श्री गजाननराव राऊत : एक सामाजिक आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व 

--------------------------------------------------------------------------------

      बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील वडोदा (पान्हेरा) येथे जन्मलेले गजानन शालिग्राम राऊत आजरोजी श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बुलढाणा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहतात . ते एक स्वयंविकसित अष्टपैलू व्यक्तिमत्व असून त्यांचा जन्म २० एप्रिल १९७० रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. परिस्थितीवर मात करून त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांचे वडील शालिग्राम निनाजी राऊत हे केवळ चौथा वर्ग पास होते तर आई निर्मलाबाई या अडाणी होत्या. हे कुटुंब जरी कमी शिकलेले असले तरी सुसंस्कारित, नितीमान आणि कष्टाळू होते म्हणून स्वर्गीय राऊत साहेबांनी त्यांच्या वडिलांना शिपाई म्हणून बुलडाणा येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये लावून घेतले.

      गजानन राऊत यांचे प्राथमिक शिक्षण नगरपरिषद विद्यालय बुलढाणा येथे तर माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल बुलढाणा येथे झाले. त्यांच्यामध्ये जन्मजात नेतृत्व करण्याचा गुण होता. अखेरपर्यंत ते प्रत्येक वर्गात मॉनिटर म्हणून निवडून आले आहेत. गजाननराव अभ्यासू , होतकरू, प्रमाणिक आणि शाळेत नियमित असल्यामुळे कै. नामदेवराव शिंदे आणि इतर शिक्षकांनी त्यांना आर्थिक मदत केली. अनेक विषयांच्या शिकवणीवर्गामध्ये मोफत शिकण्याची व्यवस्था करून दिली. या कामी श्री साबळे सर, श्री वसंतराव पाटील, श्री टाकळकर सर आणि श्री खैरे सर यांनी मोलाची मदत केली. मी त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही असे गजाननराव भावनिक होऊन सांगतात.

     त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण बुलढाणा येथील जिजामाता महाविद्यालयात झाले . त्यांचे ज्येष्ठ बंधू किसन यांचे किडनी आजाराने दुर्दैवी निधन झाले तेव्हा त्यांचा दवाखान्याचा खर्च बुलडाणा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी वर्गणी जमा करून केला. या प्रसंगी तेजराव जाधव आणि विठोबा शेळके यांनी विशेष सहकार्य केले. 

     कोलवड येथील विद्या विकास विद्यालयाचे प्राचार्य सुनीलभाऊ जवंजाळ यांनी १९९३ मध्ये गजाननरावांना लिपिक पदावर नोकरी दिली. ही शाळा विनाअनुदानित तत्त्वावर असल्या कारणाने पगार नव्हता. भविष्यात आपला फायदा होईल या आशेवर ते तेथे तग धरून राहिले. परंतु दिवसेंदिवस आर्थिक परिस्थिती बिकट होत गेली. त्यांचा स्वभाव हरहुन्नरी,जिद्दी आणि मेहनती होता. त्यांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी चार म्हैशी घेऊन दुधाचा जोडधंदा सुरू केला. जेव्हा खामगावचे पाहुणे गजाननरावांना जावई म्हणून पाहण्यासाठी घरी आले, तेव्हा ते चार म्हैशीचे दुध काढण्यात मग्न होते, पाहुणे केव्हा आले, किती वेळ बसले, हे त्यांना कळले नाही. मात्र पाहुण्यांना हे कळले की हा पोरगा मेहनती आहे. तो कधीच उपाशी राहणार नाही. याची त्यांना खात्री पटली. श्री शालिग्राम रूपचंद लांडे यांच्या सविता नावाच्या मुलीशी १९ मे १९९५ रोजी अतिशय साध्या पद्धतीने गजाननरावांचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी त्यांची पत्नी बीए होती. त्यांनी पत्नीला पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. सविताताईने देखील काटकसरीने घरप्रपंच करून फावल्या वेळात अभ्यास केला. बीपीएड आणि बीएड ह्या दोन पदव्या उत्तीर्ण केल्या. खरोखर सविताताई अभिनंदनास पात्र आहे. ही बाब कुटुंबासाठी अभिमानास्पद होती. देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष श्री शेनफडराव घुबे यांनी तिला सन २००१ मध्ये शिक्षिका म्हणून शाळेवर रुजू करून घेतले. खरोखर त्यांच्या धर्मपत्नीचे कुटुंब विकासात मोलाचे योगदान होते हे येथे आवर्जून सांगावेसे वाटते.

      कोलवड येथील शाळा विनाअनुदानित तत्त्वावर असल्या कारणाने त्यांनी दोन वर्षे नोकरी करून लिपिक पदाचा राजीनामा दिला. त्यांचे काका ॲड.ज्योतीराव राऊत माजी नगराध्यक्ष पी.पी. कोठारी, सय्यद बिराम सय्यद मन्नू , काँग्रेस ज्येष्ठ पदाधिकारी ॲड. बाबासाहेब भोंडे , दिगंबरराव महाले, ॲड. दिनकरराव ठाकरे यांनी स्थापन केलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेत मॅनेजर म्हणून मेरेकर साहेबांचे मार्गदर्शनाखाली २२ नोव्हेंबर १९९५ पासून काम करण्यास सुरुवात केली. घरप्रपंच ,नोकरी आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळून सविताताईने मराठीत एमए केले आणि गजाननरावांनी जी डी.सी.ॲन्ड ए. हा कोर्स उत्तीर्ण केला. खरोखर यांना मानावे लागेल!

       पुढे डॉ. पंजाबराव देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. काही समविचारी माणसं एकत्र घेऊन नव्या दमाने आणि काटेकोर नियोजन करून त्यांनी श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था म. बुलढाणा (र.नं.३८३) ही पतसंस्था १० ऑगस्ट २०२० रोजी स्थापन केली. गजानन राऊत हे श्री स्वामी समर्थ सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून ते या संस्थेमार्फत धार्मिक,शैक्षणिक आणि सामाजिक कार्य सदोदित करत असतात. 

     शैक्षणिक कार्य म्हणाल तर बुलडाणा येथील श्री शिवाजी विद्यालयाला पंचवीस हजार रुपये शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी आणि मोताळा तालुक्यातील नेहरूनगर येथील जिल्हा परिषद शाळेला साऊंड सिस्टीम व माइक डायस खरेदीसाठी दिली. शिवाय हातेडी येथील श्री शिवाजी हायस्कूला २५ डेक्सबेंच सुध्दा मुलांसाठी दिली आहेत.

     सामाजिक कार्य म्हणाल तर हतेडी बु. येथील स्मशानभूमीत ३५ सिमेंट बाकडे, हतेडी खु. येथील हनुमान मंदीरात १० सिमेंट बाकडे आणि केळवद येथील चिखली रोडवरील गणपती मंदीर परिसरात १० सिमेंट बाकडे, सातगाव म्हसला बु. येथील स्मशानभूमीत व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असे एकूण ३० सिमेंट बाकडे लोकांना बसण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत.

    त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक कार्य लक्षात घेता ते एक उमदे, हरहुन्नरी असे संयमी बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे, असे मला वाटते. त्यांचा २० तारखेला वाढदिवस आहे, त्यांना सामाजिक कार्य करण्यासाठी निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

# प्रा दिगंबर माणिकराव कानडजे, (८२७५२३१८७४)

अध्यक्ष, निसर्ग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सागवन- बुलडाणा. 

       


    

   

     

    

       

    



  

  

Popular posts from this blog

आर.डी.तायडे : एक आदर्श व्यक्तिमत्व

समाजभूषण पंढरीनाथ पाटील : जीवन व कार्य

मृतात्म्याची कैफियत