शूर लढवय्या सरदार : शिवाजीराव इंगळे


 शूर लढवय्या सरदार : शिवाजीराव इंगळे

      शहाजीराजे भोसले यांच्या दरबारात आणि पुढे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात करवंडच्या इंगळे घराण्याचा सहभाग होता असे इतिहासातून लक्षात येते. तेथे लढवय्येवृतीचे अनेक सरदार होते, ज्यांनी रणांगण गाजवून शाबासकी मिळवली होती. शिवाजीराव इंगळे,बहीरजी नाईक इंगळे,कात्याजी इंगळे अशी नावे आपल्याला सांगता येईल.या सर्वांचा शिवरायांच्या मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजलखान भेटीत प्रतापगडाच्या रणांगणावर, इंगळे सरदारांनी खूप जोखमीचे काम केले होते. त्यापैकी एक होते इंगळे घराण्यातील सुभेदार शिवाजीराव इंगळे. ते मराठा साम्राज्यातील एक शूरवीर सरदार होते. त्यांचा आदिलशाही दरबारात रूबाब होता. त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमेत मनापासून सहभाग होता. त्यांना गुणवंता नावाची एक कन्या होती. जी छत्रपती शिवाजी महाराजांची सातवी धर्मपत्नी होती. जिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी १५ एप्रील १६५७ रोजी झाला होता. सरदार शिवाजीराव इंगळे हे शहाजीराजे भोसले यांच्यासोबत राहून त्यांनी स्वराज्यासाठी तलवार गाजवली होती. राजकवी परमानंद यांनी सरदार शिवाजीराव इंगळे यांचे वर्णन ' रणांगणावर आलेल्या यमदेवतेच्या भाल्याचे टोक ' असे केले होते. 

      राजकीय,सामाजिक आणि लष्करी क्षेत्रात इंगळे घराण्याचे प्रभावी असे काम होते. या घराण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमीच स्वराज्यस्थापनेच्या बाजूने होते. आदिलशाही दरबारात असतानाही देखील त्यांनी शहाजीराजे भोसले यांचेशी गद्दारी केली नाही. ते सदैव एकनिष्ठ ,स्वामीनिष्ठ आणि प्रामाणिक राहिले. पुढे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या ध्येयासाठी एका हातावर भाकरी आणि दुसऱ्या हातावर तलवार घेऊन घोडेस्वार झाले. ते जिवाची पर्वा न करता लढले. शहाजीराजे भोसले हे आदिलशाही दरबारात एक शूरवीर, मातब्बर असे सरदार होते. त्यांनी आपले जवळचे खास असे अनेक विश्वासू साथीदार अनेक ठिकाणी विविध पदावर नियुक्त केले होते. करवंडचे शिवाजीराव इंगळे हे शहाजीराजांचे अगदी जवळचे एकनिष्ठ असे सरदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत त्यांनी तलवार गाजविली. त्यांच्या निष्ठेचा गौरव म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या गुणवंताबाई नावाच्या मुलीशी विवाह केला होता. ही नाती केवळ कौटुंबिक नव्हती, तर त्यातून एक राजकीय व सामाजिक मैत्री निर्माण झाली होती, त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र व विदर्भ या दोन भागांतील मराठा शक्ती या निमित्ताने एकवटली होती.

     गढी हे केवळ निवासस्थान नव्हते तर ते एक सैनिकी ठाणे होते. येथून मराठा फौजा विदर्भातील मोहिमांवर तयारीनिशी बाहेर पडत असे. जेव्हा शिवाजी महाराज स्वतः दक्षिणेतून मोहिमेसाठी निघत होते, तेव्हा ते या भागातील इंगळे सरदारांना माहिती देत होते. इंगळे घराणे हे जरी मुळचे करवंड येथील असले तरी त्यांचे कार्य सर्वदूर होते. दक्षिण भारतात तंजावर व मदुराई परिसरात, उत्तर भारतात ग्वाल्हेर व उज्जैन, महाराष्ट्रात चिखली तालुक्यातील करवंड ,शेलसुर ,धोत्रा भणगोजी,खामगाव तालुक्यातील राहुळ, पिंपरी देशमुख, सुजातपुर, हिवरा, निमगाव आणि जाफराबाद तालुक्यातील आसई या गावांमध्ये इंगळे घराणे वास्तव्यास आहेत. तसेच अमरावती–अकोला भागात, पुणे परिसरातील म्हाळुंगे, निळंज, वाळुंज आणि कोल्हापूर भागात सुद्धा या घराण्याच्या शाखा असून शिक्षण, शेती, उद्योग, समाजसेवा या विविध क्षेत्रांत त्यांनी काम केले. त्यांना अनेक ठिकाणी देशमुख, पाटील, सरदार अशा हुद्द्यांवर नेमण्यात आले होते. त्यांनी स्थानिक पातळीवर न्यायनिवाडा, जमीन मोजणी, महसूल जमा करणे, आणि प्रजेचे संरक्षण करणे या जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे सांभाळल्यात. तेव्हा त्यांना “जंगबहाद्दूर” ही पदवी केवळ पराक्रमासाठी नव्हे तर धैर्य, प्रामाणिकपणा आणि नेतृत्वासाठी दिली गेली होती.

      त्या काळात त्यांच्या स्त्रिया केवळ घरापुरत्या मर्यादित नव्हत्या. तर त्या राजकीय, सामाजिक आणि स्वराज्याच्या कामात अग्रेसर होत्या. त्यांची धैर्यशीलवृत्ती, त्यांचे संस्कार आणि त्यांचा स्वाभिमान इंगळे घराण्यासाठी भूषणावह होता. इंगळे घराण्याचे वारस राजे हरीरुद्र इंगळे महाराज जे यापूर्वी तंजावरला स्थायिक झालेले होते. ते आज करवंड या आपल्या मूळ गावी राहायला येऊन आपला इंगळे घराण्याचा वारसा पुढे चालवीत आहे. जेव्हा वऱ्हाडातील काही विश्वासू मंडळी लखुजीराव राजे जाधवांनी राजमाता जिजाऊ व शहाजी राजे भोसले यांच्या विवाहानंतर सोबत पाठविली होती. त्यात करवंड येथील सरदार शिवाजीराव इंगळे आणि त्यांच्या भावबंधातील काही महत्त्वाची इंगळे मंडळी याचा सहभाग होता.पुढे ही मंडळी विशाळगड , महाळुंगे आणि खडदबेलसर येथे स्थायिक झाली होती. त्यांनी आदिलशाहीत शहाजीराजांसोबत सैनिक म्हणून प्रामाणिकपणे काम केले.

      आदिलशहाने मुस्तफाखानाच्या मार्फत कपटी डाव टाकुन शहाजीराजे भोसले यांना अटक करुन डांबुन ठेवले आणि महाराष्ट्रात स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी फतेहखानाला पाठविले. तेव्हा या मोहिमेत शिवाजीराजांसोबत सरदार शिवाजीराव इंगळे देखील होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ ऑगस्ट १६४८ रोजी स्वराज्याची पहिली लढाई पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खळद आणि बेलसर येथे लढली. या लढाईत सरदार शिवाजीराव इंगळे यांचा सिंहाचा वाटा होता. ही लढाई सरदार शिवाजीराव इंगळे यांनी जिंकून दाखविली,परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या लढाईत त्यांना वीरमरण आले. शिवाजी महाराजांनी पुरंदर तालुक्यातील वाळूज येथे सुभेदार शिवाजीराव इंगळे यांची समाधी स्वतः बांधलेली आहे. 

     तेव्हा सिंदखेडराजा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ जसे नावारूपाला आले, तसेच बावन्न बुरजी करवंड छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी म्हणून लोकप्रिय व्हायला हवी. गुणवंताबाई राणीसाहेबांचे कायम स्मरण व्हावे,त्यासाठी गावकरी आणि कृती समिती १५ एप्रील रोजी होऊ घातलेल्या महोत्सवाची जय्यत तयारी करित आहे.

 

# प्रा दिगंबर कानडजे,

सागवन-बुलढाणा (८२७५२३१८७४)

               


Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत