कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा संदेश
- कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा संदेश -
महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेलेत. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावता माळी, संत मुक्ताबाई , संत कान्होपात्रा, संत जनाबाई, अशा अनेक महान संतांनी समाजाला परमार्थ आणि भक्तीचा मार्ग दाखविला . या संतांनी अभंग रचना करून ओवी ,भारुडे , श्लोक आणि कीर्तन -प्रवचन या माध्यमांद्वारे करून समाज प्रबोधन केले. आधुनिक काळातील क्रांतिकारी संत म्हणून ज्यांचा नामोल्लेख करता येईल असे कर्मयोगी संत गाडगेबाबा हे होत. संत गाडगेबाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील सेनगाव या गावी धोबी या समाजात झाला. २३ फेब्रुवारी१८७६ रोजी झाला. झिंगराजी व सखुबाई यांचे पोटी डेबुजी हे रत्न जन्माला आले. संत गाडगेबाबांचे डेबुजी झिंगराजी जानोरकर हे खरे नाव असून ते गाडगेबाबा या नावाने अल्पावधीत कीर्तनकार म्हणून सर्वत्र लोकप्रिय झाले .
" सिंहाला पहावे वनात !
हत्तीला पहावे रानात !
आणि बाबांना पहावे कीर्तनात !! "
संत गाडगेबाबा या कीर्तनकाराचा प्रत्येक शब्द हा जादूचा शब्द म्हणून ओळखल्या जाऊ लागला . दलित, शोषित आणि विशेष करून रंजल्या गांजल्यांची ते " बाबा " होते. या सर्वांच्या उद्धारासाठी संत गाडगेबाबा रात्रंदिवस झटले. गाडगे बाबांचा विवाह कुंताबाई यांचेशी झाला . संसारात यातना खूप असून, संसार सुख नाही याची जाणीव त्यांना झाली . समाज हेच विश्व कुटुंब मानून या समाजाच्या कल्याणासाठी सर्व आयुष्य खर्ची घालायचे असा दृढ संकल्प त्यांनी सोडला .
वऱ्हाडातील एक आधुनिक पद्धतीने दर्जेदार कीर्तन करणारा एक आधुनिक कीर्तनकार म्हणून ते सर्व दूर ओळखल्या जाऊ लागले. शिक्षणाच्या नावाने ते शून्य होते. परंतु त्यांची निरीक्षण शक्ती अफाट होती. त्यांची कीर्तन करण्याची पद्धती अत्यंत प्रभावी होती. वऱ्हाडी बोली भाषेत बोलून ते खेडूतांच्या मनात थेट प्रवेश करीत असत. अत्यंत सोप्या भाषेत ते व्यवहारातील दृष्टांत - दाखले देऊन कीर्तन सोपे करून सांगत असे .
संत गाडगेबाबा यांचा वेष अतिशय साधा होता. त्यांच्याजवळ फक्त एकतारी असायची. सोबत एक घाडगे आणि एक काठी असायची. ज्या गावात ते जात असत तेथे स्वतः जागा साफ करून कीर्तनासाठी एक स्वच्छ परिसर तयार करून घेत असत. शिवाय ते कोणाकडूनही फुकट काही घेत नसे . लोकांची कामे करून ते स्वतः जेवण स्वीकारत असे. प्रसंगी त्यांनी लाकडे फोडून एक भाकर आणि तांब्यावर भाजी घेतली. मात्र कोणाकडूनही फुकट काही खाल्ले नाही,एवढे ते स्वाभिमानी होते. संत गाडगेबाबांची जनसेवेची तळमळ व निष्पृहता वाखाणण्याजोगी होती. बहुधा ते पायी हिंडत असे. जिथे रेल्वे होती तेथे ते शौचालयाजवळ बसून प्रवास करीत असत. कोणालाही त्रास होणार नाही याची ते जातीने काळजी घेत असे.
कीर्तनाच्या मोबदल्यात त्यांनी समाजाकडून एक पैसा देखील स्वीकारला नाही किंवा अपेक्षा ठेवली नाही. मात्र लोकवर्गणीतून मुलांसाठी वसतिगृहे काढली. लोकांची राहण्यासाठी धर्मशाळा बांधल्या. मात्र आजकालचे संत महंत, किर्तनकार आलिशान गाडीतून प्रवास करतात. कीर्तनासाठी लाखो रुपयांचे मंडप तयार करण्यास भाग पाडतात. शिवाय लाख रुपये देणगी घेतल्याशिवाय किर्तन करीत नाही, किती हे भयावह आहे! आधुनिक संतांनी ,संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज ,संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांचे आदर्श का घेऊ नयेत ?
" शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही " ही गोष्ट संत गाडगे बाबांच्या लक्षात आली होती . लोकशाहीच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडसर म्हणजे अज्ञान, अंधश्रद्धा आणि निरक्षरता होय. निरक्षरतेमुळे ग्रामीण भागात गरिबी मोठ्या प्रमाणात आहे. व्यसनाधीनता हा समाजाला लागलेला कलंक आहे. कर्ज, दारू, नवस, हुंडा, विकृत राजकारण, वैमनस्यता आणि फाजील पुरुषी अहंकार इत्यादी कारणांमुळे माणुसकीचा रास होत असून मानवी जीवनमूल्ये रसातळाला जात आहे . भौतिक प्रगती किती झाली असली तरी मानसिक आणि आत्मिक समाधान मानवाला मिळणे दुरापास्त झाले आहे. सुखी जीवन जर मानवाला प्राप्त करून घ्यायचे असेल तर आजही संत गाडगेबाबांचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्ज काढून देवाची यात्रा करू नका. गायी बैलांची चिंता वाहत जा. मुलांना शिकविल्याविना राहू नका. आई-बाबांची सेवा करा. देवाला नवस करून कोंबडी बकरी कापू नका. कर्ज काढून दिवस वारे (तेरवी ) करू नका . भुकेलेल्यांना अन्न द्या. हुंडा देऊन घेऊन लग्न करू नका. शिवाशिव पाळू नका. दारू पिऊ नका. आणि आत्मशक्तीसाठी फावल्या वेळेत भजन- कीर्तन केल्याशिवाय राहू नका.
आज त्यांचे नावे अमरावती येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आहे . अमरावती विद्यापीठाला आज फार महत्त्व आले आहे. अमरावती विद्यापीठात आज हजारो प्राध्यापक नोकरी करत आहे. संत गाडगेबाबांनी कुठल्याही पदव्या न घेता लोकशिक्षक, समाज शिक्षक म्हणून अहर्निश जनतेला कीर्तनाच्या रूपाने व्याख्याने दिली आहेत. आपला समाज सुसंस्कृत ,साक्षर आणि अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा या विळख्यातून मुक्त व्हावा ही त्यांची तळमळ होती. संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतीची सामाजिक बांधिलकी समजून आजच्या शिक्षकाने गाडगे बाबांची जनसेवा आणि निष्पृहता अंगिकारणे ही आजची गरज आहे असे मला वाटते.
महाराष्ट्र शासनाने देखील संत गाडगेबाबा " ग्राम स्वच्छता अभियान " ही मोहीम अतिशय प्रभावीपणे राबविण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे.सध्याही ही सार्वत्रिक सार्वजनिक स्वच्छता अभियान सतत राबवित राहण्याची नितांत गरज आहे. मात्र हे सतीचे वाण समजून हा वसा प्रत्येकाने घेतला पाहिजे असे मला वाटते. या कामी सर्व कर्मचाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी , ग्रामपंचायतींनी मनापासून सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. " नाही निर्मळ मन! काय करील साबण!!" या म्हणीप्रमाणे मन परिवर्तन होणे ही काळाची गरज आहे . केवळ गाव स्वच्छ आणि हागणदारी मुक्त करून चालणार नाही तर माणसांची अंतर्मनेही स्वच्छ होणे काळाची गरज आहे असे मला वाटते . 20 डिसेंबर 1956 रोजी हा महान संत कर्मयोगी गाडगेबाबा अनंतात विलीन झाला . त्यांच्या या पावन स्मृतीस माझे विनम्र अभिवादन !
# प्रा दिगंबर माणिकराव कानडजे,
मधुकोष निवास, सागवन- बुलडाणा
(मोबाईल - ८२७५२३१८७४)