नित्यानंद सेवा प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष : अनंत शेळके -----------------------------------------------------

 

नित्यानंद सेवा प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष : अनंत शेळके

      हरिभक्त परायण संत शुकदास महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेले बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम हे गाव. हिवरा आश्रम या गावाला संत शुकदास महाराज यांच्या कार्याने महाराष्ट्रभर लौकिक प्राप्त झाला आहे.

 सेवाभावीवृत्तीने काम करण्याचे बाळकडू संत शुकदास महाराजांकडून अनेक व्यक्तींना मिळाले आहे. त्यापैकी एक आहे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अनंत शेळके.

      या गावातील शिक्षक ज्यांच्या मनात सद्भाव आणि संवेदनशीलपणा, बेवारस आणि निराधार मुलांबद्दल कनवाळुपणा काठोकाठ भरलेला आहे, असा भला माणूस म्हणजे अनंत दामोदर शेळके. वडील दामोदर आणि आई समिंद्राबाई यांचे पोटी १२ डिसेंबर १९७७ रोजी त्यांचा जन्म झाला. प्रभाकर आणि प्रवीण हे दोन भाऊ आणि आईवडील एवढा त्यांचा मर्यादित कुटुंब विस्तार. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात त्यांचे बालपण गेले. जेमतेम परिस्थिती असल्यामुळे त्यांनी कष्ट करून एच.एस.सी.,डी.एड. शिक्षण पूर्ण केले. पुढे २००१ साली ते शिक्षणसेवक म्हणून जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. गुरू ब्रह्मचारी किशोर महाराज यांचेकडून त्यांना सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांना सामाजिक कार्यात रस निर्माण झाला.

      शिक्षकिपेशा असा आहे की अध्यापन कार्य करत असताना आपण अनेक समाजसुधारकांचे आणि संतांचे विचार स्वतः समजून घेऊन विद्यार्थ्यांना शिकवत असतो. यातून शिक्षक हा संवेदनशील आणि समाजशील बनतो. निराधार , निराश्रित, बेवारस आणि ज्यांचे आईवडिल हयात नाहीत अशी निरागस मुले त्यांच्या पाहण्यात आली. या मुलांना सांभाळावे का ? हा विचार त्यांच्या मनात आला. शेवटी मनानेच होकार दिला. सामाजिक कार्याची सुरुवात काही अनाथ मुलांचा स्वतःच्या घरात सांभाळ करुन केली. पुढे अशी १०-१२ मुले जमा झाल्यावर १५ मार्च २०१२ रोजी रामकृष्ण परमहंस यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी विवेकानंदनगर, हिवरा आश्रम येथे " नित्यानंद सेवा प्रकल्पाची " स्थापना केली. त्यांना या कामी घरच्या मंडळींनी मनापासून सहकार्य मिळाले. म्हणून ते अधिक जोमाने कामाला लागले.

    नित्यानंद सेवा संकल्प चालविणे ही एक तारेवरची कसरत होती. अनेक आर्थिक व प्रशासकीय अडचणी आल्यात. त्यावर त्यांनी मात करण्याचा प्रयत्न केला. आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी स्वतःच्या पगारावर कर्ज काढले. शिवाय समाजातील काही दानशूर लोकांच्या सहकार्यातून आर्थिक मदत झाली. दहा गुंठे जमीन खरेदी करून हा नित्यानंद सेवा संकल्प त्यात उभा राहिला. १४ वर्षांच्या या प्रदीर्घ वाटचालीत जवळपास ५० लक्ष रुपये भूखंड खरेदी आणि पहिल्या दोन मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी खर्च झाला. तसेच शहरी आणि ग्रामीण व्यक्तींकडून या निराधार मुलांसाठी अन्नधान्य ,किराणा व भेटवस्तू स्वयंस्फूर्तीने मिळत गेल्या.

        वंचित , बेसहारा आणि निराधार मुलांना शोधून त्यांचे भले कसे होईल, त्यांना माणूस म्हणून कसे सुसह्य जीवन जगता येईल, यासाठी शेळके सर सतत विचार करत असतात. अनाथ मुलांसाठी ते गेल्या २५ वर्षांपासून स्व-खर्चातून विवेकानंद नगर, हिवरा आश्रम येथे “ नित्यानंद सेवा प्रकल्प ” चालवत आहे. शासनाकडून त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मिळत नाही. शासकीय अनुदान मिळण्यासाठी ते सतत धडपडत असतात, पण त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही. आजमितीला विविध वयोगटातील ६० विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. तेथे सरांनी सर्वांसाठी मोफत शिक्षणाची व राहण्याची सोय केली आहे. ते या प्रकल्पामध्ये शिक्षणासोबतच साहित्य, कला, क्रीडा , तंत्रज्ञान आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण देतात. त्यामुळेच आज येथील मुले मेकॅनिक, मोबाईल दुरुस्ती, बँक कर्मचारी, डॉक्टर , पोलीस , गायन, वादन, लेखन,चित्रकला, अशा विविध क्षेत्रांमध्ये आनंदाने काम करत आहे, ही खरोखर या संस्थेची उपलब्धी आहे असे मला वाटते.

        इथला प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहीपर्यंत ते त्याची आस्थेने चौकशी करत राहतात. सर्व जबाबदारी ते उचलतात. ह्या सेवाव्रताचे रहस्य काय ? असा प्रश्न मी विचारला असता ते म्हणाले, " मला समाजकार्याची आवड आहे. ईश्वराने हे कार्य करण्याची मला संधी दिली आहे. जेव्हा मी एक भाकर कमावतो तेव्हा त्यातील आर्धी स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवतो आणि आर्धी भाकर नित्यानंद प्रकल्पासाठी वापरतो, यातून मला जो काही आनंद मिळतो तो माझ्यासाठी आत्मानंद आहे असून तो अवर्णनीय आहे." 

      नित्यानंद सेवा प्रकल्प सुरू तर केला, पण तो खर्चिक आणि जबाबदारीचा आहे हे त्यांच्या लक्षात आले. संकल्प करणे सोपा असतो , पण तो तडीस नेणे अवघड असते, याची त्यांना पदोपदी जाणीव होऊ लागली. कटेंगे लेकिन हटेंगे नहीं, या उक्तीप्रमाणे ते डगमगले नाहीत. संघर्षही वाढत गेला. कारण सामान्य परिस्थितीतून पुढे आल्यामुळे,स्वतःचे कुटुंब सांभाळून त्यांना निराधार मुलांचा दुसरा प्रपंच सांभाळणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे अनेक अडचणी व संघर्षाचा सामना ते गेल्या १५ वर्षापासून करत आहेत. अनेकांनी त्यांच्या कामाची निष्ठा आणि धडपड पाहता यथाशक्ती आर्थिक मदत केली आहे. तसेत अनेक दानशूर मंडळी मदत करत राहतात.

" आम्ही देतो आभाळ उडत्या पाखरांना..." असं ब्रीद वाक्य असणारा नित्यानंद सेवा प्रकल्प विवेकानंद नगर, हिवरा आश्रम येथे दिमाखात उभा आहे . 

      तुम्ही फक्त पैशाच्या मागे धावलात, तर कधीच खरी कमाई करू शकणार नाही. कारण एका मर्यादेनंतर पैसा केवळ एक आकडा उरतो. वास्तविक आपल्याला पुढे नेणारी गोष्ट पैसा नसून कामाप्रति असलेले वेड आणि प्रेम आहे. " या गोष्टींचे प्रतिबिंब मला अनंत शेळके सरांच्या मनात दिसते. खरंतर " नित्यानंद सेवा प्रकल्प " हा प्रकल्प नसून निराश्रितांसाठी एक हक्काचे व मायेचे माहेरघर आहे. संस्थापक अध्यक्ष अनंत शेळके हे या निराधारांचे आधार ,पालक आहेत. 

       शेळके सर अध्यापन, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, पर्यावरण संरक्षण, व्यसनमुक्ती,संस्कार शिबिरे, धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात नेहमी ते अग्रेसर असतात. पैसा हे माणसांच्या जगण्याचे एकमेव साधन नसून आनंद आणि समाधान हे पैशाच्या पलीकडे आहे,असे मत त्यांनी मजजवळ व्यक्त केले. ते एक संवेदनशील, समाजशील , उपक्रमशील असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. 

# प्रा दिगंबर कानडजे, सागवन-बुलढाणा . 



Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत