माझे बाबा - माझे प्रेरणा - एक पुस्तक परिक्षण

  पुस्तक परिक्षण :-

" माझे बाबा - माझी प्रेरणा " हा ग्रंथ म्हणजे संस्काररूपी मोत्यांची माळ .....

        प्रा. डी एस लहाने हे समाजातील एक लक्षवेधी नाव असून घटस्फोटिता, परित्यक्ता ,विधवा अशा महिलांच्या पुनर्विवाहांवर चिंतन करणारे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. यांनी समाजातील एकल महिलांसाठी पुनर्विवाह चळवळ हाती घेतली आणि या चळवळीला बरेच यश आले. त्यांनी आजपर्यंत जवळपास २०० पर्यंत एकल महिलांचे पुनर्विवाह लावून दिली आहेत. 

       सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे प्रा. डी एस लहाने यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकून साहित्य क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यांनी समाजात काम करत असताना कुटुंबाचा अभ्यास केला ज्या कुटुंबामध्ये संस्कारांचा भाग होता ते कुटुंब प्रगतीपथावर आहे हे त्यांच्या लक्षात आले. या मागचे त्यांनी कारण शोधले. त्यांना असे लक्षात आले की ज्या मुलांवर आई-वडिलांचे चांगले संस्कार होतात तेच कुटुंब समाजात पुढे चांगले तग धरून राहते. त्या कुटुंबातील मुलांचा चांगला विकास होतो. ते स्वतःच्या पायावर उभे राहून समाजात एक नावलौकिक मिळतात.

        प्रा. डी एस लहाने हे शिवशाही शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांना शैक्षणिक आणि समाजकार्याची विशेष आवड आहे. त्यांचे सहकार क्षेत्रात सुद्धा चांगले योगदान असून त्यांनी शिवशाही सहकारी पतसंस्थेचे जाळे विणले आहे. एकल महिला म्हणून जीवन जगणे आणि समाजाच्या पारंपारिक धारणांना झुगारून देणे हे विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटिता महिलांना सोपे नाही. ती एक तारेवरची कसरत असते. परंतु प्रा डी एस लहाने यांनी आजही कमी अधिक प्रमाणात अशा एकल महिलांना समर्थपणे साथ देऊन त्यांना जीवन जगण्यासाठी बळ दिले. जीवनात आधार निवडण्यासाठी नुसते समुपदेशन नाही तर त्यांना जीवनसाथी मिळवून दिला, खरोखर त्यांच्या या कार्याला सलाम.

   घराला घरपण देणं या जबाबदाऱ्या आजही बाईच्याचं मानल्या जातात. खरंतर त्या पेलणाऱ्या गृहिणींना मानवंदना देण्यासाठी आपलं मन बनलं पाहिजे. परंतु असे न होता त्यांना कमी लेखल्या जाते, हे विदारक सत्य आहे. लग्नासारख्या संस्थेत न अडकता केवळ स्वतःच्या हिंमतीवर आयुष्य जगणारी आणि कर्तृत्व गाजवणारी ती स्वावलंबी स्त्री आजही अनेक स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहे. जे जरी सत्य असलं तरी भविष्यात स्त्री जातीला आधार व्हावा म्हणून प्रा डी.एस.लहाने यांनी विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटिता महिलांना पुनर्विवाहासाठी जोखिम पत्करून मानसिकदृष्ट्या तयार केलं, नव्हे अनेक अशा महिलांचे विवाह लावून दिले. ही जी सामाजिक बांधिलकी सरांना मिळाली ती त्यांच्या बाबांकडून!

     प्रा. डी एस लहाने यांचे मूळ गाव मेहकर तालुक्यातील लव्हाळा. त्यांचे वडील काळ्या आईवर जिवापाड प्रेम करणारे कष्टाळू शेतकरी होते. बाबा श्रीराम त्र्यंबक लहाने यांच्या तालमीत सर लहानाचे मोठे झाले. बाबांनी त्यांच्यावर संस्कारांचे अनेक पैलू पाडले. यातूनच त्यांची जडणघडण होत गेली. त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक, सहकार आणि शैक्षणिक कार्यात त्यांच्या बाबांच्या संस्कारांचा मोलाचा वाटा आहे, बाबांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांनी बाबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याचा एक इवलासा प्रयत्न " माझी प्रेरणा..माझे बाबा " हे पुस्तक लिहून केला आहे .

          अंधश्रद्धा, भीती आणि गुलामगिरीत जगणाऱ्या समाजात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य कधीच नसते. ही शिकवण त्यांच्या बाबांची होती. प्रा डी एस लहाने अशा कडक शिस्तीच्या माणसांत वावरले. कुटुंब संस्था,शिक्षण संस्था, धार्मिक संस्था आणि मित्रमंडळ अशा अनेक संस्थांकडून व्यक्तींवर संस्कार होत असतात. यापैकी प्रभावी संस्कार करणारं सर्वांत महत्त्वाचे केंद्र म्हणजे कुटुंब संस्था. प्रा डी एस लहाने हे खरोखर भाग्यवान म्हणावे लागेल की जे बाबांच्या तालमीत तयार झाले. त्यांच्या एकूण सर्वांगीण विकासात मोठे योगदान जर कोणाचे असेल , तर ते त्यांच्या श्रीराम बाबांचे‌ आहे हे मला त्यांचे पुस्तक वाचून कळले. या सर्व ऋणातून अंशतः मुक्त होण्यासाठी त्यांनी " माझे बाबा.. माझी प्रेरणा " हे पुस्तक लिहून बाबांच्या चरणी अर्पण केले आहे. 

        एका भारावलेल्या अवस्थेतून आकारास आलेली ही एक आगळीवेगळी कलाकृती आहे. भारावलेपणा आणि प्रेरणाच्या खुणा याची छान गुंफण आपल्याला ठीक ठिकाणी त्यांच्या लेखनात बघायला मिळते. सरांनी जे भोगलं, अनुभवलं ते वाचकांसाठी मनात संकोच न ठेवता उभं केले आहे, हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे. या पुस्तकाचे प्रकाशन प्रा.रवींद्र साळवे यांनी केलेले असून अक्षर जुळवणी आणि तपासणी सौ. दिपाली पाटील - इंगळे यांनी केली आहे.

     राजहंसाचे चालणे l भूतळी जालिया शाहणे l 

     आणखी काय कोणे चालौची नये ?

असा असावा संत ज्ञानेश्वर महाराजांनी विचारला आहे तोच नम्रभाव, तोच प्रामाणिकपणा प्रस्तुत लेखकाचा हे पुस्तक लिहिण्यामागे आहे, असे मला वाटते. इतर पारंगत मोठे दिग्गज लेखक आहेत, म्हणून आपण देखील इवलासा प्रयत्न का करू नये, या हेतूने प्रेरित होऊन प्रा. डी एस लहाने यांनी हा ग्रंथ लिहिला असावा असे मला वाटते.

     

        या पुस्तकाची एकूण पृष्ठसंख्या एकूण ६४ असून त्याची बांधणी, सजावट, आकर्षक आणि प्रभावी आहे. या पुस्तकात एकूण १७ भाग असून प्रत्येक भाग हा वैशिष्ट्यपूर्ण आणि परिपक्व अनुभवांचा एकेक पैलू आहे. माझे वडील (बाबा), मी वर्गात पहिला आलो, बाबांनी बिडी पिणे सोडले, चोरी करायची नाही, प्रशंसा करणाऱ्यांपासून सावधान, कुटुंबातील पैसा हा सर्वांचाच, आपली कमाई कुटुंबाची असते, घर जोडले पाहिजे - तोडू नये, बाबांनी जोपासली व्यावसायिकवृत्ती, आमच्या यशाची सुरुवात, लैंगिक विषयाची शिकवण, धुऱ्यावरून भांडण करू नये, शिक्षकांचा आदर केला पाहिजे, मायची आठवण, माझी मोठी आई, बाबांची अंतिम इच्छा, पित्याचं छत्र हरवलं असे एकूण १७ भाग असून ते वाचनीय आहे. सरांसाठी ही एक संस्काररूपी सतरा मोत्यांची माळ त्यांच्या बाबांनी तयार करून ती सरांच्या गळ्यात घातली आहे, असे मला वाटते. ही संस्कारांची शिदोरी सरांसाठी त्यांच्या जीवनप्रवासासाठी ती एक जिवनदायिनी ठरली.

   " कामाची सतत धावपळ आणि कुटुंबाचा संसारगाडा ओढताना स्वतःचे काही वेगळे अस्तित्व असावे, असे उत्स्फूर्तपणे जगणे त्यांच्या वाट्याला कधीच आले नाही. परंतु बाबांनी दिलेल्या शिकवणीमुळे आणि संस्कारामुळे आम्ही स्वतःला सिद्ध केले, मात्र या सर्वांमागे बाबाचीच प्रेरणा होती." असे भावोद्गार त्यांनी मजजवळ काढले. मुलगा चुलीतून बिडी पेटवून आणताना ती विझू नये म्हणून स्वतः बिडीचा झुरका मारतो , हे त्यांच्या वडिलांच्या लक्षात आल्यावर वडिलांनी कायमची बिडी पिणे सोडून दिली. त्यांचे वडील व्यवहारी होते, हे खालील प्रसंगावरून सहज लक्षात येते. छोटा भाऊ शिक्षक केला, एक उत्कृष्ट शेतकरी केला आणि सरांना देखील शिक्षक केले. नोकरीवाली मुलगी सून म्हणून घरात आणली तर कुटुंबाला आर्थिक कारभार लागतो, हे लक्षात घेऊन त्यांनी हुंड्याची अपेक्षा ठेवली नाही. गरिबी आली तर लाजू नये व श्रीमंती आली तर माजू नये अशी विचारसरणी त्यांच्या बाबांची होती.

      जीवनात शून्यातून विश्व निर्माण करत असताना सामान्य माणसांशी जोडलेली नाळ त्यांनी कधी तोडली नाही. बाबा नेहमी म्हणायचे, एक वेळ श्रीमंत व्यक्तीकडे दुर्लक्ष केले तरी चालेल, पण गरिबांना अंतर देऊ नये, श्रीमंताची पुरणपोळी खाऊ नये पण गरिबां घरची चटणी भाकर खाऊन त्यांचा आनंद द्विगुणित करावा असे विचार बाबांनी लहाने सरांच्या जीवनात पेरले. तेच सुविचार सरांच्या आयुष्यात उपयोगी पडले आहे. असे अनेक मौलिक सुविचार सरांच्या बाबांनी एक प्रातिनिधिक स्वरूपात सरांच्या जीवनात नव्हे एकूणच त्यांच्या कुटुंबात रूजविले. ती आयुष्याची शिदोरी सरांना आजपावेतो पुरते आहे. .

     सरांनी लिहिलेल्या पुस्तकातील प्रत्येक भागात बाबांनी सांगितलेले आणि सरांनी प्रत्यक्ष अनुभवलेले संघर्षमय प्रसंग आपल्याला पुस्तकातून वाचायला मिळतील, वाचकांनी निश्चितच या पुस्तकातील अनुभवांचा आस्वाद घ्यावा आणि प्रत्यक्ष जीवनात त्यातील काही नैतिक मूल्यांची शिदोरी सेवन करावी असे मला वाटते.

# प्रा दिगंबर कानडजे,  सागवन- बुलढाणा. 

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत