महाराणी गुणवंताबाई ...
महाराणी गुणवंताबाई आणि दिपिकाबाई स्मृती प्रित्यर्थ : करवंड महोत्सव
--------------------------------------------------------------------------
शिवकालीन साम्राज्यात करवंड हे गाव अहमदनगर ते विजापूर या महामार्गावर केंद्रस्थानी होते. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा मोहिमेवर निघायचे, तेव्हा ते करवंड येथील इंगळे घराण्याला आवर्जून माहिती द्यायचे, हे विशेष होते. काही काळ ते करवंडला विश्रांती देखील घ्यायचे. त्या काळात या भागात काही गावांमध्ये पांढऱ्या मातीच्या मोठ्या उंचीच्या गढ्या निर्माण झाल्यात. करवंड, शेलसूर, धोत्रा भणगोजी या सारख्या अनेक गावांत गढ्या, राजवाडे, महालं, बारवं ,पुरातनकालीन महादेवांची मंदिरे, भुयारी मार्ग पहायला मिळतात. आता मात्र त्या पुरातन वास्तू नेस्तनाबूत होत चालल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड या गावी गढी परिसरात एकूण ५२ बुरुजे असल्यामुळे या गावाला बावन्न बुरजी असे नाव पडले होते. शिवकालीन युगात आजूबाजूच्या ५२ गावांचा कारभार करवंड येथून चालत असावा असे वाटते. या ५२ गावांतील महसूल या गावातील वतनदारांना मिळत होता.
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड (बावन बुरजी) हे एक ऐतिहासिक गाव. या गावाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता. या गावाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या दप्तरी नोंद होती. हे गाव बुलडाणा येथून २५-३० किलोमीटर दूर असून पळसखेड सपकाळच्या पूर्वेस आहे. या गावात एक मोठा इंगळे परिवार वास्तव्यास होता. तसेच त्यातील काही इंगळे घराणे आजही येथे टिकून आहेत. त्यांच्या पुर्वजांचा सहभाग शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात महत्त्वाचा होता. करवंड येथील शूर सेनानी इंगळे परिवारातील एक धाडसी वीर शिवाजीराव इंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात एक महत्त्वाचे मराठा सरदार होते. त्यांना गुणवंता नावाची एक सुंदर, धाडसी व रूबाबदार कन्या होती. तिचे पिताश्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सुभेदार असल्याने ती छ्त्रपती शिवाजी महाराजांना चांगली ओळखून होती. आपले साम्राज्य, ऋणानुबंध आणि नातेसंबंध या भागाशी कायमचे घनिष्ठ, एकनिष्ठ, जिव्हाळ्याचे आणि सलोख्याचे राहावे; आपल्याला युद्ध मोहिमेत नेहमी सहकार्य मिळावे या हेतूने प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी गुणवंताबाईशी १५ एप्रील १६५७ रोजी विवाह केला होता. गुणवंताबाईसाहेब या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी आणि सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या सुकन्या होत्या.
आजही आपण ज्येष्ठ नागरिकांना चावडी वाचनात सहभागी करून घेतले तर त्यांच्या तोंडून इंगळे घराण्यातील शिवाजीराव इंगळे, बहिर्जी नाईक इंगळे, कात्याजी इंगळे, माणकोजी इंगळे यांच्या एकनिष्ठतेच्या शौर्यकथा ऐकायला मिळतील, एवढे त्यांचे कार्य गौरवास्पद होते. या इंगळे घराण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी असलेले नातेसंबंध हे विशेष महत्त्वाचे आणि दखलपात्र होते. राष्ट्रमाता जिजाऊ माॅंसाहेब ह्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील असल्यामुळे साहजिकच बुलढाणा मातृतीर्थ जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी १२ जानेवारीला सिंदखेडराजा येथे जिजाऊ महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर ' करवंड बावन्न बुरजी बचाव कृती समिती ' तर्फे यंदापासून १५ एप्रीलला करवंड येथे एक महोत्सव साजरा करण्याचे गावकरी आणि कृतीसमितीने निश्चित केले आणि त्यांच्या नियोजनानुसार एक भव्यदिव्य महोत्सव साजरा होतो आहे हे विशेष करून बुलडाणा जिल्ह्यासाठी भूषणावह आहे असे मला वाटते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतप्रेमी, उत्तम प्रशासक आणि एक आदर्श जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज हे बुलढाणा जिल्ह्याचे जावई होते. तसेच सिंदखेडराजा हे त्यांचे आजोळ होते. साहजिकच छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ आणि करवंड ही सासुरवाडी ह्या दोन्ही गोष्टी आपल्या बुलढाणा जिल्ह्यासाठी गौरवास्पद आहे, यात शंकाच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात करवंड येथील दोन मुली सून म्हणून देणाऱ्या करवंड गावाचा इतिहास अजून पाहिजे तसा अनेकांना माहित नाही. हा ऐतिहासिक ठेवा पुढे आणून शिवकालीन वारसा जतन करण्यासाठी येथे गुणवंता बाईसाहेब यांच्या विवाह दिनाचे औचित्य साधून १५ एप्रील ही महोत्सवाची तारीख निश्चित करण्यात आली होती. तसेच गुणवंताबाई आणि दिपिकाबाई या दोन राणीसाहेबांची सदैव आठवण व्हावी आणि त्यांचे माहेर करवंड हे ऐतिहासिक गाव म्हणून अख्ख्या बुलढाण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात स्मरणात राहावे हा या महोत्सव आयोजनाचा हेतू आहे.
सिंदखेडराजा जिजाऊ उत्सवाच्या धर्तीवर करवंड येथे महाराणी गुणवंताबाई आणि दिपिकाबाई यांचा महोत्सव हरीरुद्र राजे इंगळे, माजी पंचायत समिती सभापती अरविंद देशमुख, महाराष्ट्र मराठा सोयरीकचे प्रणेते सुनीलभाऊ जवंजाळ, आनंदी परिवाराचे अध्यक्ष अण्णासाहेब म्हळसने, देऊळगावराजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेशराजे जाधव, प्रा. नाईकवाडे सर, दिलीपराव पाटील, प्रल्हाद पाटील, दत्ता इंगळे, कृष्णा पाटील, अंकुशराव वाघ, ॲड. विजय सावळे, पत्रकार राजेंद्र काळे आणि गणेश निकम, संदीप वानखेडे, युवराज वाघ, सोहम घाडगे, पप्पू राऊत, विनोद सावळे, पत्रकार प्रा.विजय घ्याळ आणि शाम गुजर तसेच करवंड येथील सर्व गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने आणि जोमाने हा महोत्सव साजरा करत आहे.
शिवाजी महाराजांचे गुणवंताबाईशी झालेला विवाह, छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू (तंजावरचे) व्यंकोजी राजे भोसले यांचा दिपिकाबाई इंगळे (वरवंड बावन्न बुरजी) यांचेशी झालेला विवाह, छत्रपती शिवाजी महाराजांची तंजावरशी असे असलेले घनिष्ठ नाते अधोरेखित करण्यासारखे आहे. महादेव मंदीर, कळंबनाथ महादेव मंदीर ,कढाई माता मंदीर, बावन्न बुरजी तटबंदी, महाल, राजवाड्यातील रहस्यमय विहीर आणि भुयारी मार्ग हे या वरवंड गावाचे खास वैशिष्ट्ये आहेत.
तेव्हा या करवंड गावाला खासकरून ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले असून ऐतिहासिकदृष्ट्या एक चांगला वारसा लाभलेला आहे. करवंड गावाला महाराष्ट्राच्या व भारताच्या नकाशात स्थान प्राप्त व्हावे या दृष्टिकोनातून गुणवंताराणी बाईसाहेब आणि दिपिकाराणी बाईसाहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा एक चांगला अविस्मरणीय महोत्सव व्हावा असे गावकऱ्यांना अपेक्षित आहे.
# प्रा दिगंबर कानडजे, मधुकोष,
सागवन-बुलढाणा. (८२७५२३१८७४)