात. सरांचे वडील धर्माजी नामदेव पाटील हे त्या काळी 5 वा वर्ग पास होते. आई मात्र निरक्षर होती . परंतु ती आपल्या घरप्रपंचात तरबेज होती. संसाराचा फार मोठा गाडा तिने नेटाने हाकलला होता.

       सरांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी चांगली होती. सरांचे एकत्रित कुटुंब फार मोठे होते. त्यांचे जवळ 60 एकर जमीन होती. सरांना 3 भाऊ आणि 7 बहिणी होत्या. तत्कालीन आमदार स्व. भिकू फकिरा पाटील यांचेशी त्यांच्या वडिलांचा संपर्क आला. त्यांच्यामुळे सरांचे वडील राजकारणात सक्रिय झाले. तेव्हा आमदाराची बहिण सरांच्या चुलत काकांना दिली होती. साहजिकच सरांच्या वडिलांना राजकारणात आयती संधी चालून आली. सरांच्या वडिलांना विवरा गावचे 7 वर्षे सरपंच  आणि 1962 मध्ये मलकापूर पंचायत समितीचे पाच वर्षे सदस्य म्हणून काम करायला संधी मिळाली. 

          यांचे प्राथमिक शिक्षण विवरा येथे झाले तर माध्यमिक शिक्षण म्युनिसिपल हायस्कूल मलकापूर येथे झाले. सरांनी काटकसरीने शिक्षण घेतले. ते 1966 साली 10 वीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांना रसायनशास्त्र विषयात प्राविण्य श्रेणी मिळाली. सरांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणाचाही विरोध झाला नाही. त्या काळी पदवी शिक्षण घेण्यापूर्वी प्री युनिव्हर्सिटी परीक्षा द्यावी लागत असे. सरांनी जी एस कॉलेज खामगाव ला प्री मध्ये प्रवेश घेतला. जिद्द ,चिकाटी, परिश्रम आणि अभ्यासूवृत्ती या जोरांवर ते 1971 मध्ये बीएस्सी (जीवशास्त्र) ही विज्ञानाची पदवी घेऊन बाहेर पडले. तसेच त्यांना शिक्षक होण्याची आवड असल्यामुळे त्यांनी 1979 मध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा येथे बीएडची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली 

       त्या काळी गणित आणि विज्ञान शिक्षकांना लगेच नोकरी मिळायची. एल. डी. पाटलांना स्व. ॲड. ज्योतिराव राऊत यांचे सहकार्याने 1 जुलै 1972 ला श्री शिवाजी हायस्कूल चांडोळ येथे विज्ञान शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. येथील वातावरणाशी ते समरस झाले. " मला घाटावरील वातावरण मला खूप भावलं." असे ते आवर्जून सांगतात. श्री शिवाजी शिक्षण संस्थेत सरांना नोकरी लागल्यामुळे स्वर्गीय ॲड. रामभाऊ राऊत यांच्या सहकार्याने सरांचे लग्न कै. तुळशीराम राऊत बुलढाणा यांच्या मंगला नावाच्या मुलीशी 6 जून 1975 रोजी झाले. त्यांची पत्नी दहावी शिकलेली होती. शिवाय ती घरंदाज आणि सुसंस्कारित मुलगी होती. सरांना तीन अपत्ये असून मोठी मुलगी बीएससी डीएड आहे. तर मुलगा जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक पदावर काम करतो. लहानी मुलगी बीएचएमएस असून वैद्यकीय सेवा देते. एकंदरीत त्यांचा सुखी संसार असून ते समाधानी आहे.

       तब्बल एक तप सरांनी चांडोळ येथे इमानेइतबारे नोकरी केली. सरांनी तेथे उत्तमोत्तम विद्यार्थी घडविले. त्यांचा समाजात आणि विद्यार्थी वर्गात नावलौकिक होता. ॲडव्होकेट ज्योतिराव राऊत साहेबांनी पुढे सरांची बदली एक तपांनतर चांडोळ येथून 21 सप्टेंबर 1984 रोजी श्री शिवाजी विद्यालय बुलढाणा येथे करून दिली. पाटील सर 35 वर्षे 8 महिने इमानेइतबारे ज्ञानदानाचे कार्य करून 29 फेब्रुवारी 2008 रोजी बुलढाणा येथून सेवानिवृत्त झाले. गरजूंना आर्थिक मदत करणे, गोमाता म्हणून गाईंना मक्याची कुट्टी खाऊ घालणे आणि कोणत्याही भागातील रूग्ण बुलडाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी आला तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्याच्यासोबत आलेल्या व्यक्तींना जेवणाचे डबे देणे ,नाश्ता देणे आणि त्यांची आस्थेने विचारपूस करणे हा उपक्रम त्यांनी सदैव राबविला होता आणि आजही ते त्याच भावनेने सामाजिक काम करतात.

      सरांनी 1978 - 1979 च्या बॅचचा बुलढाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या बीएड माजी विद्यार्थींचा शेगांव येथे मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी खूप परिश्रम घेऊन तो मेळावा सरांनी यशस्वी करून दाखवला हे विशेष.. सरांचा बराचसा काळ बुलढाणा येथे चांगला गेला. सरांचे जीवनात 2000 पासून बरेच चढउतार आले. 2017 मध्ये सरांची पत्नी वारली‌. सरांनी ते सर्व आघात धीरगंभीरपणे संयम ठेवून सहन केले. त्यांनी खचून न जाता स्वतः ला सावरलं. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,या श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने ते आनंदाने जीवन जगत आहे. श्री स्वामी समर्थ केंद्र राऊतवाडी, बुलढाणा येथे ते एक सक्रिय सेवाधारी म्हणून काम करतात. त्यामुळेच त्यांच्या स्वभावात खूप काही बदल घडून आले. श्रीस्वामी समर्थ यांच्या कार्यामुळे मला जीवन जगण्यासाठी बळ मिळते,असे ते आवर्जून सांगतात.

       सध्या गोमाता संवर्धन केंद्राची जबाबदारी त्यांनी स्वीकारली असून आज रोजी केंद्रात 35 गायी आहेत. काही शिक्षकांना सोबत घेऊन ते माजी विद्यार्थ्यांच्या घरी जातात . त्यांचे वाढदिवस साजरा करुन त्यांना वाचनीय पुस्तके भेट देतात.आता एक उपक्रम त्यांनी हाती घेतला असून ते टाईप 2 डायबेटीस झालेल्यांचा शोध घेतात. त्यांना डॉ विनायक हिंगणे यांनी लिहिलेले आहारविषयक पुस्तक भेट देतात. खरोखर आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असून अधोरेखित करण्यासारखा आहे.

साधी राहणी, साधा पोषाख, साधी जीवनशैली आणि कोणालाही कमी न लेखता संयमी संवाद ही त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये आहेत.

# प्रा दिगंबर कानडजे,


Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत