साहित्यिक प्रा. बी. ए. खरात -
साहित्यिक प्रा. बी. ए. खरात -- स्वयंविकसित व्यक्तिमत्त्व
----------------------------------------------------------------------------
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ य गावी प्रा बी ए खरात यांचा २८ जानेवारी १९४८ रोजी एका सामान्य कुटुंबात जन्म झाला. बळीराम आश्रुजी खरात आणि रामकोरबाई हे त्यांचे निरक्षर आईवडील. त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती अत्यंत हलकीची होती. निमगाव वायाळ हे गाव हिवरखेडा (पूर्णा) जवळ असून तेथे कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नव्हत्या. हिवरखेड (पूर्णा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रा. बी ए खरात यांचे शिक्षण झाले. ते इयत्ता चौथीच्या बोर्डाच्या परीक्षेत हिवरखेड केंद्रामधून १९५९ मध्ये सर्वप्रथम आले. आईवडिलांना खूप आनंद झाला.
प्रा. बी ए खरात यांच्या वडिलांना केंद्रावर निकालाच्या दिवशी बोलविण्यात आले. केंद्रप्रमुखांनी सांगितले की तुमचा बळीराम पोरगा फार हुशार निघाला. हिवरखेडा केंद्रातून तो सर्वप्रथम आला, असे मुख्याध्यापकांनी सांगताच त्यांच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आजही तो प्रसंग आठवला की प्रा.बी.ए. खरातांच्या डोळ्यात पाणी तरंगते. आता गावाजवळचे शिक्षण तर संपले, आता जावे तरी कुठे, हा प्रश्न त्यांच्या आई-वडिलांना पडला. शिक्षणाशिवाय तरणोउपाय नाही याची जाणीव त्यांना शिक्षकांकडून झाली होती. तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सुविचार देखील मनात घोळत होता." उठा , संघर्ष करा, शिक्षण घ्या आणि हक्कासाठी लढा, याशिवाय जीवनाला काहीही अर्थ नाही. हा विचार त्यांना प्रेरणा देऊन गेला. त्यांनी पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण नूतन माध्यमिक विद्यालय किनगावराजा तेथे पायी चालत जाऊन पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना हे सर्व करावे लागले. १९६५ मध्ये खूप अभ्यास करून ते दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केले. " बोर्डाच्या परीक्षेत केंद्रातून जे तीन विद्यार्थी प्रथम आले होते त्यात मी पहिला होतो ", असे ते सांगतात.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरच्या भाकरी खाऊन आणि पायाची पायपीट करून पूर्ण केले. परंतु आता पुढे शिक्षणाचे काय? त्यांच्या मनात उच्च शिक्षण घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. ते छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाव ऐकून होते. येथील मिलिंद महाविद्यालयात खरात यांनी बीए ची परीक्षा १९७० उत्तीर्ण केली. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना "जयभीम" या शब्दातील स्वाभिमान,आंबेडकरी विचारांची प्रेरणा व शिक्षणातून प्राप्त झालेली अस्मिता त्यांच्या मनात परिवर्तन निर्माण करत होती. त्यांची परिस्थिती अत्यंत गरीबीची होती. परंतु त्यावेळी दरमहा मिळणारी 30 रुपये स्काॅलरशिप त्यांना सोन्याच्या किंमतीची वाटत होती. त्यांनी 31 ऑगस्ट 1965 चा एक प्रसंग सांगितला. तो असा की रूममध्ये खाण्यासाठी काहीच नव्हते. पिठ,मिठमिरची सर्वकाही संपले होते. वाळलेली वांगी होती शिजवून खावून कशीबशी रात्र काढली. खडतर जीवनाची ही खरी परीक्षा होती.
त्यांना शिक्षकीपेशाची आवड असल्यामुळे ते १६ जुलै १९७० रोजी श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी कंधार, जिल्हा नांदेड या संस्थेत इंग्रजी भाषा शिक्षक म्हणून सर रुजू झाले. नोकरी लागल्यानंतर २१ नोव्हेंबर १९७१ रोजी एचएससी डीएड झालेल्या शांता नावाच्या मुलीशी बी ए खरातांचा अगदी साध्यापद्धतीने विवाह झाला होता. शांताताईने मन लावून संसार केला आणि त्यांच्या यशाची मानकरी बनली. प्रपंच आणि नोकरी करुन सरांनी १९७२ मध्ये इंग्रजीत एमए आणि १९७६ मध्ये बीएड केले . सरांनी श्री शिवाजी हायस्कूल कंधार, श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज बारूळ, व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजा आणि शेवटी एसपीएम कॉलेज चिखली येथे नोकरी केली.
नोकरी लागल्यानंतर एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी काकांनी गहाण ठेवलेले शेत सावकाराकडून सोडवून घेतले. सर्जेराव या भावाला सरांनी १९८५ मध्ये वर्दडी खुर्द शिवारात ५ एकर जमीन घेऊन दिली. तसेच गावी पुन्हा अडीच एकर जमीन भावाला घेऊन दिली. भावबंधांसाठी मन लावून काम केले पण पदरी निराशाच पडली, असे भावोद्गार बी ए खरात यांनी व्यक्त केले. जीवन जगत असताना त्यांच्या जीवनात अनेक नैसर्गिक चढ-उतार आले. खूप संकटे आली पण ते कधी डगमगले नाही की हताश होऊन नैराश्यात गेले नाही. कधीही मानसिक स्वास्थ्य बिघडून दिले नाही , ही त्यांची खरी जीवनशैली मला त्यांच्यात पहायला मिळाली. या सर्व वाटचालीत त्यांच्या पत्नीने समर्थपणे साथ दिली.
बी ए खरात सरांनी शिक्षकाची नोकरी करत असताना प्रामाणिक आणि विद्यार्थीकेंद्रीत राहून अध्यापनाचे कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पंचायत समिती कंधार, जिल्हा परिषद नांदेड आणि महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले आहे.तसेच प्रा बी ए खरात यांनी चिखली येथे झालेल्या राज्यस्तरीय, शाहू, फुले,आंबेडकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे..
आतापर्यंत सरांच्या चार साहित्यकृती प्रकाशित झाल्या असून 'वेदनेवरील फुंकर'(आत्मचरित्र) आणि 'विचारपुष्प' (ललितगद्य) हे त्यांचे दोन ग्रंथ संग्रही ठेवण्यासारखे आहे. विशेष बाब म्हणजे त्यांचे 'वेदनेवरील फुंकर' हे पुस्तक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एम ए मराठीच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भग्रंथ म्हणून तर दुसरे पुस्तक 'विचारपुष्प' बीकाॅमच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी नेमलेले आहे. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहे. खरोखर प्रा बी ए खरात हे एक नामांकित लेखक, आदर्श शिक्षक आणि सर्वांची मने जपणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे, यात शंकाच नाही.
# प्रा डी एम कानडजे,
सागवन-बुलडाणा.(८२७५२३१८७४)