विज्ञानोपासक, रविकुमार घुसळकर

    विज्ञानोपासक, रविकुमार घुसळकर - एक उत्तम विज्ञान शिक्षक

  ----------------------------------------------------------------------- 

    बुलढाणा जिल्ह्यातील हातेडी बुद्रुक येथे रविकुमार देविदास घुसळकर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1967 रोजी झाला.आई कुसुमबाई ही शिकलेली असून त्या नांदुरा येथील मालवणकर सोने-चांदी व्यापाऱ्यांच्या सुकन्या होत्या. वडील देविदासराव घुसळकर हे मुळचे हातेडी बु|| येथील.त्या काळी सातवा वर्ग पास असलेली माणसं शिक्षक म्हणून सहज नोकरीला लागत होते. तेव्हा सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या मुलामुलींना शिक्षण मिळणे अवघड होते.आईवडील दोघेही आधी शिक्षक आणि पुढे मुख्याध्यापक होऊन सेवानिवृत्त झाले. त्यांची नोकरी त्याकाळी हातेडी बुद्रुक, केसापूर, आंभोडा, चांडोळ, सागवन याच परिसरात गेली. आईवडील नोकरीवर असल्यामुळे साहजिकच रविकुमार यांना शिक्षण घेण्याची आपसूकच संधी चालून आली.सरांनी प्राथमिक शिक्षण हातेडी बुद्रुक येथे आणि सातवीपर्यंतचे शिक्षण केसापूर येथे ५ किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन पूर्ण करावे लागले.

        पुन्हा श्री शिवाजी हायस्कूल हातेडी बुद्रुक येथे येऊन त्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करावे लागले. त्यांना भुगोल आणि विज्ञान विषयात विशेष गोडी होती.रविकुमार घुसळकर यांनी ११ वी-१२ वीचे शिक्षण वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे मावशीच्या घरी पूर्ण केले. रविकुमार घुसळकर यांची शिकण्याची जिद्द,ओढ,चिकाटी आणि हुशारी लक्षात घेता वडिलांनी त्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी दिली. सर बुलढाणा येथील जिजामाता महाविद्यालयात 1992 मध्ये बीएस्सी झाले. सरांना महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच प्रयोगशाळेसंबंधी विशेष आकर्षण होते. नवनवीन प्रयोग करीत राहणे, हा त्यांचा आवडता छंद होता. कशात काय टाकल्याने काय होऊ शकते याचे कुतूहल त्यांना प्रयोगशाळेत प्रयोग करत असताना वाटले.साहजिकच यातून त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला.

     रविकुमार हे ज्येष्ठ चिरंजीव असून ते बीएससी (विज्ञान)बीएड असल्याने त्यांना 1993 मध्ये श्री संभाजीराजे विद्यालय डोंगरखंडाळा येथे विज्ञान शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. डोंगरखंडाळा येथे विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांना विज्ञान विषयात विशेषकरून गोडी लागली. श्री संभाजीराजे विद्यालय हे पहिल्यापासून कडक शिस्तीचे आणि ग्रामीण भागातील एक चांगले नावाजलेले विद्यालय होते आणि आजही त्या शाळेचा नावलौकिक टिकून आहे. त्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा कुसळकर सरांनी सातत्याने प्रयत्न केला.अध्यापनाचे कार्य करीत असताना त्यांनी बुलढाणा तालुका विज्ञान शिक्षक संघटनेमध्ये आठ वर्ष काम केले. संघटनेच्या माध्यमातून अनेक वैज्ञानिक उपक्रम राबविण्यात राबविले. तसेच पाच वर्ष घुसळकर सर जिल्हा विज्ञान शिक्षक संघटनेमध्ये उपाध्यक्ष होते. तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांना अनेक विद्यार्थी सहभागी करता आले.अनेकांना नंबर देखील मिळाले. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये अनेक बदल घडवून आणण्यासाठी सरांनी विशेष परिश्रम घेतले आहे. तत्कालीन माजी शिक्षणाधिकारी रवींद्र भिसे म्हणाले होते की घुसळकर सरांचा विज्ञान प्रदर्शनीमध्ये विशेष बदल घडवून आणण्यात आणि प्रत्येक प्रदर्शनी यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा होता.

     पुढे सरांचा वैज्ञानिक प्रगतीचा आलेख अधिक उंचावत गेला. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेची धुरा सन 1993 ते 2010 पर्यंत समर्थपणे सांभाळली.जिल्हा समन्वयक पदावर रवी घुसळकर यांनी दहा वर्षे काम केले.त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यामधील अनेक शाळेतील बालवैज्ञानिक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकले.  एखाद्या विषयावर संशोधन करणे, निष्कर्ष काढणे आणि पोस्टर्स तयार करणे हे आव्हानात्मक काम होते.

     विज्ञान उपकरण तयार करणे, विज्ञान शिक्षकांसाठी कार्यशाळा घेणे, बाल विज्ञान परिषदेच्या कार्यशाळा घेणे, जिल्हास्तरीय बाल विज्ञान परिषद घेणे, विपनेटच्या कार्यशाळा घेणे, विज्ञान भाषण स्पर्धा, विज्ञान नाटिका, विज्ञान प्रश्नमंजुषा, डॉ.होमीभाभा विज्ञान केंद्राच्या परीक्षा, एड्स मार्गदर्शन, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, महिलांसाठी संगणक कार्यशाळा, खगोलीय कार्यशाळा, पर्यावरण कार्यशाळा, पर्यावरणीय पोस्टर्स प्रदर्शनी इत्यादी कार्यक्रम मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह झाल्यावर सरांनी अथक परिश्रम घेऊन राबविले. या कामी संभाजी राजे विद्यालयातील मुख्याध्यापक सर्वश्री आर.एल. शेळके,आर.एच.कानोडजे, के.एस.बोरे,डी.डी.पालवे ,रवींद्र बरडे व्ही.एस. बोरे आणि विद्यमान मुख्याध्यापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.'विज्ञान संशोधनाकडे वळा' या विषयावर सरांनी अनेक भाषणांचे आयोजन केले होते.माजी शिक्षणाधिकारी आर.आर.भिसे हे रविकुमार घुसळकर यांना 'Ghusalkar sir is one man science industry.' असे आवर्जून म्हणायचे.

     विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये काम करत असताना विलास देशमुख, गजानन पवार, विष्णू धंदर, अरविंद कुळकर्णी, बी.एस‌.बारोटे, विलास गवते,राजेंद्र गाढे,अनिल देवकर,चंद्रकांत मानतकर असे अनेक चांगले विज्ञान शिक्षक जोडल्या गेले.या विज्ञान परिषदेच्या निमित्ताने डॉ.एपीजे अब्दुल कलाम, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. गोविंद स्वरूप भटनागर, डॉ. जेष्ठराज जोशी, डॉ.अनिल काकोडकर अशा नामवंत शास्त्रज्ञांना भेटण्याचा योग आला. सरांना अखिल भारतीय विज्ञान अधिवेशनानिमित्त नागपूर, मुंबई, बारामती, कोल्हापूर, चाळीसगाव, अशा ठिकाणी उपस्थित राहता आले. तसेच 2010 मध्ये डॉक्टर सुधाकर आगरकर यांच्या सहकार्याने सिंगापूर सायन्स सेंटरला भेट देणारे बुलढाणा जिल्ह्यातील रविकुमार घुसळकर हे एकमेव विज्ञान शिक्षक होते. विज्ञान शिक्षक म्हणून काम करत असल्यामुळे त्यांना रमन विज्ञान केंद्र नागपूर, कल्पना चावला विज्ञान केंद्र सातारा, नेहरू तारांगण मुंबई, विज्ञान केंद्र चिंचवड अशा ठिकाणी भेटी देऊन अभ्यास करता आला. तसेच राज्यस्तरीय भौतिक शास्त्राची कार्यशाळा आणि गणिताची कार्यशाळा सरांनी आयोजित करून इतर सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वी करून दाखविली.

     वैज्ञानिक उपक्रम राबविण्यासाठी घुसळकर सरांना श्री संभाजीराजे शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी आणि सचिव आदरणीय दलितमित्र शेषराव सावळे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले असे रविकुमार घुसळकर सांगतात.संयम,शांतता,परोपकार, निगर्वीपणा,विनम्रता आणि समाजशीलता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास पैलू आहेत.

# प्रा. डी.एम.कानडजे 

   सागवन-बुलडाणा 

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत