मराठी भाषेविषयी असलेला विद्यार्थ्यांचा गैरसमज :-

     मराठी भाषा ही आपली मातृभषा असून ती सहज अवगत होणारी  सोपी भाषा आहे असे मराठी भाषा बोलणाऱ्यांना वाटते. विज्ञान शाखेचे विद्यार्थी तर मराठी विषयाला अगदी दुय्यम समजतात. मराठी विषय अभ्यास करण्याचा विषय नाही असा त्यांचा गैरसमज झाला आहे. पण विद्यार्थी मित्रहो हे साफ चुकीचे आहे.एक वेळ इंग्रजी,हिंदी सहज समजून जाईल,पण मराठी भाषा हा विषय आकलनासाठी,संभाषणासाठी,भाषणासाठी,लेखनासाठी , मुलाखतीसाठी आणि संवादासाठी सोपा नाही.मराठी विषयाची खूप तयारी करावी लागते आणि म्हणून मला सांगायचे आहे की विद्यार्थी मित्रहो मराठी विषयाचा चांगला अभ्यास करून गुणात्मक निकाल सुधारण्यासाठी चांगले प्रयत्न करणे ही काळाची नितांत गरज आहे. पुढे स्पर्धा परीक्षेसाठी सुध्दा मराठी विषय खूप उपयुक्त आहे.

   ‌          मराठी भाषा आपली जरी मातृभाषा असली तरी लेखन करणे आणि व्यासपीठावर भाषण करणे सोपे नाही.शक्यतोवर प्राकृत भाषेमध्ये स्वच्छ हस्ताक्षरात शुध्दलेखन करावे.त्यासाठी खूप वाचन लेखन करणे आवश्यक असते. लेखन विभागात उताऱ्याचे आकलन आणि सारांशलेखन ,पत्र लेखन आणि निबंध लेखन असे प्रकार आहेत.तसेच कल्पनाविस्तार आणि कथाकथन हा देखील प्रश्नप्रकार नवीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.उताऱ्याचे सारांशलेखन करण्यासाठी आणि आकलनावर आधारित प्रश्न लिहिण्यासाठी सर्वप्रथम उतारा वाचून  उताऱ्याचे चांगले आकलन होणे आवश्यक आहे.तो गद्य - पद्य उतारा दोन वेळा वाचावा आणि त्यानंतर त्याखाली दिलेल्या पर्यायी उत्तरातून अचूक  सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक असते. सीबीएससी बोर्ड असो अथवा स्टेट बोर्ड यांचे जवळपास प्रश्न  सारखे आहेत.व्याकरण हा एक असा घटक आहे की त्यामध्ये पूर्णपैकी पूर्ण गुण मिळतात. 

       लेखन प्रकारात पत्रलेखन हा एक उपयोजित मराठीचा एक उत्कृष्ट असा प्रकार आहे. दैनंदिन जीवनात अनेक विषयांवर पत्रव्यवहार करून आपल्या समस्यांची माहिती द्यावी लागते. पत्रलेखन ही एक कला आहे.आपल्या मनातील भावभावना विचार चांगल्या भाषेत संक्रमण करून दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे पत्रलेखन एक उत्तम साधन आहे. पत्रलेखनाचे अनौपचारिक आणि औपचारिक असे दोन भाग पडतात. अनौपचारिक पत्रलेखन जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवले जाणारे पत्र असते आणि विशिष्ट वस्तूंची मागणी करणारे,विनंती करणारे हे कार्यालयीन व व्यावसायिक पत्रे ही औपचारिक पत्रलेखनात  मोडतात . पत्रलेखन करताना स्वतःचा पत्ता, मोबाईल नंबर अथवा ईमेल लिहिणे आवश्यक असते. त्यानंतर  ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्या अधिकाऱ्याचा हुद्दा अथवा पद लिहून कार्यालयाचा पत्ता लिहावा लागतो.आपल्याला जे सांगायचे आहे ते थोडक्यात लिहावे, यालाच पत्राचा मजकूर म्हणतात आणि पत्राचा शेवट आपल्या स्वाक्षरीने करावा लागतो.या पद्धतीने पत्रलेखन केले तर निश्चितपणे पूर्णपैकी पूर्ण गुण मिळू शकतात. 

          कथालेखन  करताना विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, नवनिर्मिती व सुर्जनशीलतेला वाव द्यावा लागतो.कथा ऐकणे व सांगणे हा आबाल वृद्धांच्या आनंदाचा विषय आहे. कथाबीज हा कथेचा प्राण असतो.कथा ही आपल्या कल्पनेने,विचाराने आणि सृजनशीलतेने रचली जाते.ती पूर्णतः काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित असते. कथाबीजाच्या  विषयाला पात्र,घटना, प्रसंग,तर्कसंगत विचार यांनी फुलवणे हा लेखन कौशल्याचा एक भाग आहे.लेखन कौशल्य विकसित करणे हा या कथेमागचा हेतू असतो.दिलेल्या मुद्द्याच्या आधारे प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करून ती कथा अथवा गोष्ट पूर्ण करावी लागते.शेवटी कथालेखन पूर्ण झाले की त्याला योग्य ते शीर्षक द्यावे.

      निबंधाचे स्वरूप :-     

   निबंध या शब्दातच बांधीवपणा,आखीव रेखीव मांडणी अभिप्रेत आहे.तो सुनियोजित,मुद्देसूद,विषयाची शिस्तबद्ध मांडणी करणारा असला पाहिजे.वर्णनात्मक,व्यक्तिचित्रणात्मक,आत्मवृत्तात्मक, कल्पनाप्रधान, वैचारिक हे निबंधाचे प्रकार आहेत.व्यक्ती,वस्तू ठिकाण, पशुपक्ष्यांच्या संदर्भातील हालचाली,सवयी,लकबी यांची बारकाव्यांसह तपशीलवार मांडणी वर्णनात्मक निबंध प्रकारात केलेली असते.निबंधाची भाषा साधी,ओघवती प्रत्यकारी व चित्रदर्शी असली पाहिजे.उदाहरणार्थ - पावसाळ्यातील सृष्टीसौंदर्य,मी केलेली शैक्षणिक सहल इत्यादि 

व्यक्तिचित्रणात्मक निबंध :-

     व्यक्तिचित्रणात्मक निबंध प्रकारात एखाद्या  व्यक्तीचे स्वभाव चित्रण काढणे यालाच व्यक्तिचित्रणात्मक निबंध असे म्हणतात. व्यक्तीच्या हालचाली,लकबी,बोलण्याच्या पद्धती,विचार व दृष्टिकोन इत्यादि घटकांचे प्रत्यकारी वर्णन या व्यक्तिचित्रणात्मक निबंध प्रकारात येते. व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू दर्शवणारे हुबेहूब  व्यक्तिचित्रण या निबंध प्रकारात मोडते. उदा - माझा आवडता लेखक, परोपकारी गंपू,माझा आवडता प्राणी. 

आत्मवृत्तात्मक निबंध :-

   सजीव व निर्जीव वस्तू स्वतः जीवनाचे आत्मकथन करते,तेव्हा त्याला आत्मवृत्तात्मक निबंध असे म्हणतात.या प्रकाराला आत्मनिवेदन,आत्मवृत्त,मनोगत,कैफियत असे वेगवेगळे शब्दही योजता येतात.या निबंधप्रकारात निवेदक स्वतः बोलत असल्याने येथे  प्रथमपुरुषी निवेदन आवश्यक असते.आनंद ,कृतार्थता, व्यथा- वेदना,सुप्त-अतृप्त इच्छा आकांक्षा,सुखदुःखे यांचे यथोचित वर्णन या निबंध प्रकारात येऊ शकते. उदा.निबंध - पडक्या किल्ल्याचे आत्मवृत्त, म्हाताऱ्या बैलाचे मनोगत.

 कल्पनाप्रधान निबंध : -

        वास्तव,अवास्तव कल्पनांचा मुक्त वापर करून लिहिलेल्या निबंधाला कल्पनाप्रधान निबंध असे म्हणतात.एखादी गरजेची वस्तू नाही मिळाली तर काय घडेल, याची कल्पना न केलेली बरीच.एखाद्या कल्पनेभोवती गुंफलेली मनोरंजक व लालित्यपूर्ण भाषा यामध्ये असते.उदा - सूर्य संपावर गेला तर--, पाऊस पडला नाही तर---, वृक्षांनी ऑक्सिजन नाही सोडला तर....

वैचारिक निबंध  :-

      ज्या निबंध प्रकारात विचार मांडलेले असतात अशा निबंध प्रकाराला वैचारिक निबंध असे म्हणतात. यामध्ये विचारप्रधान, चिंतनपर ,समस्याप्रधान किंवा वादविवादात्मक व चर्चात्मक स्वरूपाचे विषय हाताळलेले असतात. समस्येचे स्वरूप व उपाय यांची साधकबाधक चर्चा या वैचारिक निबंधात केली जाते . गंभीर ,विचारगर्भ आणि विवेकी भाषा या निबंध प्रकारात मांडलेली असते. उदा.मी माझ्या देशाचा नागरिक,मद्यपान -एक सामाजिक समस्या, वृक्षतोड - एक चिंतेचा विषय.

    विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचा एक निबंध विषय निवडून तो मुद्देसूद,आकर्षक  मांडणी व भाषाशैली,सुवाच्च हस्ताक्षर आणि शुध्दलेखन लक्षात घेऊन किमान ३०० शब्दांत  लिहिला तर निश्चितच चांगले गुण मिळवता येतात.मराठी या विषयाचा गुणात्मक निकाल सुधारण्यास नक्कीच मदत होईल. आपल्याला मराठी  विषयात ९५ टक्के गुण मिळवून  मराठी या भाषा विषयावर प्रभुत्व मिळविता येईल आणि पुढे स्पर्धात्मक परीक्षेसाठी चांगला उपयोग होऊ शकतो.

         #: प्रा दिगंबर कानडजे, सागवन-बुलढाणा.

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत