रखुमा माझी पेरणी करी.

 

              रखुमा माझी पेरणी करी.....

          पूर्वी एक म्हण होती की 'राजाने दुर्लक्षिले, पावसाने झोडपले आणि नवऱ्याने बायकोला मारले तर तक्रार कुणाकडे द्यायची ?' हा प्रश्न सर्व सामान्यांना पडत होता.कारण प्रत्येक जण स्वामीत्वाच्या भावनेने वागत होता.. शेतकरी बांधवांची हीच गत झाली होती . आजही तिच परिस्थिती आहे. दाद मागायची तर किती आणि कुणाला ? शेतात पेरताना जे हिरवं स्वप्न पाहिले होते, ते धो धो पावसामुळे मातीसोबत पार वाहून गेले. उरलं सुरलं पीक ज्या भागात कमी पाऊस होता, तेथे करपून गेलं आणि जिथे ढगफुटी झाली, तेथील पिकं अति पावसामुळे पार पाण्यात बुडून सडून गेले.

       " बुडत्याला काडीचा आधार" या न्यायानुसार सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार देण्याचे वचन दिले. तसेच पीक विमा कंपनी, जर शेतकऱ्यांनी बॅंकेकडून पीक कर्ज घेतले असेल तर परस्पर पीक विमा हप्ता कापून घेते, शेतकऱ्यांना थांगपत्ताही लागू देत नाही . आता पीक विमा द्यायची वेळ आली तर हात वर केले जाते. काहिना पिकविमा मिळाला तर काही प्रतिक्षेत आहे. हाच का किसान बांधवांच्याप्रती आस्था आणि कळवळा! प्रसंग आला की सगळे जण म्हणतात, ' जय जवान - जय किसान.'

       ' कोरोना ' काळात अनेकांचा रोजगार बुडाला.सर्वसामान्य जनता आर्थिकदृष्ट्या डबघाईस आली. घरात कोटीने पैसा असला म्हणजे आपण जगू ,असा समज करून घेऊ नका. घरात ज्याच्या एक - दोन पोतं गहू,ज्वारी, बाजरी असेल तरच तो जगू शकतो. पैसा म्हणजे सर्व काही आहे असे समजू नका. शेती हा महत्त्वाचा प्रश्न आहे.शेती कसवणारा शेतकरी हा महत्त्वाचा आहे.या अनुषंगाने विचार केला गेला पाहिजे असे मला वाटते.

       ' शेतकरी सुखी तर जग सुखी ' ही म्हण सार्थ करून दाखवायची असेल तर शेतकरी बांधवांसाठी एक स्वतंत्र कृषी वित्त पुरवठा आयोग स्थापन करून सरकार ,नोकरदार, व्यापारी , सार्वजनिक आणि धार्मिक ट्रस्ट, देवस्थानच्या तिजोऱ्या आणि उद्योगपतींच्या कंपन्यातील सीएसआर फंडातून काही निधी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरावा असे मला वाटते. करदात्यांवर देखील शेतीकर म्हणून काही प्रमाण आकारला तर वावगे होणार नाही. असे जर करता आले तर फार मोठा निधी ऊभा होईल. .पण शेतकऱ्यांवर एवढी नैसर्गिक आपत्ती येते की जेथे आभाळच फाटले , तेथे थिगळ लावणार तरी किती ? पण कसेही करून आपल्याला शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावाच लागेल यात शंका नाही.

          शेतकऱ्यांना किमान काय हवे आहे ? तर घरापर्यंत आणि शेतापर्यंत पक्का रस्ता असावा . रात्रंदिवस शेतात वीज पंपासाठी वीज जोडणी करून देऊन मोफत वीज पुरवठा असावा. शेतकरी राजाला शेतात रात्रीचे पिकांना पाणी देण्याची वेळ येऊ नये म्हणून दिवसभर वीज पुरवठा असावा.. जलसिंचनाच्या मुबलक प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

          रखुमा माझी पेरणी करी l 

          माझा पांडुरंग नांगर धरी l

           माझी शेती ही पंढरी ll१ll

          अठरा धान्य मीच पिकवितो l 

          चोर लुटारूंचे घर मी भरितो l

          निसर्गाशी सदा झगडितो l 

           चिंता माझ्या उरी l

           माझी शेती ही पंढरी Il२ll

          मजूर माझा भाऊ धाकटा l  

          कधी होणार नीटनेटका l

          कष्ट करूनी सदा भाकितो l

           संसाराच्या घरी l

          माझी शेती ही पंढरी.ll३ll

         धान्य पेरिले बहुमोलाचे l

         पंचतत्वे तया रक्षिले l

         तुका म्हणे जाऊ पहाया l 

         वैकुंठीच्या हरी l

         माझी शेती ही पंढरी ll४ll      

अशा अनेक शतकांपासून शेतकरी बैलांच्या जीवावर शेती करित आला आहे. वरील अभंगात विठ्ठलभक्तीसाठी शेतीची उपमा दिली जाते. विठ्ठल रुखमाई हे जणू काही शेतात काम करणारे शेतकरी कुटुंब आहे. पूर्वी बाया तिफनीवर पेरणी करायच्या. घरधनी तिफन हाकलायचा. शेतीतील सारे कष्ट शेतकरी घरीच उपसत असे. ढोरमेहनत करून शेतकरी विविध प्रकारच्या पिकांची पेरणी करतो. ऊन,वारा, पाऊस आणि गारा यांचेशी संघर्ष करतो. कसेबसे उत्पन्न काढतो. शेवटी व्यापारी हे चोर लुटारूं असून त्यांचे घर हा शेतकरी राजा भरतो. मजूर म्हणून कुटुंबातील माणसं राबराब राबतात, परंतु धाकटे भाऊ कधीच मोठे होत नाही, ही एक विदारक सत्य आहे. वैकुंठाच्या हरीला हेवा वाटेल असे नंदनवन, बगिचा,शेतकरी स्वतः च्या शेतात भविष्याचा वेध घेऊन निर्माण करतो,हे महत्वाचे आहे. एकनाएक दिवस सुखासमाधानाचा नक्की येईल या आशेवर तो जीवन जगत राहतो. ' दिस जातील ,दिस येतील, भोग सरल ,सुख येईल ' हा शेतकऱ्यांचा आशावाद असून संयमांचा भाग आहे.

       कर्जमाफी हा काही शेतकरी- शेतमजूर वर्गांचे जीवनमान उंचावण्यासाठी रामबाण उपाय नव्हे, असे मला वाटते. असे काही ठोस उपाय केले पाहिजेत की शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि पुन्हा शेतकरी नव्या जोमाने कामाला लागतील. शेतकरी खूप कष्ट करून चांगले पिक घेण्यासाठी रात्रंदिवस धडपडतो. नैसर्गिक आपत्तीतून वाचला तर व्यापाऱ्यांच्या तडाख्यात सापडतो आणि यातून धान्याला बरा भाव मिळाला तर महागाईच्या कचाट्यात सापडतो. हे एक दुष्टचक्र असून यावर मात करून तो सुखासमाधानाने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करतो. 

# प्रा. दिगंबर कानडजे , सागवन - बुलडाणा .   


 

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत