डॉ.पंजाबराव देशमुख : जीवन व कार्य
- शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख : जीवन व कार्य -
अमरावती जिल्ह्यातील पापळ गावी एका गरीब कुटुंबात डॉ पंजाबराव देशमुख यांचा २७ डिसेंबर १८९८ रोजी जन्म झाला. शामराव आणि राधाबाई या प्रेमळ आणि सालस आई-वडिलांनी काबाडकष्ट करून पापळ येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. मुलाने खूप शिकावं, मोठं व्हावं, ही त्यांच्या आईवडिलांची तीव्र इच्छा. आर्थिक परिस्थिती हलाखिची असताना काटकसरीने, प्रसंगी अर्धपोटी राहून डाॅ. पंजाबराव देशमुखांनी माध्यमिक शिक्षण कारंजा लाड येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे पूर्ण केले.
राधाबाईने फाटका संसार नेटका करून डॉ पंजाबरावांच्या प्रकृतीची आणि शिक्षणाची काळजी घेतली. त्यांच्यावर चांगले संस्कार केले. डाॅ.पंजाबराव देशमुख हे फार संवेदनशील होते. एकदा प्राथमिक शिक्षण घेत असताना एक वेगळा अनुभव त्यांना आला. एकदा एक मित्र त्यांच्यासोबत शाळेत यायचा. त्याच्या अंगात सदरा नव्हता.उन्हाळ्याचे दिवस होते.त्याचे अंग उन्हाने भाजत होते.ही गोष्ट डॉ पंजाबराव देशमुखांच्या लक्षात आली. त्यांचे संवेदनशील मन गहिवरले.त्यांनी स्वतः चा अंगातील कोट काढून त्या मुलाला दिला.
त्यांचे आई-वडील अतिशय प्रेमळ,संवेदनशील,परोपकारी आणि प्रामाणिक होते.असे म्हणतात की "शुद्ध बिजापोटी! फळे रसाळ गोमटी!!"या उक्तीप्रमाणे पंजाबराव देशमुख जन्माला आले आणि त्यांनी आपल्या आईवडिलांचे नाव इतिहासात अजरामर केले.त्यांच्या आई-वडिलांनी स्वतःची शेती सावकाराकडे गहाण ठेवून २१ ऑगस्ट १९२० रोजी बॅरिस्टर पदवी घेण्यासाठी पंजाबरावांना इंग्लंडला रवाना केले. तेथे त्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेची झलक दाखवून "व्हॅन्स डनलॉप संस्कृत स्कॉलरशिप" मिळविली." त्यांच्या जीवनातील हा एक अविस्मरणीय आनंदाचा प्रसंग होता.तेथील वृत्तपत्रांनी या भारतीय विद्यार्थ्याचा तोंड भरून गुणगौरव केला.हा केवळ डॉ पंजाबराव देशमुख यांचा सन्मान नव्हता तर एका गरीब आई-वडिलांचा आणि आपल्या भारत देशाचा यथोचित सन्मान होता.
विलायतेत ते केवळ शिक्षणच घेत नव्हते तर तेथील सामाजिक,आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक,शैक्षणिक आणि कृषीविषयक बाबींचा चिकित्सक अभ्यास करित होते. विलायतेतील ऐश्वर्यसंपन्न जीवन भारतात आणण्यासाठी आम्ही "शिक्षण" या संजीवनीचा उपयोग करून घेऊ असा संकल्प त्यांनी सोडला होता.एडिनबर्ग विश्वविद्यालयात बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.तेथे त्यांनी "बॅरिस्टर " ही कायद्याची पदवी संपादन केली. "वेद वाड्.मयातील धर्माचा उद्गम आणि विकास " या प्रबंधावर त्यांनी पीएच.डी मिळविली. डॉक्टर पंजाबराव देशमुख 1926 ला मायदेशी परतले. मायदेशी येतांना त्यांनी समाजसेवा आणि शिक्षण ह्या दोन प्रेरणा सोबत आणल्या होत्या.भारतात आयसीएस होऊन ऐश्वर्यसंपन्न जीवन जगायचे नव्हते तर त्यांना मायदेशाची सेवा करायची होती. भारतात त्यांना मोठ्या पदाची जागा मिळवून सुखी व्हायचे नव्हते तर आपल्यासारखे अनेक बॅरिस्टर सर्वसामान्य कुटुंबात तयार झाले पाहिजे;यासाठी शिक्षणाची ज्ञानगंगोत्री खेड्यापाड्यात पोहचायची होती.
शिक्षणासाठी वडिलांनी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्यांनी समाजसेवे बरोबरच वकिली सुरू केली. बहुजनांसाठी त्यांनी योग्य तो न्याय मिळवून दिला.विदर्भात शिक्षणाने नवचैतन्य निर्माण होईल असे त्यांच्या लक्षात आले. इकडे विदर्भात विशेष करून बहुजनांचे कैवारी दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांनी शिक्षण कार्याला वाहून घेतले होते. तसेच आनंदराव मेघे , शामरावजी गुंड,आप्पासाहेब देशमुख हे शिक्षण प्रसाराचे काम करत होते. डॉ पंजाबराव देशमुखांना यांच्या कार्याची जाणीव झाली.म्हणून त्यांनी चिखली येथील पंढरीनाथ पाटीलांना आपले स्नेही मानून यांच्यावर शिक्षणाची विशेष जबाबदारी सोपवली.
तेव्हा विदर्भात केवळ चार-पाच शाळा होत्या.अशा शाळेत केवळ भांडवलदारांची आणि गर्भ श्रीमंतांचीच मुले शिकत होती.. खेड्यापाड्यात शाळा नव्हत्या.त्यामुळे गोरगरिबांची आणि मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित झाली होती.अशा मुलांना शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणी येतात याची जाणीव ठेवून त्यांनी एक "श्रद्धानंद छात्रालय " स्थापन केले.या कामासाठी त्यांना आबासाहेब खेडकर ,नानासाहेब मोहोड, मारोतराव कदम, दलपतसिंग चव्हाण या मंडळीचे मोलाचे सहकार्य लाभले. या छत्रालयात सर्व जाती-धर्माची मुले एकत्र येऊन शिक्षण घेतात, एकत्र बसतात,जेवतात हे पाहून संत गाडगेबाबा खुश झाले. डॉ.पंजाबरावांचे गाडगेबाबांनी तोंड भरून कौतुक केले.
अमरावती येथे बहुजन समाजासाठी श्री शिवाजी मराठा हायस्कूलची सर्वप्रथम स्थापना केली. या संस्थेवर अनेक संकटे आलीत . तिला जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला. एक जुलै 1932 रोजी तिचे रूपांतर श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, असे करण्यात आले. या ज्ञानगंगेचा उगम अमरावती येथे होऊन ती ज्ञानगंगा आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्याने वाहत जाऊन मोठी झाली.
शाळेसाठी इमारत नाही, पुरेसा पैसा उपलब्ध नाही, सरकार मदत करीत नाही, तर परिस्थितीत काय करायचे? अशा वेळी भाऊसाहेब खूप विचार करीत असत. त्यातून मार्ग काढत असे. मित्रांकडून व शत्रूकडून देखील संस्थेसाठी पैसा उभा केला.
प्रसंगी स्वतःचा बंगला गहाण ठेवला, पण संस्थेचे कार्य खंडित होऊ दिले नाही. अमरावती येथे एक इमारत उभी केली.लोक तिला " तट्टा हायस्कूल " म्हणून हिनवत होते . काही विघ्नसंतोषी लोकांनी तर तिला आग लावून दिली. भाऊ साहेबांना अतिशय दुःख झाले. पण ते घाबरले नाहीत. चिमणीने एक-एक काडी गोळा करून घर बांधावं आणि ते कोणी एका क्षणात मोडून टाकावं असा प्रकार घडला. तरीही त्यांनी द्वेष न करता त्यांचे अज्ञानच आहे, हे गृहीत धरून पुन्हा योजना आखून नव्या जोमाने शिक्षणाच्या कामाला लागले.निजमापासून दोन लाख रुपये देणगी मिळवली.रावांपासून तर रंकापर्यंत मदत मागितली. अण्णासाहेब पडोळे,बाबासाहेब घारफळकर,मामासाहेब लांडे,डॉ. आबासाहेब खेडकर,बी.एम.देशमुख, कानफाडे गुरुजी आणि पंढरीनाथ पाटील अशी अनेक मोलाची माणसे त्यांनी जोडून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे वटवक्षात रुपांतर केले.
डॉ भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे गुणग्राहकवृत्तीचे होते. भारताचे पहिले कृषीमंत्री,शिक्षणमहर्षी,कर्मयोगी,डॉ.पंजाबराव देशमुख यांची आज २७ डिसेंबरला जयंती. त्या निमित्त भावपूर्ण अभिवादन!
# प्रा. दिगंबर कानडजे,
सागवन-बुलडाणा. (मो. ८२७५२३१८७४)