ज्येष्ठ नागरिकांना अंतर्मुख होण्याची आवश्यकता
ज्येष्ठ नागरिकांना अंतर्मुख होण्याची आवश्यकता -
सरकारी नोकरीमध्ये असलेला प्रत्येक व्यक्ती वयाच्या ५८ व्या वर्षी किंवा फार झाले तर ६० व्या वर्षी सेवानिवृत्त होत असतो. अर्थात हा नियम मात्र राजकारणी लोकांसाठी लागू होत नाही. जसे जसे राजकारणी लोकांचे वय वाढत जाते तसे तसे ते वैचारिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ होत जातात की असे वाटते. काही राजकारणी लोकांनी ७५ वी गाठली असली तरीही ते राजकारणात उच्च पदांवर आरूढ झालेले दिसतात.एकदा वयाची पासष्टी ओलांडली की सामान्य माणूस,शेतकरी हा खूप कष्ट केल्यामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या हतबल झालेला दिसतो. सामान्य माणसाने राजकीय व्यक्तींसोबत तुलना न केलेली बरीच. त्यांच्या वैभवशाली सुखी जीवनाची आपण तुलना केली तर आपल्या जीवनात कधीच आनंद, सुख दिसणार नाही.
आजपावतो आपण अनेकांसाठी पदरमोड करून सहकार्य केले. अनेकांचे संसार मार्गी लावले. अनेक कुटुंबांना तनमनधनाने मदत केली. हे सर्व करत असताना कधी आपण जीवाची पर्वा केली नाही.आजवर आपण आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यांवर,मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. यथाशक्ती अनेकांना आर्थिक मदत केली, पण त्यांचे एवढं करूनही कधी समाधान झाले नाही. वास्तविक लहानांनी मोठ्याच्या प्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ज्येष्ठांना मानसन्मान दिला पाहिजे,एवढी माफक अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांची आहे. कायमचे उपाकारकर्त्याच्या उपकारांच्या छायेत वावरत न बसता त्या व्यक्तीच्या प्रति आदरभाव व्यक्त करावा आणि नैतिक धाक म्हणून आपलं आचरण धुतल्या तांदळासारखे ठेवावं असे मला वाटते. एवढं करूनही उपभोक्ता सुखी समाधानी दिसत नाही. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही. तेव्हा मात्र सामाजिक दायित्व मानून कुटुंबाला मदत करणारा माणूस एकटा पडतो. मला असे वाटते की आपण एक कर्तव्य म्हणून हे काम केले पाहिजे; आपण ज्येष्ठ असल्यामुळे ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण त्याकडे पाहणे गरजेचे आहे.
आता आपण वृद्धापकाळामुळे शारिरिक किंवा मानसिकदृष्ट्या इतके सक्षम राहिलो नाही. आपण उरलो उपकारापुरता असे न म्हणता, आता आपण उरलो "स्वतः पुरता" असे म्हणून मोकळं व्हावं आणि उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने जगावं असे मला वाटते. शक्यतोवर कोणतीही जबाबदारी न घेता सुकर आणि सहज जीवन जगावं. बऱ्याच वेळा ज्येष्ठ नागरिक किरकोळ कारणावरून सामान्य व्यक्तींशी वाद करतात. उदा.भाजीवाला, फळविक्रेता, फेरीवाला, व्यापारी, दुकानदार, हाॅटेलवाला अशा अनेक किरकोळ व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींशी नाहक आपण वस्तुंच्या भावावरुन घासघीस करतो. वास्तविक आपल्याला आता खाण्यापिण्याच्या बाबतीत जास्त स्वारस्य राहिलेले नाही. आरोग्याविषयी अनेक तक्रारी आता चालू झालेल्या आहेत. उलट आता मला असं वाटतं की ज्याची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे आणि त्याला सामाजिक बांधिलकी ठेवायची आहे, अशा काही व्यक्तींनी स्वतःच्या पैशाने खरोखर गरीब,गरजू आणि मेहनती मुलांना दत्तक घेऊन शिक्षण दिले पाहिजे. त्याची गरिबी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मला वाटते. असे केले तर नक्कीच मला आनंद होईल.
पक्का रस्ता परवानगी न घेता आपल्या घरगुती पाईपलाईन साठी खोदतो. तो दुरुस्त न करता तशीच नाली पडते. पुढे अनेक वाहने जोरदार आदळतात. अनेक अपघात घडून येतात. हे सर्व आमजनता पाहत असते. फक्त हळहळ व्यक्त करतात.कोणीही अशा वेळी बोलत नाही. मात्र संवेदनशील ज्येष्ठ नागरिकांना ह्या गोष्टी सहन होत नाही. तेव्हा अशा वेळी ते परखडपणे बोलतात. पण त्याची कोणीही दखल घेत नाही. अशा वेळी मी म्हणतो की आपण ज्येष्ठ नागरिक आहात. जास्त आत्मक्लेश करून चालत नाही, फायदा होण्याऐवजी उलट आपलीच तब्येत बिघडली तर कोणीही लक्ष देणार नाही. स्वतः ची काळजी स्वतः घेतली पाहिजे,ही आता काळाची गरज आहे. अर्धा सरकारी रस्ता स्वतः ची वाहने उभी करण्यासाठी काही लोकं वापरतात. त्यांना कायद्याची भिती वाटत नाही. अशा वेळी अपघात होऊ शकतो. समाजाला सुधारण्याची जबाबदारी केवळ आपली एकट्याची नाही. आता आपल्याला इतरांच्या समस्यांपेक्षा आपली मनःशांती अधिक महत्वाची वाटते,याची जाणीव जागृती आपल्यात झाली पाहिजे.
आता आपण आजीआजोबा च्या भूमिकेत असून नातवंडे कसे आनंदी आणि सुसंस्कारित होतील याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याने कोणत्याही विषयावर बक्षीस मिळविले तर आपण त्याचे कौतुक केले पाहिजे.अशावेळी त्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.
आता आपल्या अंगावरील प्रेसचे कपडे महत्वाचे नाहीत. आपण आयुष्याच्या पुर्वार्धात जर चांगली कामगिरी केली असेल तर माणसं आपल्याला मानसन्मान देतात. लोकं आपल्याला अंतर्बाह्य ओळखतात. त्यांच्यासाठी आपला पेहराव महत्त्वाचा नाही तर चेहरा महत्वाचा आहे. समोरची व्यक्ती आपल्याला नमस्कार करत नाही तर आपल्या माणूसकीला नमस्कार करतात.
आपला अहंभाव ,आपली श्रीमंती, आपले उच्च शिक्षण आणि आपण भोगलेले उच्च पद आणि आपला स्वाभिमान आपल्या नात्याच्या आड येता कामा नये. हे सर्व गळून पडले तर नात्यागोत्याची मंडळी नक्कीच जवळ येऊन आपल्या वृद्धापकाळाची काठी होईल यात शंका नाही.आता वरिष्ठ नागरिकांनी हे ठरविले पाहिजे की मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न करेन. मला जे करावसं वाटत ते मी करेन. मात्र स्वछंदीपणे जीवन जगत असताना इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेईल असे ज्येष्ठांनी इतरांना आश्र्वासित केले पाहिजे.
आपले उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी, नातवंडांना सांभाळण्यासाठी आहे अशी जाणीव जागृती ज्येष्ठ नागरिकांमध्ये झाली पाहिजे.आपले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीसाठी आहे. स्वार्थी, मतलबी आणि पैशाची हाव असणाऱ्यांसाठी नाही. आपली मुलं आपल्या बरोबरीची आहे. त्यांनासुद्धा चांगले वाईट कळते. त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी टाकून आपण त्रयस्थपणे निरिक्षण करावे, आपलेच मत मुलांवर आणि सुनांवर लाधू नये असे मला वाटते.
# प्रा दिगंबर कानडजे
सागवन-बुलडाणा