मानवी जीवनात वाचनाचे महत्व

              मानवी जीवनात वाचनाचे महत्व 

         महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया घालून मराठी भाषेला खऱ्या अर्थाने समृद्ध व संपन्न बनवणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि इतर संत तुकाराम, संत एकनाथ,संत नामदेव, संत नरहरी सोनार,संत सावता माळी, संत जनाबाई,संत चोखामेळा हे होत. हे सर्व वारकरी संप्रदायातील संत केवळ वाचन, लेखन आणि चिंतन करुन नावारूपाला आली आहेत. वरवर पुस्तकांची पाने चाळणे, पुस्तकातील प्रत्येक पान सरसर वाचून काढणे आणि प्रत्येक पानावरील वाक्यंवाक्य काळजीपूर्वक वाचून चिंतन आणि मनन करणे. या पध्दतीने वाचकवर्ग वाचन करित असतो.आपण इतरांपेक्षा काहीतरी आगळं वेगळं असावं,आपलं व्यक्तिमत्त्व फुलून दिसावं आणि इतरांवर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटावा असं वाटत असेल तर ज्ञानप्राप्ती केल्याशिवाय पर्याय नाही. सखोल वाचन केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होणे शक्य नाही. व्यक्तीला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. कोणत्याही भाषेतील विचारधन सखोल आणि अर्थपूर्ण वाचल्याशिवाय कळत नाही. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे चांगला अभ्यास करावा. मेहनत करून चांगलं शिकावं आणि मोठं व्हावं. तसेच विद्यार्थ्यांनी अर्थाविना पाठांतर करू नये. "अर्थाविन पाठांतर करणे व्यर्थ आहे," असे संत तुकारामांनी म्हणतात.म्हटले. चांगलं वाचन- लेखन करावं.खूप ज्ञान संपादन करावं,असे प्रत्येक वाटते. परंतु केवळ वाटून चालत नाही तर ते कृतीत उतरावे लागते. आजकाल बहुतेकांना वाचन करण्याची आवड राहिलेली नाही.आजकालचे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी बनले आहेत. ते ज्ञानार्थी राहिले नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 24 तासांपैकी सतत 18 तास अभ्यास करत असत. वाचन करत असताना सकाळ केव्हा व्हायची, हे सुद्धा त्यांना माहित होत नसे. एवढे ते वाचनात मग्न असायचे. वाचन हा त्यांचा जीव की प्राण होता.

       आता जवळपास प्रत्येक राज्यात शंभर टक्के जनता साक्षर झालेली आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती आता वाचन ,लेखन करू शकते. विद्यार्थी,पालक, सामाजिक क्षेत्रात काम करणारे समाजसेवक, कार्यकर्ते, अधिकारी-कर्मचारी, आमदार, खासदार या सर्वांनी दिवसातून किमान दोन-तीन तास तरी अर्थपूर्ण वाचन केले पाहिजे, ही आजच्या काळाची गरज आहे. पुस्तके,मासिके आणि दैनिक वृत्तपत्रे आज सर्व ठिकाणी किंवा सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून गावोगावी पोहचलेली आहे. प्रश्न हा आहे की घोड्याला पाणी पिण्यासाठी हौदापर्यंत नेता येते, परंतु पाणी मात्र त्याचे त्यालाच प्यावे लागते. तिच गत वाचनासंबंधी वाचकांची झाली आहे. वाचनीय साहित्य गावात जरी उपलब्ध झाले असले तरी वेळात वेळ काढून वाचनासाठी व्यक्ती वाचनालयात आली पाहिजे. त्याला वाचनातून मिळालेले ज्ञान ही त्याच्या आयुष्याची शिदोरी असते. कारण वाचनाने मन प्रसन्न होते. विचार परिपक्व होतात. अद्यावत ज्ञानात भर पडते. वक्ता, प्रवचनकार, किर्तनकार , विद्यार्थी यांना वाचनाची फार गरज असते. त्याशिवाय ते जीवनात यशस्वी होऊ शकत नाही.

         "केल्याने देशाटन , पंडित मैत्री ,सभेत संचार" हे जीवन जगण्यासाठी खूप आवश्यक आहे. देशाटन केल्यानंतर विविध ठिकाणची संस्कृती आणि विचारसरणी कळते. पंडिता सोबत मैत्री केली तर त्यांच्या ज्ञानाचे आपल्यात संक्रमण होते आणि सभेत आपण वक्त्यांची भाषणे ऐकली तर आपल्या ज्ञानात भर पडून आपले जीवन सुखकर आणि आनंददायी होते. परंतु आजचा तरुण वर्ग दूरदर्शन, भ्रमणध्वनी आणि संगणकावर तासंतास वेळ घालवितो आहे. वास्तविक दररोज किमान दोन - तीन तास तरी वृत्तपत्रे आणि महत्त्वाची पुस्तके नियमित वाचली तर ज्ञानात भर पडते. जे जे काही उदात्त आणि सकस साहित्य असेल ते काळजीपूर्वक वाचून त्यावर चिंतन केले तर आपले विचार प्रगल्भ आणि समृद्ध होतात. आपल्या ज्ञानाची पातळी वाढते. सद्सद् विवेक बुद्धी जागृत होते. चांगलं काय वाईट काय हे कळायला लागते आणि अनावश्यक वादविवाद, पूर्वग्रहदूषित विचार मिटवून जीवनाचा आनंद घेण्यासाठी मन सजग होते. वाचनाने अनेक विषयांची माहिती मिळते. अनेक व्यक्तींचा जीवनविषयक दृष्टिकोन कळतो. संस्कृती, परंपरा,चांगले रितीरिवाज कळतात.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना वाचनाची खूप आवड होती. तेव्हा त्यांनी स्वतःचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा संपूर्ण भारतभर " वाचनप्रेरणा दिन " म्हणून साजरा केला जावा असे घोषित केले होते.

        पुस्तकांच्या प्रकाशनाची आणि ग्रंथांची संख्या खूप आहे. मात्र वाचणारे कमी आहे. हा काय मराठी माणसाचा व मराठी भाषेचा विकास म्हणावा का? त्यानिमित्त मानवी व्यक्तिमत्व विकासात मराठी भाषेचा अभ्यास आणि अर्थपूर्ण वाचन फार महत्त्वाचे आहे. गावातील सार्वजनिक वाचनालयाच्या कर्मचाऱ्याने गावातील नागरिकांना वाचनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असे मला वाटते. वाचनाने मन आणि चित्त शुद्ध होऊन आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून येतो. त्याचा प्रभाव आपल्या आचरणातून जाणवत असतो.आजकालची तरुणाई वाचत नाही, ही खरी आपली शोकांतिका आहे. पु ल देशपांडे, व पु काळे ,चिं वि जोशी, राम नगरकर यांचे विनोदी साहित्य वाचनीय आहे. शंकर पाटील, आनंद यादव, द मा मिरासदार यांचे ग्रामीण साहित्य वाचून मन आनंदी होते. गो नि दांडेकर,जी ए कुळकर्णी, वि स खांडेकर, कुसुमाग्रज, बा सी मर्ढेकर, अनिल, गोविंदाग्रज, बी कवी, बालकवी,रणजित देसाई, लक्ष्मण माने, शंकरराव खरात, रंगराव पठारे, विश्वास पाटील, व्यंकटेश माडगूळकर,रा रं बोराडे , सदानंद देशमुख, रमेश इंगळे उत्रादकर, रवींद्र इंगळे, सुभाष किन्होळकर, प्रा डॉ एस एम कानडजे, किसन पिसे, किरण डोंगरदिवे, प्रा बी ए खरात अशा अनेक दिग्गज साहित्यिकांचे साहित्य नव्या पिढीला कधी कळेल,ते कधी वाचतील, हा खरा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. वाचकांनी वरील लेखकांचे साहित्य वाचून जीवनाचा आस्वाद घ्यावा असे मला वाटते.

     बुद्धिमत्तेची योग्य वाढ, तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, चांगल्या वाईटातील भेद समजण्याची क्षमता, भावनिकदृष्ट्या अतिशय संस्कारक्षम मन, स्वत्वाची जाणीव, स्त्रीपुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, द्रष्टेपणा इत्यादी मूल्ये ही वाचनातून विकसित होत असतात. म्हणून म्हणतो की ' वाचाल तरच वाचाल ' ही म्हण योग्य आणि सार्थ आहे असे मला वाटते. मानवी जीवनात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे यात शंकाच नाही.

 Il प्रकाशझोत ll

 # प्रा. दिगंबर कानडजे

       सागवन - बुलडाणा (८२७५२३१८७४)


 

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत