सखाराम नारायण नवले - एक समाजशील माजी सैनिक

      सखाराम नारायण नवले - एक समाजशील माजी सैनिक 

---------------------------------------------------------------

         विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या डोलखेड बु|| या आडवळणी गावी २५ ऑक्टोबर १९४४ रोजी एका सामान्य गरीब व भूमीहीन कुटुंबात सखाराम नारायण नवले यांचा जन्म झाला . जालना जिल्ह्यातील डोलखेडा बुद्रुक हे शेवटचे गाव असल्याने विकासाच्या दृष्टीने कोसो दूर होते. या गावातील सखाराम नारायण नवले हे साधे, सरळ आणि कष्टाळू माणूस. विदर्भातील मेरा फाट्याजवळ असलेले असोला हे त्यांचे मूळ गाव. मात्र त्यांना कळण्याआधीच त्यांचे आईवडील डोलखेड्याला स्थायिक झाले होते . काका आश्रुबा नवले हे मंगरूळ (ईसरूळ ) येथे घरजावई म्हणून राहायला गेले होते. साधारणपणे हा काळ स्वातंत्र्यापूर्वीचा होता. 

     वडील नारायण नवले आणि आई गंगुबाई ह्या निरक्षर असून साध्या भोळ्या आणि निगोतीने संसार करणाऱ्या होत्या. घर चालवणे हे फार कठीण असते , परंतु घरातील आई, वडील बहिण, भाऊ, काका, सुना या सर्वांनीच काम केले तर निश्चितच ते कुटुंब शून्यातून प्रगती करू शकते हे अनेकांनी सिद्ध करून दाखविले आहे. सखाराम नारायण नवले हे त्यापैकी एक कुटुंब आहे. यांनी शेतमजुरी आणि सालं महिने घालून त्यांच्या कुटुंबाला फार मोठा हातभार लावला होता. ते कुटुंबात मोठे होते. पुंडलिक, प्रकाश आणि मदनराव हे सख्खे भाऊ आणि सावत्राबाई व कांताबाई ह्या दोन बहिणी एवढा मोठा त्यांचा कुटुंबविस्तार..                

     1948 च्या दरम्यान गावामध्ये शिक्षणाची सोय नव्हती. शाळा देखील नव्हत्या. फार कमी ठिकाणी मोठ्या गावात जिल्हा परिषदची शाळा असायची. साहजिकच गरीब आणि सामान्य कुटुंबाला शिक्षण घेण्याची मुभा नव्हती आणि हे सामान्य नवले कुटुंब देखील शिक्षणाच्या भानगडीत पडत नव्हते. जिथे खाण्यापण्याची आणि राहण्याची व्यवस्था नव्हती, त्या ठिकाणी शिक्षणाचा विचार होणे देखील शक्य नव्हते.

     सखाराम नवले यांना सर्वप्रथम राहण्यासाठी घर नव्हते. शिवाय जमीन सुद्धा नव्हती. ते भूमिहीन आणि बेघर होते. अशा परिस्थितीत त्यांनी शिक्षणाचा विचार न करता केवळ आणि केवळ कुटुंबाचा विचार करून मोलमजुरी केली. सालं महिने धरले. जमीन नाही, राहायला घर नव्हते, शिक्षण नाही. अशा परिस्थितीत कष्ट करून त्यांनी पुढे शून्यातून प्रगती केली. त्यांनी आठ वर्ष गावातील तुकाराम मामांकडे सालगडी म्हणून काम केले. त्यावेळी सुरुवातीला केवळ दोन रुपये महिना होता. मात्र या दोन रुपयाचे मूल्य त्याकाळी फार मोठे होते. तसेच जानराव पाटील येथे ते जवळपास चार वर्षे सालदार म्हणून होते. सिपोरा अंभोरा येथील बाळा पाटील अंभोरे यांच्या शेतात बरेच वर्ष त्यांनी गहू सोंगण्याचे काम केले. ते काम पाहून त्यांना बाळा पाटलांनी चार धडे गहू कबूल करून सालगडी म्हणून कामावर ठेवून घेतले.  

      त्यांना शिक्षणाची संधी न मिळाल्यामुळे ते अडाणी राहिले परंतु त्यांना कष्टाची कामे करण्यात आणि विविध खेळ खेळण्यात खूप रस होता. ते कबड्डी, मल्लखांब, कुस्ती आणि झाडावर चढण्यात खूप तरबेज होते. त्यांनी बुलडाणा येथे १९६२ मध्ये कबड्डीचे नेतृत्व केले होते आणि त्यांना सातशे रुपये बक्षीस देखील मिळाले होते, हे विशेष. कबड्डी खेळत असताना पाठीला खूप मार लागल्यामुळे पाठ दुखत होती. गावातील नारायण सुळ यांच्या सुकन्या यमुना ऊर्फ मुक्ताबाई यांचेशी वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजे १९६१ मध्ये अत्यंत साध्या पद्धतीने त्यांचा विवाह झाला होता.

       रंगनाथ भांबळे ही या गावातील सैन्यात भरती झालेली पहिली व्यक्ती. त्यांनी सखाराम भाऊंना सैन्यात भरती होण्यासाठी मदत केली. त्यांच्यामुळे ते बुलडाणा येथे २४/१०/१९६२ रोजी सैन्यात भरती झाले. ट्रेनिंग पूर्ण करणे ही एक तारेवरची कसरत होती. सहा महिने बेळगावला ट्रेनिंग काढून ते काश्मीर येथे २० मराठा बटालियन मध्ये रूजू झाले. ९ वर्षे काश्मीरमध्ये , ४ वर्षं बाॅर्डरवर, आणि शेवटी पठाणकोट येथे ५ वर्षं नोकरी केली. त्यांचा दारूगोळा वापरण्यात आणि एटी वन हत्यार चालविण्यात चांगला हातखंडा होता.

       सैन्यात भरती झाल्यानंतर परिस्थिती हळूहळू सुधारली. कुटुंबातील व्यक्तींनी ढोरमेहनत केली. भरती झाल्यानंतर पहिला पगार निशाणी डावा अंगठा देऊन ६० रूपये घेतला. भरतीनंतर हळूहळू एकूण ३५ एकर जमीन झाली.बहिणभावांच्या लग्नांची जबाबदारी पार पाडली. कुटुंबातील सदस्यांना शिक्षण दिले. दरम्यान त्यांनी प्रकाशभाऊला भरतीसाठी सहकार्य केले. मुक्ताबाईला मुलंबाळं झाली नाही म्हणून दुसरे लग्न करावं,असा विचार गावातील कर्त्या पुरुषांनी मांडला. त्याला जवळपास १५ वर्षांनी त्यांनी होकार दिला. खोर भोकर येथील गंगाराम कराडे यांचे मुलींशी, रूखमाबाईशी १९७७ मध्ये सखाराम भाऊंनी पुन्हा लग्न केले. रूखमाबाई ह्या दहावी पास असल्यामुळे त्यांना गावात अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी मिळाली. आता रुखमाबाईला रवींद्र नावाचा एक मुलगा असून वंदना, नंदा, प्रतिभा ,सरला ह्या चार मुली आहेत. त्यांनी सर्वांना शिक्षण दिले. त्यांचे लग्नकार्य केले असून ते सुखी समाधानी आहे. 

      सखारामभाऊ सेवानिवृत्त झाल्यानंतर शांत बसले नाही. त्यांनी माजी सैनिकांच्या आरक्षणाचा फायदा घेऊन स्वस्त धान्य दुकान २३ जून १९८० रोजी मिळवून घेतले. समाजकारणात आणि राजकारणात आवडीने भाग घेतला. गावामध्ये १९८५ मध्ये शिवसेनेची शाखा स्थापन करून अध्यक्षपद भूषविले. त्यांना आश्रुबा काकांकडून भजन करण्याची आणि ऐकण्याची सवय लागली. ते भजन करू लागले. कीर्तनाला जाऊ लागले. प्रपंच आणि परमार्थ साधून नीटनेटका संसार केला. गावामध्ये श्री हनुमान संस्था स्थापन करून सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग घेतला. मात्र दोन विवाहामुळे त्यांना मुलांच्या नोकरीसाठी माजी सैनिकांचे आरक्षण घेता आले नाही.

      १९७१ च्या लढाईत प्रमोशन मिळाले असते, पण शिक्षण नसल्यामुळे त्यांना प्रमोशन मिळाले नाही. त्यांच्यासोबत दहावी झालेली मित्रमंडळी प्रमोशनमुळे पुढे गेली. आता त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळले होते. एकूण १८ वर्षं नोकरी करून ते सहीसलामत सेवानिवृत्त झाले. नाबाद राहून आपण जीवनाचा सामना जिंकला याचा त्यांना खूप आनंद झाला होता.. ग्रामीण भागात राहून ते एक सामान्य जीवन जगले. त्यांची राहणी साधी आणि सरळ होती आणि आजही ती तशीच आहे. दोन पत्नींचा संसार त्यांनी सांभाळला. दोन बायका आणि फजिती ऐका, असे मात्र त्यांच्या बाबतीत झालेले नाही. सर्वकाही सुखासमाधानाने पार पडले. आज त्यांचे वय जवळपास ८१ वर्षे असून त्यांची वाटचाल सहस्त्रचंद्र दर्शनाकडे होत आहे.

# प्रा दिगंबर कानडजे, सागवन-बुलढाणा. 





 






 




 




Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत